घरसंपादकीयदिन विशेषथोर गीतकार, कवी ग्रेस

थोर गीतकार, कवी ग्रेस

Subscribe

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचा आज स्मृतिदिन. कवी ग्रेस हे मराठी कवी, गीतकार होते. त्यांचा जन्म १० मे, १९३७ रोजी नागपूरमध्ये झाला. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळीत झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षण यांच्याशी त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए.ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे एम.ए. झाले. ते आधी धनवटे नॅशनल कॉलेज आणि नंतर नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते.

विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र ‘युगवाणी’चे तीन वर्षे (१९७१ ते १९७४) संपादन करून त्यांनी त्या मासिकाला नवा चेहरा प्राप्त करून दिला. रायटर्स सेन्टरतर्फे निघणार्‍या ‘संदर्भ’ या द्वैमासिकाचे संपादन त्यांनी १९७५-१९७६ मध्ये केले. त्यांचे काव्यलेखन आणि ललित गद्य निर्मिती १९५८ पासून सुरू झाली. सुरुवातीला ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. वृत्तबद्धता, नादानुसारी आणि लयसंपन्न आकृतिबंध हे त्यांचे काव्यविशेष होत. त्यांची कविता जितकी गूढ आणि व्यामिश्र तितकीच अनुभूतीच्या विविध पातळ्यांना स्पर्श करणारी, जाणीव-नेणिवेच्या कक्षा आणि भावावेग यांच्या अनोख्या संश्लेषणातून प्रकटणारी आहे. त्यामध्ये दुर्बोधता आहे तरीही ईश्वर, स्त्री, मृत्यू, दु:ख या आशयसूत्रांची ओढ आणि निसर्गप्रतिमा, पुराणप्रतिमा आणि स्वानुभूत प्रतीकांचे आकर्षण आणि संमोहित करणारे अर्थबहुल तरीही गूढ असे विश्व त्यांत सामावलेले आहे. अशा या थोर कवीचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -