घरदेश-विदेशLok Sabha : देशातील 1625 उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये सील, 21 राज्यांत...

Lok Sabha : देशातील 1625 उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये सील, 21 राज्यांत मतदान

Subscribe

निवडणूक लढवणाऱ्या 1625 उमेदवारांचे भवितव्य 16.63 कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष, 8.23 ​​कोटी महिला आणि 11 हजार 371 इतर मतदारांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज, शुक्रवारी सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी एकूण 1625 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे. लोकसभेच्या जागांसह अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभेच्या एकूण 92 जागांसाठीही मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या पहिल्या टप्प्यासाठी विशेष तयारी केली आहे. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी पिकअप अँड ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024: Voting for 1625 candidates from 21 states in first phase)

इतर टप्प्यांच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच जागा आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 18 लाखांहून अधिक निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले असून 1.87 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1491 पुरुष आणि 134 महिला उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक लढवणाऱ्या 1625 उमेदवारांचे भवितव्य 16.63 कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत. या मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष, 8.23 ​​कोटी महिला आणि 11 हजार 371 इतर मतदारांचा समावेश आहे. 35.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. याव्यतिरिक्त, 20-29 वयोगटातील 3.51 कोटी मतदार आहेत.

- Advertisement -

मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा केंद्रीय सुरक्षा दलांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यासोबतच 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येत आहे. एकूण 4627 फ्लाइंग स्क्वॉड्स, 5208 सांख्यिकी देखरेख टीम, 2028 व्हिडीओ मॉनिटरिंग टीम आणि 1255 व्हिडिओ वॉचिंग टीम लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान

महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या पाच लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असून या निवडणुकीत केंद्रातील हेवीवेट मंत्री नितीन गडकरी आणि अनिच्छेने लोकसभा निवडणूक लढवत असलेले सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पाचही मतदारसंघात केंद्रीय दल तसेच अन्य राज्यांचे दल मिळून 124 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असून त्यांच्या मदतीला हेलिकॉप्टर देण्यात आले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यासाठी आज मतसंग्राम; दिग्गजांचे भविष्य मतदार ठरवणार


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -