सर सय्यद अहमद खान यांचा आज स्मृतिदिन. सर सय्यद अहमद खान हे विख्यात विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरू होती. परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता. पवित्र कुराण, गुलिस्ताँ, बोस्ताँ यांसारखे फार्सी ग्रंथ, काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले.
गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले. बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर त्यांची १८५५ मध्ये नेमणूक झाली. त्यांनी उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले (१८७५). मुसलमान तरुणांना उदार, आधुनिक शिक्षण मिळावे, हा हेतू त्यामागे होता. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर १८७६ मध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला.
१८७८ मध्ये व्हाईसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. १८८३ मध्ये अलीगढमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे १८८६ मध्ये त्यांनी मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते.
बरानीचे तारीख-इ-फिरोझशाही, अबुल फज्लचीआइन-ए-अकबरी, जहांगीरचे तुझुक हे ग्रंथ त्यांनी संपादिले. बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले (तबियिन-उल-कलाम). धर्मांच्या तौलनिक अभ्यासाचा हा पहिला प्रयत्न मानला जातो. १८५७ च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्टरी ऑफ बिजनोर आणि हिस्टरी ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. अशा या व्यासंगी शिक्षणतज्ज्ञाचे २७ मार्च १८९८ रोजी निधन झाले.