उत्कृष्ट तपासाबद्दल 151 पोलिसांना केंद्राकडून विशेष पदक, महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा समावेश

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 151 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदकासाठी निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 पोलिसांचा समावेश आहे. तर एकूण 28 महिला पोलिसांचा समावेश आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज याची माहिती दिली. या पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे 15 (CBI), महाराष्ट्रातील 11 पोलीस, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 10 पोलीस, केरळ, राजस्थान आणि पश्चिम बंगालचे प्रत्येकी 8 पोलीस आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलिसांचाही देखील समावेश आहे.

विविध गुन्ह्यातील तपासांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी 2018पासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा विशेष पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दरवर्षी 12 ऑगस्टला या पुरस्काराची घोषणा केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि इतर तपास यंत्रणांकडून पोलिसांची नावे मागविण्यात आली होती. हे़ड कॉन्स्टेबलपासून पोलीस अधीक्षकपदापर्यंत या पदकासाठी ऑनलाइन शिफारस करण्यात आली होती.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. तर, उत्कृष्ट तपासासाठी 2018पासून गृहमंत्री विशेष पदक देण्यास सुरुवात करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री राजनाधसिंह यांनी हा पुरस्कार सुरू केला.

गेल्या वर्षी 28 महिला पोलिसांसह एकूण 152 पोलिसांची या पदकासाठी निवड करण्यात आली होती. त्यात सीबीआयचे 15. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे प्रत्येकी 11, उत्तर प्रदेशचे 10, केरळ आणि राजस्थानचे प्रत्येकी 9, तामिळनाडू 8, बिहार 7, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीचे 6 पोलीस होते.