घरदेश-विदेशराष्ट्रवादीला हवंय मुख्यमंत्रीपद काँग्रेसचा मात्र विरोध

राष्ट्रवादीला हवंय मुख्यमंत्रीपद काँग्रेसचा मात्र विरोध

Subscribe

राज्यात लवकरच पर्यायी सरकार -राष्ट्रवादी काँग्रेस,सोनियांची महाआघाडी सरकारला तत्वतः मान्यता -संजय राऊत

राज्यात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकांचे सत्र सुरू असताना ही चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. राज्यात आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे, या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यास काँग्रेस राजी नसल्यामुळे आघाडीच्या चर्चासत्रांचे घोडे किती पुढे जाईल, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी नवी दिल्लीत महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६-जनपथ निवासस्थानी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. ही चर्चा सकारात्मकरित्या सुरू असून राज्यात स्थिर सरकार देणार, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीदरम्यान, पत्रकारांना सांगितले होते. तसेच शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेसने तत्त्वत: मान्यता दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. मात्र या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा हेका सोडला नसल्यामुळे बैठक अर्ध्यावर सोडून काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटायला गेले, असे सुत्रांकडून समजते.

या चर्चेला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, जयराम रमेशही उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, खासदार सुप्रिया सुुळे, सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या बैठकीला नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा हेका सोडला न गेल्याने मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, के. सी. गेणुगोपाल, जयराम रमेश हे पुन्हा सोनिया गांधी यांना भेटायला गेले. त्यानंतर रात्री उशीरा हे नेते सोनिया गांधींचा निरोप घेऊन पुन्हा बैठकीत सामील झाल्याचे समजते. सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्याबद्दल बैठकीतून बाहेर पडलेले काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना विचारले असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.

- Advertisement -

ती मसुद्याची बैठक होती -अशोक चव्हाण

बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, ही बैठक किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी होती. त्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो. मात्र सरकार स्थापनेच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार-मोदी भेट

तत्पूर्वी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. विशेष म्हणजे पवारांच्या मोदी भेटीनंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे मोदींना भेटायला गेले. त्यांच्यातही मोठी चर्चा झाली. मोदी-पवार भेटीत असे नेमके काय झाले की, अमित शहा त्यानंतर मोदींना भेटायला गेले, याचा सस्पेन्स कायम राहिला आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसद भवनात भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. ही भेट राजकीय नव्हती. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांतील ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणीही केल्याचे खुद्द शरद पवार यांनी ट्विट करून सांगितले.

- Advertisement -

स्थिर सरकार देणार, गुरुवारी बैठक होणार-पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे. उद्याही ही चर्चा होईल, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकारांना सांगितले. नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा झाली. ही चर्चा अर्धवट सोडून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक पत्रकारांना भेटायला बाहेर आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या २८ दिवसांपासून सुरू असलेली अस्थिरता संपवण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली. आजची चर्चा सकारात्मक झाली. उद्याही चर्चा सुरूच राहणार आहे. मला खात्री आहे, राज्यात स्थिर सरकार येईल. राज्यातील अस्थिरता संपेल. तर नवाब मलिक यांनी ही लवकरच आम्ही सरकार बनवू. अजून काही काळ ही चर्चा सुरू राहणार असल्याचे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असेच हे सरकार बनू शकते. त्यामुळे त्यादृष्टीनेच चर्चा सुरू आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच तीन पक्षांच्या महाआघाडी सरकारला काँग्रेसने तत्वतः मान्यता दिल्याचा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार-संजय राऊत

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार. तिच जनतेची इच्छा आहे. राज्यात लवकरच लोकनियुक्त आणि लोकप्रिय सरकार येणार आहे. पेढ्यांची ऑर्डर गेली आहे. उद्धव ठाकरे लवकरच गोड बातमी देतील, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. सत्ता स्थापनेबाबतचा कोणताही तिढा नाही. मुळात तिढा हा शब्दच मला मान्य नाही. जेव्हा काहीच घडत नाही, कुणालाही परिस्थिती सुधारण्याची इच्छा नसेत तेव्हा तिढा निर्माण होतो. इथे चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सकारात्मक होत आहे. त्यामुळे तिढा वगैरे आहे, असे म्हणता येणार नाही. राष्ट्रपती राजवट दूर व्हावी लोकनियुक्त आणि लोकप्रिय सरकार यावे ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यादिशेने पावले पडत आहेत. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार यावे ही राज्याच्या जनतेची इच्छा आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल हे शिवाजी पार्कवर शपथविधीच्यावेळी समजेल. आमचा मुख्यमंत्री कोण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आम्ही सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -