घरसंपादकीयअग्रलेखनानांचे भाजपमुक्तीचे भाकीत!

नानांचे भाजपमुक्तीचे भाकीत!

Subscribe

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र होईल, असे भाकीत केले आहे. खरेतर नानांनी केलेले हे विधान सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता फारच धाडसाचे आहे, असेच म्हणावे लागेल. कारण सध्या राज्यातील काँग्रेस विविध गटांमध्ये विभागली गेली आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे केंद्रात काँग्रेसला प्रभावी नेतृत्व नाही. भाजपची परिस्थिती काँग्रेसच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र होईल, असे भाकीत केले आहे. खरेतर नानांनी केलेले हे विधान सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता फारच धाडसाचे आहे, असेच म्हणावे लागेल. कारण सध्या राज्यातील काँग्रेस विविध गटांमध्ये विभागली गेली आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे केंद्रात काँग्रेसला प्रभावी नेतृत्व नाही. भाजपची परिस्थिती काँग्रेसच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यांच्याकडे केंद्रात प्रभावी नेतृत्व असल्यामुळे त्यांना राज्यपातळीवर भाजपमध्ये एकी राखण्यात यश येेते, पण काँग्रेस सध्या अंतर्गत वादामुळे पोखरलेली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध केलेली तक्रार. त्यामुळे राज्य काँग्रेस इतकी ढवळून निघाली की थेट केंद्रीय नेतृत्वाला त्यात हस्तक्षेप करावा लागला. त्यात पुन्हा नानांबद्दल नाराजी असलेले थोरात एकटे नाहीत, इतर काही जणही नानांना कोंडीत पकडण्यासाठी जोरात आहेत.

राजपातळीवर काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एका धडाकेबाज नेत्याची गरज होती. तसा धडाकेबाजपणा सौम्य प्रवृत्तीच्या थोरातांकडे नव्हता, म्हणून त्यांच्या जागी नाना पटोले यांना आणण्यात आले. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे काँग्रेसची केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सत्ता गेली होती, पण भाजप आणि उद्धव ठाकरे यांचे बिनसल्यामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यातून काँग्रेसला महाराष्ट्रातील सत्ता मिळाली. या युतीमध्ये शिवसेना असल्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या सहभागी व्हायला तयार नव्हत्या, पण मोदींना केंद्रात आव्हान देणे शक्य होत नसले तरी त्यांच्याकडून महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य काढून घेता येत होते.

- Advertisement -

थोरातांना बाजूला करून नव्या दमाच्या नानांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची बहुमताची सत्ता आणण्याचा नारा दिला. त्यामुळे सोबतचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हादरली. त्यामुळे महाविकास आघाडीत एकच गहजब झाला, पण पुढे नानांनी आपला आवाज आवरता घेतला. अलीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून गेली तेव्हा नाना त्या यात्रेत सहभागी झाले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशी यात्रा काढून लोकांना काँग्रेसशी जोडण्याची आयडिया नानांना सुचली होती, पण पुढे त्या दिशेने पावले टाकल्याचे काही दिसले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. त्याला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यातूनच देशात पहिल्यांदाच भाजपची बहुमताची सत्ता आली. ज्यांच्या करिश्म्यामुळे ही सत्ता आली ते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले, पण त्याच वेळी काँग्रेसची इतकी वाताहत झाली की त्यांना लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी जितक्या जागा लागतात, तितक्याही जिंकता आल्या नाहीत. लोकांनी मोदींना दोन टर्म बहुमत दिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर हतबल होऊन राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काही केल्या ते अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते इतका त्यांनी पराभवाचा धसका घेतला होता. शेवटी मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. काँग्रेसने स्वत:वर कितीही लोकशाहीचे गोंदण करून घेतले तरी हा पक्ष गांधी या आडनावावरच चालतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या प्रचारासाठी खर्गे उतरले होते, पण त्यांचा किती प्रभाव पडला ते दिसले.

- Advertisement -

नाना पटोले यांना महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्ववैभव आणून द्यायचे आहे. त्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत, पण असे करताना सध्या नानांचे फासे उलटे पडताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूने फासे दान देताना दिसत नाहीत. सध्या राज्य काँग्रेसमध्ये नानांविषयी नाराजी धुमसत असल्याचे नुकतेच दिसले. नाना जरी आता भाजपमुक्त महाराष्ट्राचा नारा देत असले तरी तेही भाजपच्या कुंडात एकदा अंघोळ करून आलेले आहेत. खरेतर महाराष्ट्र काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसला देशात जेव्हा हार पत्करावी लागली तेव्हा त्यांना महाराष्ट्राने साथ दिली, पण शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष स्थापन केला, तेव्हापासून काँग्रेसची महाराष्ट्रातील ताकद कमी झाली.

कारण जे काँग्रेसचे राज्यातील मुख्य नेते होते तेच काँग्रेसचे विरोधक झाले. त्यामुळे मूळ काँग्रेसच्या या दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यात पुन्हा शरद पवार हे राज्यातील मातब्बर नेते असल्यामुळे काँग्रेसला त्याचा फटका बसला. महाराष्ट्रात मोदी लाट चांगल्यापैकी चालते हे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. आता मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे दौरे करू लागले आहेत. त्यांचे पहिले लक्ष्य मुंबई महापालिका ताब्यात घेणे आहे हे उघडपणे दिसून येत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूक जिंकणे हे लक्ष्य आहे, तर दुसर्‍या बाजूला काँग्रेसजनांना राहुल गांधी यांना लवकरात लवकर पंतप्रधानपदी स्थानापन्न करायचे आहे. त्यामुळे नानांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हा भाजपमुक्त व्हावा असे वाटत आहे. नानांच्या इच्छातरूला फळे लागतात का ते पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -