घरसंपादकीयअग्रलेखधवल क्रांती अव्वल राहावी

धवल क्रांती अव्वल राहावी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना दूध उत्पादनातील भारताचे यश अधोरेखित केले. यावेळी बोलताना त्यांनी भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला असल्याचे जाहीर केले. न्यूझीलंड, नेदरलंड, बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, थायलंड असे मोठे स्पर्धक दूध उत्पादनात असताना त्यांना मागे टाकून अव्वल स्थान अबाधित राखणे तशी सोपी गोष्ट नाही. महासत्ताक होण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे यानिमित्ताने मानले जात आहे. खरेतर जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा २४ टक्के वाटा आहे. वर्ष २०१४-१५ ते २०२१-२२ अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर वर्ष २०२१-२२ मध्ये देशातील दूध उत्पादन २२ कोटी टनांपर्यंत वाढले आहे.

भारतात दरवर्षी ८.५ लाख कोटी रुपयांचे दूध उत्पादन होते, जे गहू आणि तांदूळ उत्पादनापेक्षा जास्त आहे. लहान शेतकरी हे दुग्ध व्यवसायाचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा आहे. हा व्यवसाय गरीब देशांसाठी उद्योगाचे एक आदर्श उदाहरण ठरू शकेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. भारतात उत्तर प्रदेश हे राज्य दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान दूध उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर आहे. राजस्थाननंतर दूध उत्पादनात मध्य प्रदेश तिसर्‍या क्रमांकावर आहे. गुजरात चौथ्या क्रमांकावर, तर आंध्र प्रदेश पाचवा क्रमांक आणि पंजाब दूध उत्पादनात सहाव्या क्रमांकावर असल्याचे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचा अहवाल सांगतो.

- Advertisement -

भारतात धवल क्रांती घडवून आणण्यात सहकार क्षेत्राचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये सहकारी दूध संस्था किंवा दूध संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या सहकारी दूध संघांमुळे दुधाला कायमची बाजारपेठ निर्माण झाली. दूध उत्पादन घेणारे लोक दूध संघ, डेअरीमध्ये ताजे दूध जमा करतात आणि साधारणतः आठवड्याला, महिन्याला त्यांचे पैसे घेतात. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातील अनेक मोठे दूध संघ पुण्या-मुंबईसारख्या महानगरांना दूध पुरवत आहेत. याखेरीज चितळेंसारख्या खासगी दूध संस्थांनीही शेतकर्‍यांना दुभती जनावरे घेण्यासाठी भांडवल पुरवून त्यांची काळजी घेण्यासाठी औषधपाणी कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. स्वतःच्या पशुशाळा निर्माण केल्या.

वितरणाचे जाळे उभे केले आणि त्याचा संबंध प्रत्यक्ष व्यापाराशी जोडून दुधापासून बनवलेल्या पदार्थांनी पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणच्या बाजारपेठांपर्यंत धडक दिली. पुढील काळात मोठ्या सहकारी दूध संस्थांनी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणे आवश्यक आहे. कारण आपल्या दुधाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण ते किफायतशीर दरात विकू शकतो. तसेच बटर, खवा, चीज यांच्या विक्रीला चालना देऊ शकतो. यासाठी नेस्लेसारख्या कंपनीप्रमाणे दूध संस्थांनी प्रचंड मोठे प्लँट उभे केले तर जगाच्या बाजारपेठेत आपले डेअरी प्रॉडक्ट्स सहजगत्या विकता येतील. त्यातून रोजगारही वाढेल.

- Advertisement -

गुजरातमधील ग्रामीण जीवनाचा कायापालट अमूलने म्हणजेच आनंद मिल्क युनियन लिमिटेडने घडवून आणला. हे परिवर्तन सहकारी तत्त्वावर झाले. अमूलमुळे ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढले, रोजगार वाढला. या संस्थेने आता शैक्षणिक संस्थाही सुरू केली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांनी असा प्रयत्न केला. कौटुंबिक पातळीवर ग्रामीण भागाचा अभ्युदय करण्याचे प्रभावी साधन म्हणून दूध व्यवसायाचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्या-त्या प्रदेशाचे सहकारी दूध संघ तयार झाले आणि या सर्व दूध संघांनी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय बाजारात उतरण्यासाठी संयुक्त प्रक्रिया उद्योग सुरू केला तर या राज्यातल्या दूध व्यवसायाला एक नवी दिशा आणि नवी ताकद मिळेल. अर्थात भारतातील धवल क्रांतीचे भवितव्य दुधाच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. या क्षेत्रात भविष्यात काय वाढून ठेवलेय याचा विचार करता निराशा पदरी पडू शकते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जगभर उष्णता वाढत असल्याने दुधाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे.

त्यावर दूध उत्पादकांना ठोस उपाययोजना करण्यावर विशेष भर द्यावा लागेल. जगाला रोज ९५१.२३ दशलक्ष टन दुधाची गरज असताना जगभर उष्णता वाढत असल्याने सध्या केवळ ८६४.८६ दशलक्ष टन दूध उपलब्ध होत आहे. ही परिस्थिती भारताचीच नसून विकसित देशातही दुधाची टंचाई भासत आहे. डेअरी उद्योगाने देशात ६ कोटी लोकांना रोजगार मिळवून दिला आहे, पण वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी दुधाचे उत्पादन तीन दशलक्ष टनाने कमी होईल असा अंदाज आहे. यामुळे या विषयावर गंभीरपणे चर्चा होणे आवश्यक आहे. हवामानातील उष्णतेमुळे पशुपालनावर व त्यांच्या खाद्यावर परिणाम होत असून त्यावर उपाय करता येतील, पण गरम वातावरणात दूध लवकर खराब होते आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे. दूध उत्पादनात भारत अग्रेसर असल्याने यापुढे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांत भारताला योगदान द्यावे लागेल. त्यासाठी संशोधकांची फौज कामाला लावावी लागेल. तसे झाले तरच धवल क्रांती टिकाव धरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -