लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी देशभरातील उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यातही महाविकास आघाडीपासून फारकत घेत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केली. त्यामुळे राज्यातील महायुती विरुद्द महाविकास आघाडी अशा सरळ लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडण्याचीच शक्यता आहे.
तसे पाहिले तर, महाविकास आघाडीतील समावेशापासूनच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका हटवादीच राहिली होती. महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत अधिकृत स्थान दिले, पण याउपरही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांकडून आम्हाला मान्यता मिळाली असली तरी, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानेदेखील मान्यता दिली पाहिजे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पत्रव्यवहार करत असले तरी, आम्हाला सांगितल्याप्रमाणे, (सध्या भाजपमध्ये असलेले) अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची त्या पत्रांवर सही नाही, अशी सबब प्रकाश आंबेडकर यांनी पुढे केली. त्यानंतरसुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांमधील माहिती अनेकदा उघड केली. त्यामुळे महाविकास आघाडीत सहभागी होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा नेमका काय उद्देश होता, हे स्पष्ट झालेले नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना आपण दोघे नातू म्हणून भावनिक साद घातली होती आणि त्याला प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसादही दिला. त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील नाते विळ्या-भोपळ्याचेच होते, पण नंतर अलीकडेच दोघांचे एकत्रित चहापान झाले आणि त्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसू लागले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपापली बाजू भक्कम करण्यासाठी अशा सहकार्यांची गरज होतीच.
त्यातही २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उतरवल्याने त्याचा फटका काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. वंचित बहुजन आघाडी आणि दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजनाचा फायदा १५ ठिकाणी तत्कालीन शिवसेना-भाजप युतीला झाला होता. पराभूतांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
हे ध्यानी घेता, महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग महत्त्वाचा होता. कदाचित, २०१९चे निकाल ध्यानी घेऊनच प्रकाश आंबेडकर यांनी ताठर भूमिका घेतली असावी, मात्र भाजपचा पराभव करण्याचाच उद्देश असेल, तर त्यांनी थोडी नरमाईची भूमिका घ्यायला हरकत नव्हती. महाविकास आघाडीने आधी राज्यातील ४८ पैकी ४ जागा आणि नंतर ५ जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना दिला होता, पण तो त्यांनी धुडकावला आणि थेट ‘एकला चलो’ची भूमिका जाहीर केली.
त्यांनी आता ओबीसी महासंघ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना सोबत घेण्याची तयारी केली आहे. जरांगे-पाटील हे येत्या ३० मार्चला निर्णय देणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी ८ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे, तर उर्वरित ४० जागांचे वाटप २ एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे. स्वत:चे उमेदवार आधीच जाहीर करणार्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल अडवणुकीची भूमिका कशी घेतली, हा प्रश्न आहे.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला कायम भाजपची ‘बी’ टीम म्हणून हिणवले आहे. २०१९च्या निवडणुकांनंतर ही टीका तीव्र झाली होती. आताही प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय पाहता वंचित बहुजन आघाडी भाजपकरिता काम करते का, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. घराणेशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी वंचितचा वापर करीत होती, असा थेट आरोप आंबेडकर यांनी केला. ही भाषा भाजपचीच आहे.
अलीकडेच एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’बद्दल असेच वक्तव्य केले होते, हे विशेष. भाजपविरोधातील मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजपप्रणित महायुतीला होईल, हे गणित यामागचे आहे का? २०१९ला असेच घडले होते, पण त्यावेळी वंचित बहुजन आघाडीसोबत खासदार असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएमही होती. त्यामुळे अल्पसंख्याकांची बरीचशी मते वंचितच्या पारड्यात पडली. यावेळी तसे काही घडेल असे वाटत नाही. एकूण प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचा तेवढा प्रभाव राहिला आहे का, हा खरा प्रश्न आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा जनसामान्यांवरील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रभाव लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीची पोहोच कमी पडेल, असेच दिसते. ओबीसी महासंघाला सोबत घेतले असले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीकडे ओबीसी नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यात मतविभागणी होईल, तर जरांगे-पाटील यांच्यामुळे प्रामुख्याने मराठवाड्यात प्रकाश आंबेडकर यांना फायदा होऊ शकतो. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. एकूणच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे मतविभागणीचा फायदा थेट महायुतीला होणार, एवढे नक्की!