लोकप्रिय समाजवादी नेते यदुनाथ थत्ते

यदुनाथ थत्ते यांचा आज स्मृतिदिन. यदुनाथ थत्ते हे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि लोकप्रिय समाजवादी नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी नाशिकमध्ये झाला. साधना साप्ताहिकातली पत्रकारिता सांभाळून त्यांनी पुष्कळ लेखन केले. त्यांनी लिहिलेली डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीश्चंद्र बोस यांची चरित्रे खूप गाजली. ऑरिसन स्वेट मार्डेनच्या ‘पुशिंग टू दी फ्रंट’ या पुस्तकावर आधारित त्यांनी लिहिलेली ‘पुढे व्हा’ ही तीन भागांतली पुस्तकमाला प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

‘साने गुरुजी’, ‘यशाची वाटचाल’, ‘आटपाट नगर होते’, ‘आपला वारसा’, ‘चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी’, ‘समर्थ व्हा’, ‘संपन्न व्हा’,‘आपला मान आपला अभिमान’,‘विनोबा भावे’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. लहान मुलाने जेवढ्या उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तेवढ्याच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा याचसोबत वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध ते घेत असत. हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

यदुनाथ थत्ते यांची एकूण दीडशे पुस्तके प्रकाशित झाली. त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणार्‍या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लीम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकेही त्यात होती. मात्र, या माणसाचा मोठा विशेष. माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही होता. अशा या महान चरित्रकाराचे १० मे १९९८ रोजी निधन झाले.