बालवाङ्मयाचे जनक विनायक ओक

विनायक कोंडदेव ओक हे मराठीतील आद्य लघुकादंबरीकार, मराठीतील बालवाङ्मयाचे जनक होते. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८४० रोजी रत्नागिरीतील हेदवी या गावी झाला. इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतच त्यांचे शिक्षण झालेले असले, तरी इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते. शिक्षणक्षेत्रात प्रथम एक शिक्षक या नात्याने शिरून पुढे ते एक शिक्षणाधिकारी झाले.

१८६० च्या सुमारास त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. शाळेतील मुलांना पुरवणी वाचन म्हणून वाचण्यासाठी मेजर थॉमस कँडीसारखी शिक्षण खात्याशी संबंधित माणसे स्वतःही छोटी-छोटी पुस्तके लिहीत होती. अशा काळात ज्यांनी मुलांसाठी लिहिणे हेच आपले जीवित कर्तव्य मानले अशा मराठी लेखकांत विनायक ओक हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. दररोज निदान दोन पाने तरी लेखन केलेच पाहिजे, असा त्यांनी स्वतःला दंडक घालून घेतला होता.

मुलांसाठी ‘बालबोध’ या नावाचे एक मासिक काढून (१८८१) त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इत्यादी विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. एकट्या ‘बालबोध’ मासिकातच चारशेहून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. नंतर त्यांनी ‘मधुमक्षिका अथवा अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह’ या पुस्तकाचे लेखन केले. त्यात अलेक्झांडर, अकबर, सिसेरो अशा ऐतिहासिक व्यक्तींची छोटी चरित्रे, ब्रिटन देशातील राज्यव्यवस्थेची माहिती, स्टॉकहोमसारख्या शहराचे वर्णन, नारायणराव पेशवे यांच्या शेवटाची हकीकत अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. अशा या प्रतिभावान लेखकाचे ९ ऑक्टोबर १९१४ रोजी निधन झाले.