घरसंपादकीयअग्रलेखझाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

झाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

Subscribe

राजकारणाच्या गदारोळात अनेक जिव्हाळ्याच्या किंबहुना जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे हा अनुभव आपल्याकडे नवा नाही. सध्या शब्दश: शरीर भाजून काढणार्‍या उन्हाळ्याचा अनुभव आपण सर्व घेत आहोत. महाराष्ट्रात कधी काळी विदर्भातील जिल्ह्यांतून ४० अंशांच्या पलीकडे तापमान गेल्यानंतर तिथले लोक कसे राहत असतील, असा प्रश्न इतर ठिकाणच्यांना सतावायचा! गेल्या तीन-चार वर्षांपासून विदर्भाचा अनुभव उर्वरित महाराष्ट्र घेत आहे. एप्रिल महिना सुरू असताना तापमान ठिकठिकाणी ४३ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

सकाळी ११ वाजल्यानंतर कामाशिवाय बाहेर न पडण्याचा, तसेच लहान मुलांना घराबाहेर जाऊ न देण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. उन्हाचे तीव्र चटके बसणे म्हणजे नेमके काय याचा ‘याची देही’ अनुभव सर्वांना येत आहे. जागतिक वातावरणात तापमान वाढ होणे नवे नाही. अनेकदा तापमान वाढ झाली आहे किंबहुना त्याचे पुरावे अंटार्क्टिकामधील बर्फाच्या अस्तरात मिळतात, मात्र अलीकडच्या काही वर्षांत तापमानाचे बिघडलेले संतुलन किंवा तापमानात होणारी वाढ जगाच्या चिंतेचा विषय झाला आहे.

- Advertisement -

शास्त्रज्ञांकडून जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगबाबत वारंवार इशारे देण्यात येत असताना त्याला महत्त्व दिले गेले नाही. तथाकथित विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे काम अव्याहत चालू आहे. बेसुमार जंगलतोड झाल्याने निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या किती असावी याला धरबंद नाही. इमारतींची ‘जंगले’ तयार झाली आहेत. शहरांतून वाहनांची संख्या किती असावी याला मर्यादा नाही. मुंबईत वाहनांचे रेशनिंग करावे, असा सल्ला काही वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ सनदी अधिकार्‍याने दिला होता. आजमितीला मुंबईतील वाहनांची संख्या ५० लाखांच्या आसपास आहे. यात वाढ होत आहे. परिणामी प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण वाढल्याने उष्णतेतही वाढ होत आहे.

सध्याच्या तापमान वाढीला पूर्णत: मानव जबाबदार आहे. हिमप्रदेशातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली तरी आपले डोळे उघडत नाहीत. काही दिवसांपूर्वी समुद्र किनारी असलेल्या महानगरांना बर्फ वितळण्यामुळे कसा धोका पोहचू शकतो याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली, तर भविष्यात हाहा:कार माजू शकतो. पर्यावरणातील बदलांना काही देशांनी गंभीरतेने घेतले असले तरी भारतात याबाबत बिलकूल गांभीर्य नाही. ‘काय व्हायचे ते सर्वांचेच होईल’ अशी आपली मानसिकता आहे.

- Advertisement -

सप्ताहाचे १६८ तास राजकारणात आकंठ बुडालेले सर्वच पक्षांतील नेते पर्यावरण हा विषय गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. एखाद्या प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करायची वेळ येते तेव्हा कोणीही विरोध करीत नाही. विरोध झालाच तर त्यात पर्यावरणापेक्षा राजकारणातील हित जपण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर आहे. कदाचित आज आपण सुपात असू, पण जात्यात जायला फार वेळ लागणार नाही.

हरितगृहांची संख्या वाढत आहे. हरितवायूचे कोणतीही काळजी न घेता उत्सर्जन केले जात आहे. महाराष्ट्रात काही भाग भाजून निघत असताना काही भागात अवकाळीचे तांडव सुरू आहे. अवकाळीमुळे पिकांच्या नुकसानीचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने ऊन, पाऊस, थंडीचा खेळ सुरू आहे. तापमानातील वाढ चिंता करायला लावणारी आहे. पारा ४४ ते ४५ पर्यंत जाऊन पोहोचला, तर बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. यातून रोगराईचे चक्र निर्माण होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कडक उन्हाळ्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविलेले असताना ग्रामीण भागातून जंगलामध्ये लागणारे वणवे चिंता वाढवत आहेत. बाजूला भट्टी पेटविलेली असावी असे अनेक गावांचे वातावरण आहे. सर्वत्र ‘उष्णताकल्लोळ’ सुरू असताना मोठ्या महामार्गांसाठी मोठ्या वृक्षांची निर्दयीपणे तोड केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जुने वृक्ष मुळासकट उखडून टाकून त्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग असो, मुंबई-गोवा महामार्ग असो किंवा अन्य मार्ग असोत, प्रचंड प्रमाणात झाडांची निर्दयीपणे छाटणी करण्यात आली आहे.

काही ठिकाणी रस्त्याचे काम झाले तरी आजूबाजूला झाडांचा पत्ता नाही. वड, पिंपळ, आंबा, चिंच आणि इतर महाकाय वृक्षांची सहजपणे छाटणी झाल्याने रस्त्यावरील सावली हरवली आहे. या रस्त्यावर वाहन नादुरुस्त झाले, तर चालकासह प्रवाशांना रणरणत्या उन्हात थांबावे लागते. यापूर्वी वाहने डेरेदार वृक्षाखाली थांबवून भोजन, विश्रांतीचा आनंद घेतला जात असे. ते सुख हरवले आहे. मोठी झाडे तोडून शोभेची झाडे रस्त्याच्या मध्यभागी लावण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यात बोगनवेलीसारखी सुशोभित झाडे लावली जात आहेत.

डेरेदार वृक्षराजीची जागा बोगनवेल कशी भरून काढणार, हा मोठा प्रश्न आहे. नव्याने वृक्षारोपण करण्यात येईल या आश्वासनात तथ्य नसल्याने बोगनवेली लावून चक्क बोगसगिरी सुरू आहे. शासन वृक्षारोपणासाठी आग्रही असते, मात्र त्यात चमकोगिरीचा भाग अधिक असतो. विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे म्हणजे आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. ‘झाडांचे शिरकाण गोतास काळ’ याची प्रचिती आता वारंवार येऊ लागली आहे. उन्हाचे चटके सुसह्य करायचे असतील, तर पर्यावरण विषय गांभीर्याने घ्यावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -