घरदेश-विदेशआता कांदा स्वस्त होणार!

आता कांदा स्वस्त होणार!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भडकलेल्या किंमतींमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना केंद्र सरकारने कांद्याच्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे इतर पिकांसोबतच कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशात घाऊक बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर १०० रुपये किलोच्याही वर गेला आहे. त्यामुळे ग्राहकांचं महिन्याचं बजेट कोलमडायच्या बेतात असताना आता त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या एमएमटीसी (MMTC)ने थेट टर्कीहून ११० लाख किलो कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढून कांद्याचे दर कमी व्हावेत, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आह. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

अवकाळीचा फटका, कांदा महागला!

राज्यात अवकाळी पावसाने फळबागांप्रमाणेच कांद्याच्या पिकाचंही मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जसा मोठ्या अडचणीत सापडला आहे, तसाच सामान्य ग्राहक देखील मेटाकुटीला आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक सुरक्षा मंत्रालयाने एमएमटीसीला सार्वजनिक क्षेत्रातील संस्था म्हणून या कांद्यांची आयात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे एमएमटीसीने ११० लाख किलो कांदा मागवला आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कांद्याचा पहिला हफ्ता भारतात दाखल होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या ‘या’ शेजारी देशात कांदा २७० रुपये किलो!

डिसेंबरमध्ये कांदा भारतात येणार!

दरम्यान, टर्कीप्रमाणेच इजिप्तमधून देखील कांद्याची आयात करण्यात येत आहे. ६० लाख टन कांदा इजिप्तमधून मागवण्यात आला असून डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत हा कांदा भारतात दाखल होईल. यासंदर्भात बोलताना केंद्रीय ग्राहक सुरक्षा मंत्रालयाचे मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं की, ‘देशभरात कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.’ या पार्श्वभूमीवर येत्या काही काळामध्ये कांद्याचे दर खाली येऊन सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -