घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचे उल्लंघन? निवडणूक आयोगाची...

Lok Sabha 2024 : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचे उल्लंघन? निवडणूक आयोगाची नोटीस

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून आचारसंहिंतेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला नोटीस पाठविली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणांसंदर्भात निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली असल्याचे समजते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 77 अन्वये पक्षाध्यक्षांना जबाबदार ठरवले आहे. याअंतर्गत, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहिता भंगाच्या आरोपांची उत्तरे अनुक्रमे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून मागितली आहेत. त्यांना 29 एप्रिलपर्यंत याबाबत उत्तर देण्यास सांगितले असून आपल्या स्टार प्रचारकांना आचारसंहितेचे पालन करण्यास सांगावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. म्हणूनच स्टार प्रचारकांनी केलेल्या भाषणांची जबाबदारी त्यांना स्वत:ला घ्यावी लागेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र वादग्रस्त भाषणांच्या बाबतीत निवडणूक आयोग प्रत्येक मुद्द्यावर पक्षप्रमुखांकडून उत्तरे मागणार असल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मनाविरुद्ध नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात, खंत असलेले भाजपाचे दुसरे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाने तक्रार केली होती. राजस्थानमधील बांसवाडा येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेस लोकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून घुसखोरांमध्ये वाटप करणार आहे. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस पाठवली आहे.

भाजपने 22 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. राहुल गांधी यांनी भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशात फूट पाडण्याचा आणि निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंच्या दाव्यावर भुजबळांचे स्पष्टीकरण, म्हणाले – विचारले होते पण…


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -