घरसंपादकीयअग्रलेखभाजप म्हणेल ती पूर्व दिशा!

भाजप म्हणेल ती पूर्व दिशा!

Subscribe

‘अब की बार चारसौ पार’ म्हणत नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रात भाजपने अनेक तडजोडी सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्वपक्षीयच नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुठे आणि कोण उमेदवार असतील याचाही निर्णय भाजप नेतृत्व ठरवत असल्याचे दिसत आहे. भाजपने आपली दुसरी यादी प्रसिद्ध केली, पण शिंदे आणि पवार गटाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपला महाराष्ट्रात कुठलाही धोका पत्करायचा नाही. त्यासाठी भाजपचे नेते जिंकून येईल, त्यालाच प्राधान्य देण्याच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच नव्हे तर सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

भाजपने महाराष्ट्रातील 23 उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे. त्याचबरोबर मनसे आणि महादेव जानकर यांनाही सोबत घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. भाजपने आपली पहिली यादी जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर केला. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे स्वप्न पाहणार्‍या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपला असे वाटत असले तरी बीडमधून उमेदवारी देऊन त्यांची कोंडीच करण्यात आली आहे. खरे तर पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रातील राजकारणातच अधिक रस आहे, पण त्यांना थेट दिल्लीत पाठवण्यात आले आहे. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी पीयूष गोयल यांना उमेदवारी दिल्याने शेट्टी गट नाराज झाला आहे. पूनम महाजन यांचे दुसर्‍या यादीतही नाव येऊ शकलेले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवून महायुती सरकार येण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या किरीट सोमय्या यांनाही पक्षाने केराची टोपली दाखवली आहे.

- Advertisement -

मुंबईत भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचे काम सुरू केले आहे. मनसेला सोबत घेण्याची भाजपची रणनीती असून राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. दक्षिण मुंबई आणि नाशिक या दोन लोकसभा मतदारसंघावर मनसेने दावा केल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे जवळकीचे संबंध असतानाही भाजपने राज ठाकरेंशी थेट बोलणी केली असून मनसेच्या दाव्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर गदा आली आहे. तिकडे बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवण्याची चाल खेळत शिंदे आणि पवार गटात संघर्षाची ठिणगी लावून देण्याचे काम भाजपकडून केले गेले आहे.

शिंदे गटाचे माजी आमदार शिवतारे पवार यांच्या विरोधात अद्यापही आक्रमकपणे बोलत असल्याने शिंदे-पवार गटातील संघर्ष उफाळून आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून दावा केला जात असतानाच माजी खासदार उदयनराजे भोसले यांना चुचकारण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले उमेदवारीसाठी गेले काही दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना भाजपने अजून ताटकळतच ठेवले आहे. पवार गटाकडून ऑफर दिली जात असली तरी उदयनराजे भोसले कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीत नाराज महादेव जानकर यांची एन्ट्री जवळपास निश्चित झाली होती, पण भाजपने अचानक जानकर यांना जवळ करून त्यांना परभणीतून उमेदवारी देण्याचे आश्वासन देत धनगर-खाटीक समाज दूर जाऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. अमरावतीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू आणि शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ अस्वस्थ झाले आहेत. बच्चू कडू यांनी उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. मंत्रीपदासाठी याआधीही बच्चू कडू यांनी उघडपणे टीका करत नाराजी व्यक्त केली होती, पण पदरी काहीही पडले नसतानाही कडू काही दिवसातच शांत झाले होते. त्यामुळे यावेळी आपल्या राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या नवनीत राणा यांनाच भाजप कमळावर उतरवत असल्याने राजकीय अस्तित्वावर गदा येत असल्याने बच्चू कडू काय भूमिका घेतात, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

तिकडे ठाकरे गटाशी उघडपणे संघर्ष करत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे दुसर्‍या यादीतही नाव न आल्याने अस्वस्थ झाले आहेत. शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्यासाठी दबाव येत असल्याने भाजपने सध्या आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एकंदरीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असले तरी लोकसभा निवडणुकीच्या नाड्या भाजपच्याच हातात आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन शिवसेनेला खिंडार पाडले. शिंदे गटाची फारशी हवा नसल्याचे लक्षात आल्यावर भाजपने अजित पवार गटाला फोडत राष्ट्रवादीची ताकद कमी केली. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा झाल्यानंतर भाजपने थेट मनसेलाच सोबत घेण्याचे ठरवले आहे. सोबत असलेल्यांना कोणती जागा द्यायची, त्यांचा उमेदवार कोण असेल, हेही भाजपचे नेतेच ठरवत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -