पोलिसाला टॉयलेटमध्ये कोंडून महिला आरोपीचा पोबारा

दिल्ली पोलीस त्या महिला आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीला न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

crime case

शेजाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्या महिला आरोपीने सोबत असलेल्या पोलिसालाच टॉयलेटमध्ये कोंडून तिथून पोबारा केला. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात ही घटना घडली आहे. दिल्ली पोलीस त्या महिला आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीला न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

अशी घडली घटना

शेजाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली होती. अटक केलेल्या महिलेचे नाव विमला असे आहे. जीटीबी रुग्णालयात त्या महिला आरोपीची वैद्यकीय चाचणी होणार होती. तेव्हा तिच्यासोबत महिला पोलीस होती. त्याचवेळी आरोपी महिलेनं टॉयलेटला जायचं आहे, अशी बतावणी केली. तिला टॉयलेटमध्ये घेऊन गेलं असता, त्या ठिकाणी आधीच दोन मुलं थांबली होती. त्यांनी महिला पोलिसाला टॉयलेटमध्ये कोंडलं आणि तिच्या जवळील फोन फेकून दिला. त्यानंतर आरोपी महिलेने आपल्या साथीदारांसह तेथून पोबारा केला. रुग्णालयातून पळालेल्या महिला आरोपीचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत.

महिला आरोपीने केला होता हा गुन्हा

आरोपी महिला विमलाला पोलिसांनी गुरुवारी विजय विहार येथून अटक केली होती. शेजाऱ्याला मारहाण आणि जबरदस्तीनं त्याच्या घरात घुसल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं तिला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.