शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या

आमच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली असून तसे पत्र मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश संख्याबळ आहे. तसेच ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्लीत गेले होते. त्यावेळी ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्यांनी ही भेट घेतली नाही. शिवसेनेच्या १२ खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्यासंदर्भात आणि निवडणूक चिन्हाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे.

आमदारांसह खासदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पत्र देण्यात आले होते.

दरम्यान, शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. शिंदे गटाकडून दाव्याचे पत्र आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.