घरसंपादकीयअग्रलेखराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसचाच!

राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसचाच!

Subscribe

‘रामाच्या नावाने चंदा, हाच भाजपचा धंदा’ असे म्हणून भाजपवर टीका करणार्‍या काँग्रेसला आता तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. कारण भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसने आपली राजकीय पोळी भाजायला सुरुवात केली आहे. तेलंगणा राज्याची विधानसभा निवडणूक त्यासाठी निमित्त ठरत आहे. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवांत रेड्डी यांनी जनतेला मोठे आश्वासन देत म्हटले की, आम्ही सत्तेत आल्यास राज्यातील १०० मतदारसंघांमध्ये राम मंदिर उभारण्यावर विचार करू. प्रत्येक मंदिर उभारण्यासाठी १० कोटींचा निधी दिला जाईल, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले. ज्या अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर काँग्रेसने भाजपला वेळोवेळी फैलावर घेतले तशाच राम मंदिरासाठी आता काँग्रेसने मतदारांना आश्वासन देणे म्हणजे काँग्रेसने आपली भूमिका आणि धोरण बासनात गुंडाळून ठेवल्याची टीका आता सुरू झाली आहे. वास्तविक पूर्वइतिहास बघता काँग्रेस अशा प्रकारच्या घोषणा वारंवार करीत आली आहेे.

खरे तर सॉफ्ट हिंदुत्वाबाबत काँग्रेसमध्ये कायमच वादविवाद होत राहिला आहे. खूप वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ या सॉफ्ट हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते. तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये याबाबत चर्चा होत आल्यात की बहुसंख्याकवादापासून आपण वेगळे राहायला नको. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या काही दिवस आधी दस्तुरखुद्द काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी पत्रक काढून राम-सीतेसह संपूर्ण रामायणाचे महत्त्व सांगणारे पत्रक जारी केले होते हेदेखील विसरून कसे चालेल? २०१७ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी गुजरातमधील विविध मंदिरांना भेटी दिल्या होत्या.

- Advertisement -

राम मंदिराला राजकीय मुद्दा बनवण्याची नीती भाजपची आहे असा कुणाचाही समज होऊ शकतो. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर एका वर्षाने काँग्रेसने राम मंदिराच्या नावाने उत्तर प्रदेशात राजकारण सुरू केले होते. त्यापूर्वी म्हणजे १९३४ ला काँग्रेसमध्ये सोशालिस्ट पार्टीने जन्म घेतला होता. यात राम मनोहर लोहियांपासून आचार्य नरेंद्र देवांपर्यंत सर्वच सहभागी होते. या वर्गातील नेत्यांचा नेहमीच मुख्य काँग्रेसच्या वरिष्ठांशी बेबनाव असे. १९४८ पर्यंत काँग्रेसमधील ही अंगर्तग गटबाजी कमालीची वाढली आणि या वर्गाने काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर उत्तर प्रदेशातील सोशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या १३ आमदारांनी विधानसभेचे राजीनामे दिलेत. त्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा झाली. या निवडणुकीत फैजाबादकडे हॉट सीट म्हणून बघितले जात होते.

या शहरात समाजवादी विचारांचे आचार्य नरेंद्र देव हे निवडणुकीच्या मैदानात होते, ज्यांचा समावेश राजीनामा दिलेल्या १३ आमदारांमध्ये होता. त्यावेळी गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान, तर सरदार वल्लभभाई पटेल हे गृहमंत्री होते. आचार्य नरेंद्र देव यांची फैजाबाद मतदारसंघावर जबरदस्त पकड होती. त्यामुळे त्यांना पराभूत करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान होते. त्यावेळी हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाची चाल काँग्रेसने खेळली. आचार्यांच्या विरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातील राघवदास बाबा यांना उभे केले. राघवदास बाबांनी त्यावेळी प्रतिज्ञा केली होती की, ते राम जन्मभूमीला इतर धर्मियांपासून मुक्त करतील. त्यामुळे या पोटनिवडणुकीपूर्वीच अयोध्येत पोस्टर लागले होते, ज्यात आचार्य नरेंद्र देव यांना रावणासारखे दर्शविण्यात आले होते आणि काँग्रेसचे उमेदवार राघवदास बाबांना रामाच्या छबीसारखे दाखवण्यात आले होते.

- Advertisement -

या निवडणुकीत नरेंद्र देव पराभूत झाले. राघवदास निवडून आल्यावर डिसेंबर १९४९ मध्ये पाच लोकांना सोबत घेत त्यांनी शरयू नदीत स्नान केले आणि रामाची मूर्ती घेऊन बाबरी मशिदीकडे प्रयाण केले. मशिदीचे टाळे उघडत तेथे रामाची मूर्ती ठेवली आणि तेथेच भजन-कीर्तनही सुरू केले. त्यानंतरच्या पहाटेपासून मोठी खळबळ माजली. अयोध्येतील तणावामुळे त्रस्थ झालेल्या पंडित नेहरूंनी गोविंद वल्लभ पंत यांना पत्र लिहीत तात्काळ रामाची मूर्ती हटवण्यात यावी, असे आदेशित केले होते, परंतु प्रशासनाने मूर्ती हटविण्यास नकार दिला. मूर्ती हटवली तर मोठ्या धार्मिक दंगली उसळतील अशी भीती घालण्यात आली. त्यानंतर काही बड्या अधिकार्‍यांना पदावरून हटवून मूर्ती हटवण्यात आली. म्हणजेच राम मंदिर आंदोलनाची सुरुवात खर्‍या अर्थाने काँग्रेसनेच केली होती, परंतु नंतर धर्मनिरपेक्ष पक्षाचे बिरुद मिरवण्यासाठी काँग्रेसने इतिहासाकडे कानाडोळा करीत आपली राजकीय पोळी भाजणे सुरू केले.

राम मंदिर बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तेव्हा मंदिर उभारणीसाठी निधी संकलन सुरू करण्यात आले. यावेळी भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गांधींच्या फोटोसह झळकवण्यात आले होते. राम मंदिराची निर्मिती करणे हे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते, असेही या पोस्टर्सवर उधृत करण्यात आले होते. त्यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीदेखील राम मंदिर निर्मितीचे जाहीरपणे स्वागत केले होते. त्यामुळे तेलंगणात रामाची शंभर मंदिरे उभारण्याची घटना तशी काँग्रेसच्या परंपरेला शोभेशी अशीच आहे. अशा संवेदनशील मुद्याचा वापर काँग्रेस केवळ निवडणुकांपुरताच करते आणि इतर पक्ष पूर्ण वेळ करतात हाच तेवढा फरक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -