Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक संकट, इराणने दिला दंडाचा इशारा

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानसमोर आणखी एक संकट, इराणने दिला दंडाचा इशारा

Subscribe

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेला पाकिस्तान (Pakistan economic crisis) उपासमार, वीजटंचाई अशा विविध समस्यांचा सामना करत आहे. पण त्याच्यापुढील समस्या सुटण्याऐवजी त्यात आणखी भर पडत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह (International Monetary Fund) पाश्चिमात्य देशांकडे कर्जासाठी विनवणी करणाऱ्या पाकिस्तानला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला आहे. आता इराणने (Iran) पाकिस्तानला मोठा दंड ठोठावण्याचा इशारा दिली आहे. दंडाची रक्कम इतकी जास्त आहे की पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत इतक्या पैशांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही.

एका गॅस पाइपलाइनवरून इराणने पाकिस्तानला दंडाचा इशारा दिला आहे. 2009मध्ये पाकिस्तान आणि इराणदरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्याबाबत करार झाला होता. त्यावेळी पाकिस्तानात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) सरकार होते. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची पीपीपी आहे. इराणबरोबरच्या करारानुसार पाकिस्तानला आपल्या हद्दीत सुमारे 800 किमी लांबीची पाइपलाइन टाकायची होती. काम पूर्ण झाल्यानंतर इराण पाकिस्तानला गॅस पुरवणार होता, मात्र हा प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळेच इराणने पाकिस्तानला 18 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानी रुपयांमध्ये त्याचे मूल्य सुमारे 48 हजार 960 कोटी रुपये आहे.

- Advertisement -

ही पाइपलाइन अद्याप पूर्ण न होण्याचे सर्वात मोठे कारण अमेरिका असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. इराणवरील निर्बंधांचे कारण देत अमेरिकेने हा प्रकल्प पूर्ण करण्यापासून रोखले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणने काही वर्षांपूर्वी आपल्याकडील भागात पाइपलाइन टाकली आहे. इराणी अधिकारी जेव्हा पाकिस्तानला पाइपलाइनचे काम पूर्ण करण्यास सांगतात, तेव्हा अमेरिकेच्या निर्बंधांचा हवाला देऊन पाकिस्तान पाइपलाइन टाकण्यास टाळटाळ करत आहे. आम्ही (पाकिस्तान) पाइपलाइन टाकण्यास तयार आहोत, परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे आम्ही हे काम करू शकत नाही, असे कारण पाकिस्तान प्रत्येक वेळी देते. पाकिस्तानच्या या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या इराणने पाकिस्तानला जबर दंड ठोठावण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

कोणत्याही परिस्थितीत गॅस पाइपलाइन निर्धारित वेळेत बांधावी लागेल, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात पाकिस्तानला सुनावले आहे. इराणने पाकिस्तानला मार्च 2024पर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत पाकिस्तानने आपल्या हद्दीत इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइन टाकली तर ठीक आहे; पण हे काम निर्धारित कालावधित पाकिस्तानने केले नाही, तर इराणला पुढील कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा इराणच्या अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे पाकिस्तानच्या डेली टाइम्सने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत गॅस पाइपलाइनचे काम निर्धारित वेळेत करावे लागणार आहे.

- Advertisment -