घरसंपादकीयअग्रलेखसोयीची साधनशुचिता!

सोयीची साधनशुचिता!

Subscribe

अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात रंग भरू लागले असून, अनेकांची अवस्था ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्याविना करमेना’ अशी झाली आहे. एकत्र चर्चा होतायत काय आणि पुढच्या क्षणाला वेगळ्या चुली काय मांडल्या जातायत काय, सारंच अजब आहे. रासपचे महादेव जानकर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत गुफ्तगू करीत होते. सोलापुरातील माढा मतदारसंघात ते आघाडीकडून लढणार असे वातावरण तयार झालेले असताना जानकर यांनी भाजपच्या जुन्या मैत्रीला जागून देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारत मी तुमचाच असे सांगून टाकले.

बहुधा त्यांना महायुतीकडून परभणी किंवा बारामतीची जागा मिळेल अशी शक्यता आहे. बारामतीची जागा मिळाली तर अजित पवारांनी लढाईपूर्वीच तलवार म्यान केली असा संदेश पोहचेल. राजकारणात विश्वासार्हता जवळपास संपुष्टात आली आहे. कोण कधी स्वतःला दुसर्‍याच्या गळी उतरवेल हे भल्याभल्या राजकीय पंडितांनाही सांगणे अशक्य झाले आहे. भाजप आणि काँग्रेसकडून अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले असले तरी काही ठिकाणी घोडं अडून बसलं आहे. भाजपची पाचवी यादी जाहीर झाली तरी महाराष्ट्रातील भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटत नसून मुंबई, दिल्ली येथे जोर-बैठका सुरू आहेत.

- Advertisement -

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना जागावाटपात तोडगा निघत नाही. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाची धडधड वाढली असणार यात शंका नाही. अजित पवार सहा जागांवर ठाम आहेत, परंतु त्यांच्या पदरात चारच जागा पडतील अशी शक्यता आहे. बारामती, सातारा, रायगड, शिरूर यासह धाराशिव आणि परभणीची जागा मिळावी असा पवार गटाचा आग्रह आहे. रायगडमध्ये पवार गटाच्या उमेदवारीवरून जर-तर सुरू आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सुनील तटकरेंचे उमेदवारी स्वत:च जाहीर करून टाकली आहे.

दोन अंकी जागा मिळणार असे सांगणारे अजित पवार बरेचसे बॅकफूटवर आलेले आहेत. त्यात सातार्‍यात उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट नाकारले तर ते राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतही बंडखोरीची लागण मोठ्या प्रमाणावर होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. बारामती, नगर, नाशिक, सातारा या मतदारसंघांतून बंडखोर कमालीचे सक्रिय झाल्याने महायुतीची हा गुंता सोडवताना दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील बंडखोर मित्रपक्षांचेच आहेत. या बंडखोरांची शिंदे, फडणवीस, पवार कशी समजूत घालणार हा औत्सुक्याचा भाग असला तरी विद्यमान परिस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी बंडखोरी अटळ आहे.

- Advertisement -

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी दंड थोपटल्याने त्यांची समजूत काढताना शिंदे गटाच्या नाकी नऊ आले आहेत. नाशिक मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट आणि भाजपने दावा ठोकला आहे. अशीच काहीशी परिस्थिती रायगडमध्ये आहे. भाजपलाही रायगडची जागा हवी आहे, तर अजित पवार गटाने ही जागा आपली असल्याचे अगोदरच सांगून टाकले आहे. दक्षिण नगरमध्येही विखे-पाटील आणि राम शिंदे गटात सुंदोपसुंदी सुरू आहे.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे एकदा शरद पवारांना काय भेटतात, तर दुसर्‍यांदा देवेंद्र फडणवीसांना! हा भेटीचा मामला महादेव जानकर यांच्याप्रमाणेच आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा केलेल्या वंचित बहुजन आघाडीचेही असेच आहे. आता तेथे त्यांचे काही जमेल असे वाटत नसल्याने ते नेहमीप्रमाणे वेगळी चूल मांडतील. गेल्या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला काही जागांवर फटका बसला होता. तसा तो यावेळी कुणाला बसणार हे ४ जूनलाच समजणार आहे.

राजकारणात काहीच शाश्वत राहिलेले नाही. साधनशुचितेच्या नावाखाली राजकीय सौदेबाजी सुरू आहे. यापूर्वीही उमेदवारीवरून रुसवे-फुगवे असत, परंतु त्यासाठी दिल्ली-मुंबई वार्‍या कराव्या लागल्या असे अभावाने दिसत असे. आता उमेदवारी दिली नाही की कसली तरी आमिषे दाखविण्यात येतात. तावातावाने बोलणारे काही क्षणात गोगलगायीसारखे ‘गरीब’ होऊन जातात.

मध्यंतरी कोकणातील एक नेते उच्चरवाने आपल्याच मित्रपक्षावर यथेच्छ तोंडसुख घेत होते, परंतु त्यांच्या मुलाला लाभाचे पद मिळताच हे महाशय चिडीचूप झाले. लोकसभा निवडणूक तिकीट वाटपाच्या वेळी हेच होणार आहे. त्यामुळे आजचे काही बंडोबा थंडोबा झाले तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. निवडणुकीच्या वेळी राजकीय सौदेबाजी करून आपल्या तुंबड्या भरून घेणार्‍यांना मतदारांनी दूरच ठेवले पाहिजे. गेल्या काही वर्षांत राजकीय सौदेबाजीने कळस गाठला आहे.

आज ती करणारे निवडून आले आणि उद्या स्वार्थासाठी सौदेबाजी करून दुसरीकडे गेले तर या निवडणुकीला अर्थच राहणार नाही. मतदार जनताही याकडे आता निमूटपणे पाहत आहे. आपल्या देशाची लोकशाही परिपक्व असल्याचे आपण म्हणतो, पण याच लोकशाहीत सौदेबाजांचे उखळ सदैव पांढरे होणार असेल तर त्या लोकशाहीला काही अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात सौदेबाजीला ऊत येणार आहे. यातील निवडून येणारे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणार आहेत. आपण फक्त म्हणायचे, मतदारांनी कौल दिलाय, तो आपण स्वीकारला पाहिजे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -