घरसंपादकीयअग्रलेखतारीख पे तारीख..

तारीख पे तारीख..

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील सर्वोच्च लढाईचा अंक आता सर्वोच्च न्यायालयात सुरू झाला आहे. दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट ही पुढील तारीख दिली आहे. एकूणच या प्रकरणाचा रांग रंग पाहता तारीख पे तारीख हा सिलसिला सुरू राहण्याची चिन्हे अधिक दिसत आहेत. आणि तसेच सुरू राहिले तर मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठा मनस्ताप तसेच प्रचंड नुकसान या कालावधीमध्ये भोगावे लागण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये दादर येथे शिवसेना या संघटनेची स्थापना केली.

त्यामुळे शिवसेनेचे आजचे वय लक्षात घेतले तर ते ५६ वर्षे आहे. मराठी भूमिपुत्रांची अत्यंत जाज्वल्य आणि आक्रमक संघटना म्हणून एकेकाळी शिवसेनेचा दरारा हा केवळ मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर पाकिस्तानसारख्या परकीय शत्रू राष्ट्रांमध्येदेखील होता. स्वर्गीय बाळासाहेब यांची अत्यंत आक्रमक कार्यशैली आणि त्याचबरोबर शिवसेनेसाठी प्राणाची आहुती देणारे अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्या बळावर शिवसेनेने संपूर्ण देशात स्वतःचा असा स्वतंत्र दरारा या काळात निर्माण केला होता. मात्र शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आणि त्यानंतर मात्र शिवसेनेचा आक्रमक चेहरा हा हळूहळू मवाळ होत गेला.

- Advertisement -

५६ वर्ष ज्या शिवसेनेने महाराष्ट्रावरती अप्रत्यक्षपणे वर्चस्व गाजवले त्या शिवसेनेची आजची अत्यंत गलितगात्र अवस्था ही कोणत्याही मराठी माणसाच्या मनाला वेदना देणारी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जे अंतर्गत वाद असतील त्याच्याशी शिवसेनेवर प्रेम करणार्‍या मराठी माणसाचा काहीही संबंध नाही. हे पक्षांतर्गत वाद पक्ष नेतृत्वाने सोडवायचे असतात. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या आणि त्याआधीपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना जर स्वतःचा पक्ष स्वतःच्याच सरदारांपासून वाचवता येत नसेल तर ते मराठी माणसांचे दुर्दैव म्हणावे लागेल.ज्यावेळी एकनाथ शिंदे हे सुरुवातीला वीस पंचवीस आमदारांना घेऊन थेट सुरतमध्ये गेले होते त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून अथवा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची सुरतमध्ये जाऊन भेट घ्यावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यातून काही समन्वयाने साधता येतो का पहावे, असे प्रयत्न करण्याची गरज का वाटली नाही, याचे उत्तर खरे तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याची गरज आहे.

तसे करण्याऐवजी उद्धव ठाकरे हे गद्दार, बंडखोर अशी स्वतःच्याच आमदारांची व नेत्यांची संभावना करत मुंबईमध्ये बसून राहिले. उद्धव ठाकरे यांच्या या अत्यंत निद्रिस्तपणाचा सर्वाधिक फटका हा निष्ठावंत शिवसैनिकांना नाहक सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याला एकापाठोपाठ एक मोठी पदे आणि जबाबदार्‍या देत असताना उद्धव ठाकरे यांना याबाबत त्यावेळी काहीच कल्पना कशी आली नाही. बंडखोरी हे काही शिवसेनेला नवीन नव्हती. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असतानादेखील छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे नेते शिवसेनेला सोडून गेलेच होते, मात्र आज एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे शिवसेनेच्या मुळावरच घाव घातला आहे ते पाहता छगन भुजबळ, नारायण राणे यांनी केलेले बंड देखील सौम्य होते, असेच म्हणण्याची वेळ आली आहे. भुजबळ आणि राणे यांनी शिवसेनेत बंड जरूर केले, परंतु त्यांनी शिवसेनेच्या मुळावर घाला घातला नाही.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अथवा उठावाला शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधून जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे तो पाहता दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पूर्णपणे पोखरून टाकली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ठाण्यातील नेत्याकडे एवढे मोठे बंड उभारण्याची क्षमता ही काही एका दिवसात आलेली नाही. अडीच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या खुर्ची खाली त्यांचेच अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय नेते एवढा मोठा सुरुंग लावत आहेत याची साधी पुसटशी कल्पना येऊ नये यासारखे राजकीय वर्तुळात दुसरे कोणतेही आश्चर्य असू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयात तसेच अन्य प्राधिकरणाकडे शिवसेना नक्की कोणाची याबाबत जर शिवसेनेच्या ५६ वर्षानंतर प्रश्न उपस्थित होत असेल तर हा शिवसेनेच्या नेतृत्वाचा सर्वात मोठा पराभव आहे. त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीतील ही अत्यंत लज्जास्पद अशी स्थिती आहे आणि या स्थिती करता भारतातील लोकशाही व्यवस्थादेखील आणि त्यातील तांत्रिक तसेच राजकीय त्रुटीदेखील कारणीभूत आहे हेही लक्षात घेण्याची गरज आहे. आज ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना स्वतःच्याच पक्षातील बंडखोरीमुळे म्हणा अथवा उठावामुळे मुख्यमंत्रीपदावरून तर अत्यंत अपमानास्पद स्थितीत पायउतार व्हावे लागले आणि त्यानंतरदेखील शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांची स्थिती ही एकनाथ शिंदे यांनी अत्यंत दयनीय करून ठेवली आहे ते पाहता भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांसाठी जी काही आचारसंहिता, नियमावली, कायदे केले आहेत ते या अवस्थेत तोकडे पडत असल्याचे अत्यंत दुर्दैवी चित्र पुढे येत आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील भांडणाचा काय निकाल लागायचा तो लागेल, मात्र तो जेव्हा लागेल तेव्हा संपूर्ण शिवसेना भुईसपाट होईल, त्यानंतर लागणार का? बरे हा प्रश्न केवळ शिवसेने पुरता मर्यादित आहे, असं भारतातील कोणत्याही राजकीय पक्षाने समजूत करून घेण्याचे काहीच कारण नाही. उद्या कोणत्याही पक्षामध्ये मग तो काँग्रेस असो अथवा आज देशामध्ये अत्यंत बलाढ्य शक्ती म्हणून ओळखला जाणारा भाजप असो त्यांचीही अवस्था त्यांच्या पक्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासारखे जर बंड झाले तर अशीच होणार का, याचाही विचार सर्व राजकीय पक्षांनी आणि पक्ष नेतृत्वाने गांभीर्याने करण्याची गरज आहे.

कारण आज त्यांचे सत्ता स्पर्धक असलेल्या उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांना जरी गुदगुल्या होत असल्या तरी आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचे आव्हान त्यांच्यासमोर आहे, सगळ्यांनाच मंत्री बनवणे आणि मनासारखी खाती देणे त्यांना शक्य होईल असे वाटत नाही, त्यामुळे भाजपसुद्धा संसदीय पेचात येऊ शकतो, त्यामुळे या अशा राजकीय पेचप्रसंगावर दीर्घकालीन विचार होण्याची गरज आहे. ते सगळ्याच राजकीय पक्षांच्या हिताचे आहे. कारण सध्या जो राजकीय पेच निर्माण झाला आहे, तो इतका गुंतागुतीचा आहे की, तो सोडविण्यासाठी न्यायालयालासुद्धा तारीख पे तारीख देण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -