भारताची पहिली आशियाई स्पर्धा

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर ४ वर्षांनी आशियाई देशांमध्ये भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे ४ मार्च १९५१ साली खेळवली गेली. आशियामधील सर्व ४५ देश या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिम्पिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी ३ पदके दिली जातात.

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी असे विविध खेळ या स्पर्धेत खेळवले जातात. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आशियाई खेळांची ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेचे आयोजन १९५० सालीच करण्यात येणार होते, पण तयारीसाठी आवश्यक वेळ न मिळाल्याने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. नवी दिल्लीत पार पडलेल्या या पहिल्या आशियाई स्पर्धेत आशियातील ११ देशांतील ४८९ खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ८ खेळांना एकूण ५७ स्पर्धांमध्ये विभाजीत करण्यात आले होते

. या स्पर्धेत जपानने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली होती. जपानने २४ सुवर्ण पदके आणि एकूण ६० पदकांची कमाई करून पहिले स्थान पटकावले होते. यजमान भारताने या यादीत १५ सुवर्णसह एकूण ५१ पदकांवर आपले नाव कोरले होते आणि या यादीत दुसरे स्थान पटकावले होते. या पहिल्या आशियाई खेळाचे आयोजन करणे आणि ती स्पर्धा यशस्वी करणे या घटनेने भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.