घरदेश-विदेशChhattisgarh Naxal Attack-...आणि हिडमाच्या 'U चक्रव्यूहात जवान फसले

Chhattisgarh Naxal Attack-…आणि हिडमाच्या ‘U चक्रव्यूहात जवान फसले

Subscribe

जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत १० जणांचा खात्मा केला. मात्र नक्षलवाद्यांच्या 'U चक्रव्यूहात अडकलेल्या जवानांना त्यातून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित बीजापूर आणि सुकमा यात पसरलेल्या विस्तीर्ण जंगलात शनिवारी सीआरपीएफचे २००० जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. कुख्यात नक्षलवादी हिडमा या जंगलात लपल्याची माहिती २० दिवसांपूर्वीच सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. मोठ्या संख्येने नक्षलवादी शस्त्रसाठा घेऊन येथे लपल्याने त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता . पण नक्षलवाद्यांनीच जवानांना ‘U चक्रव्यूहात फसवले व त्यांच्यावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. यात २५ जवान शहीद झाले आहेत. तर २३ हून अधिक जखमी झाले आहेत. पण जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत १० जणांचा खात्मा केला. मात्र नक्षलवाद्यांच्या ‘U चक्रव्यूहात अडकलेल्या जवानांना त्यातून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी विशेष मोहीम आखली होती. त्यानुसार तब्बल २००० जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या होत्या. प्रत्येक तुकडी वेगवेगळ्या मार्गाने जंगलात शिरली होती. सांकेतिक भाषेत सर्व जवान एकमेकांच्या संपर्कात होते. एक एक तुकडी जंगलात प्रवेश करत होती. पण जवान जंगलात आल्याची चाहूल नक्षलवाद्यांना लागली. सतर्क झालेल्या नक्षलवाद्यांनी जवानांना दाट जंगलात येऊ दिले. हिडमाच्या कमांडरनी ‘U चक्रव्यूह आखले. जंगलात जवान येईपर्यंत सगळे शांत होते. जवान आपल्या जाळ्यात अडकल्याचे बघितल्यावर नक्षलवाद्यांची बटालियन जवानांवर तुटून पडली. अचानक शेकडोच्या संख्येने मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी समोर आल्याने जवानही हैराण झाले. कारण त्यांच्या माहितीप्रमाणे नक्षलवादी दाट जंगलात व गावात लपले होते.

- Advertisement -

त्यानंतर उंचावर उभे असलेल्या नक्षलवाद्यांनी तीनबाजूंनी जवानांना घेरले व बेछूट गोळीबार सुरू केला. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या संख्याबळापुढे जवानांचे प्रयत्न कमी पडले. काही जवानांनी नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. पण तिथेच ते फसले. पुढे  दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्लाबोल केला.  त्यांच्यावर रॉकेट लॉंचरही डागण्यात आले. त्यात जवान शहीद झाले.  शनिवारी या चकमकीत बेपत्ता झालेल्या त्या २५ जवानांचे मृतदेह रविवारी सकाळी जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी सापडले.

ज्या भागात ही चकमक झाली तो जोनागुडा हा डोंगराळ भाग आहे. या भागाला गोरिला युद्ध क्षेत्र म्हणून संबोधले जाते. येथे शत्रूवर लपूनछपून हल्ला करणे सोपे असते. याच भागात नक्षलवाद्यांचा कमांडर आपल्या साथीदारांसह लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. यामुळे या भागात एकामागोमाग एक जवानांची तुकडी येथे पोहचली होती.

- Advertisement -

हिडमा नक्षलवादी
नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमा हा सर्वात क्रूर नक्षलवादी म्हणून ओळखला जातो. हिडमाच्या बटालियन आधुनिक शस्त्रांनी सज्ज असून जवानांच्या तुलनेत अधिक घातक शस्त्रात्रे त्यांच्याकडे आहेत. या टीममध्ये ८०० हून अधिक नक्षलवादी आहेत. गोरिला अटॅकबरोबरच युद्ध रणनिती आखण्यात हिडमाचे नाव असून छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये हिडमा शरण घेत असतो.

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -