घरदेश-विदेशLok Sabha 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी...

Lok Sabha 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी यांच्यावर निशाणा

Subscribe

‘सर्व्हे’च्या माध्यमातून भाजपा हवाबाजी करीत आहे. गोदी मीडिया म्हणून कुख्यात ठरलेल्या कंपन्या ‘पोल’ कंपन्यांना हाताशी धरून मोदी यांना मान्य होतील असे आकडे सर्व्हेतून समोर आणत आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी या वेळी ‘चारशे पार’ची हवा निर्माण केली. खरे तर त्यांनी ‘आठशे पार’ वगैरेचेच ढोल वाजवायला हवेत. नव्या संसदेत त्यांच्या खासदारांना बसायला जागा कमी पडली तर चारशेच्या वरचे निवडून आलेले खासदार इंडिया गेटवर बसवू, असे जाहीर करायला हरकत नव्हती. हवा ही अशीच बनत असते, अशा शब्दांत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group criticizes BJP regarding Modi wave)

अमरावतीच्या मावळत्या खासदार नवनीत राणा यांचे वागणे-बोलणे सर्वच खोटे असते. त्यांचे अश्रू, त्यांचे हसणे, त्यांचे बोलणे, त्यांचे जात प्रमाणपत्र आणि त्यांचे हिंदुत्व प्रेम वगैरे सगळेच बेगडी आणि खोटे आहे; पण अमरावतीच्या ताई-बाईंनी एक जळजळीत सत्य आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे ते म्हणजे, ‘‘मोदी यांची हवा आहे या भ्रमात अजिबात राहू नका. मोदी यांची हवा-लाट-वावटळ वगैरे काहीच नसून आता आपल्यालाच लढून जिंकावे लागेल.’’ अमरावतीच्या ताई-बाईंनी हे असे उकळते सत्य सांगितल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशी टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.

- Advertisement -

मोदी यांची हवा 2014-2019 सालीही नव्हती. जसा कृत्रिम पाऊस पाडला जातो तसे ‘हवा हवा’ असे वातावरण निर्माण केले जाते. लोकांना भ्रमात ठेवून, मूर्ख बनवून निवडणुका लढवणे हे ‘हवा’ असल्याचे लक्षण नाही. मोदी यांचा विजय हा असत्य आणि अधर्माच्या हवेवर मिळविलेला असतो, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

लोक आकड्यांची मजा घेतात

महाराष्ट्रात उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे त्यांचे लोक बिनधास्तपणे सांगतात, राज्यात आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जिंकू. यावर उद्धव ठाकरे त्यांच्या खास शैलीत म्हणाले, ‘‘संपूर्ण देशात 45 जागा जिंकू असे त्यांना म्हणायचे असेल.’’ भाजपावाले तोंडास येईल तो आकडा लावीत आहेत आणि लोक त्या आकड्यांची मजा घेत आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

‘सर्व्हे’च्या माध्यमातून हे लोक हवाबाजी करीत आहेत. गोदी मीडिया म्हणून कुख्यात ठरलेल्या कंपन्या ‘पोल’ कंपन्यांना हाताशी धरून मोदी यांना मान्य होतील असे आकडे सर्व्हेतून समोर आणत आहेत. लोकांना भ्रमित करण्याचा हा प्रकार आहे. मुंबईत म्हणे शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही. मग मुंबईतील जागा बिनविरोध भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या बेइमान गटास मिळणार आहेत का? असा खोचक सवाल ठाकरे गटाने केला आहे.

‘एक अकेला सब पर भारी’ ही वल्गना

भाजपा आणि त्यांच्या लोकांचे अद्यापि उमेदवार ठरत नाहीत. मिंधे-अजित पवारांच्या गटाचे उमेदवार भाजपानेच कापले. त्यामुळे लोकांत त्यांचे नाकच कापले गेले. जेथे उमेदवार ठरले नाहीत किंवा उमेदवारच मिळत नाहीत त्या जागाही हे सर्व्हेवाले भाजपा आणि त्यांच्या गटांना सरळ देऊन टाकतात, हे आश्चर्यच म्हणायला हवे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या वेळी त्यांना ईव्हीएमही वाचवणार नाही. त्यामुळे ‘एक अकेला सब पर भारी’ ही वल्गनाच ठरणार आहे, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -