घरमहाराष्ट्रठाकरेंचा पक्ष, चिन्ह चोरले; अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

ठाकरेंचा पक्ष, चिन्ह चोरले; अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Subscribe

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दौर्‍यावर आलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी रात्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्हाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत. भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाही. त्यांना आमची भीती वाटते म्हणूनच ते ईडी, सीबीआयचा वापर करतात. शेवटी सत्याचाच विजय होईल. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोबत कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाचेही केजरीवाल यांनी कौतुक केले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्लीतील जनतेने आम्हाला बहुमत देऊनही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्यांवर विचार करतो, पण या देशात एकच पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबद्दल विचार करतो, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला. केंद्राने तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले होते, पण आज देशातील तरुण बेरोजगार आहेत. महागाई सातत्याने वाढत आहे, तर केंद्र सरकार ठरावीक उद्योजकांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारी संस्था विकत सुटले आहे. एलआयसी तोट्यात गेली आहे. या देशामध्ये लुटालूट सुरू आहे. ती थांबली पाहिजे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

- Advertisement -

पंजाब आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग पंजाबमधून तर राजगुरू महाराष्ट्रातून होते. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. आता हा देश कसा पुढे जाईल आणि जगातील क्रमांक एकचा देश कसा बनेल याचा विचार आपण केला पाहिजे. चांगल्या विचारांचे लोक एकत्र आले तर देशाचे कल्याण करता येईल. आज प्रत्येक घराला रोजगार आणि अन्नधान्य मिळेल यावर चर्चा झाली, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.

राज्य सरकारचे अभिनंदन : ठाकरे

- Advertisement -

मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या राज्य सरकारने इतर निर्णयांप्रमाणे या निर्णयाला स्थगिती न देता तो कायम ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार पडत असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता असे म्हटले आहे. त्याबाबत विचारले असता आता ते सर्व जुन्या गोष्टी काढत आहेत. १४५५ साली काय झाले हे पण ते आता काढतील. त्यांच्याकडे काही रेकॉर्ड असेल तर त्यांनी सांगावे, असेही ठाकरे म्हणाले.

राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो या फडणवीसांच्या विधानाबद्दल विचारले असता आम्ही पण राजकारणात कोणी शत्रू नाही याच मानसिकतेत होतो, पण ज्या पद्धतीने शिवसेना आणि कुटुंबाशी ते वागत आहेत हे मतभेदाचे लक्षण नाही. देशातील लोकशाही ७५ वर्षेच टिकणार का आणि ती टिकविण्याचे काम त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -