जैसें कल्पतरूतळवटीं । बैसोनि झोळिये देतसे गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा अभागी मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो आणि मग भिक्षा मागण्यास निघतो.
तैसे शतक्रतु यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुर्खातें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे? ॥
त्याप्रमाणे शेकडो यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करितात, तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का?
म्हणौनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥
म्हणून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात, त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणोत, परंतु जे ज्ञानी आहेत, ते तो जन्ममरणरूप फेर्यात पडून त्याची हानी झाली असे म्हणतात.
एर्हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचुनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरूप माझें ॥
सहज विचार केला तरी, नरकातील दुःखाच्या मानाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणता येईल, परंतु या दोहोशिवाय अखंड, आनंददायक व निर्दोष असे जे सुख, ते माझे स्वरूप होय.
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥
हे महावीरा अर्जुना, माझ्या प्राप्तीला स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत.
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥
स्वर्गप्राप्ती पुण्यात्मक पापाने होते व नरकप्राप्ती पापात्मक पापाने होते, पण ज्या योगाने माझी प्राप्ती होते, ते शुद्ध पुण्य समज.
आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दुर्हावें पंडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥
हे पंडुसुता, माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो, त्याला पुण्य असे जर म्हटले तर जीभ तुटणार नाही काय?
वाणी ज्ञानेश्वरांची
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -