घरदेश-विदेशParkash Singh Badal : शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचे...

Parkash Singh Badal : शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचे निधन

Subscribe

चंदिगड : शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल (Parkash Singh Badal) यांचे श्वसनविकाराने मंगळवारी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मोहालीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या पीएने ही माहिती दिली.

- Advertisement -

प्रकाशसिंग बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबच्या मलोतजवळील अबुल खुराना गावात झाला होता. 1947मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. 1957मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 1969-70मध्ये ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी खात्यांचे मंत्री होते. त्यांनी पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. 1970 ते 1971 आणि पुन्हा 1977 ते 1980 या कालावधीत ते राज्याचे मुख्यमंत्री होते. यानंतर ते 1997 ते 2002 आणि 2007 ते 2017 यादरम्यान ते पुन्हा पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. याशिवाय 1972, 1980 आणि 2002मध्ये ते विरोधी पक्षनेतेही होते. एवढेच नाही तर, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. प्रकाशसिंग बादल यांना 30 मार्च 2015 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता आठवडाभरापूर्वी श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union home minister Amit Shah) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि त्यांच्या उत्तम स्वास्थ्याबद्दल प्रार्थना केली होती. पण उपचार सुरू असतानाच त्यांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी मोहालीपासून बादल यांचे गाव असलेल्या भटिंडापर्यंत त्यांची अंतयात्रा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -