घरसंपादकीयभय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही…

Subscribe

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवाधिकांचे महत्वही अतोनात वाढलेले आहे. त्यामुळेच नवस बोलणे, देवाने किंवा देवीने नवसाला पावणे, अभिषेक, आराधना, होम हवन, व्रतवैकल्य या गोष्टींनी सध्या जोर धरलेला दिसत आहे. याचा अर्थ पूर्वी या गोष्टी होत नव्हत्या अशातला भाग नाही, पण सध्या त्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, त्यामुळे लोकांच्या नजरेला या गोष्टी येत आहेत आणि त्यावर चर्चेचे फड रंगत आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवाधिकांचे महत्वही अतोनात वाढलेले आहे. त्यामुळेच नवस बोलणे, देवाने किंवा देवीने नवसाला पावणे, अभिषेक, आराधना, होम हवन, व्रतवैकल्य या गोष्टींनी सध्या जोर धरलेला दिसत आहे. याचा अर्थ पूर्वी या गोष्टी होत नव्हत्या अशातला भाग नाही, पण सध्या त्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, त्यामुळे लोकांच्या नजरेला या गोष्टी येत आहेत आणि त्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. त्यात पुन्हा इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्या, वेब पोर्टल, विविध वेबसाईट्स आणि सर्वात मोठे वेगवान प्रसार माध्यम म्हणजे सोशल मीडिया यामुळे हे जे काही सुरू आहे, ते लगेच लोकांपर्यंत पोहोचते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त नाशिकाला गेले होते. त्यानंतर त्यांचा मुंबईला येणारा ताफा अचानक एका देवळाकडे गेला, तिथे जाऊन त्यांनी अभिषेक केला. तिथे त्यांनी एका जोतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतले, त्यांनी आपला हात त्यांना दाखवला, अशी माहिती सगळीकडे पसरली. त्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असे करावे, यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका सुरू केली.

ज्या व्यक्तीला स्वत:चे भविष्य माहीत नाही, तो राज्याचे भविष्य काय घडवणार, अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही जे करायचे ते उघड करतो. हात दाखवायचा होता, तेव्हा आम्ही त्यांना दाखवला. फलज्योतिषाचा आधार घेण्याच्या मुख्यमंत्र्याच्या कृतीवर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्षेप घेतला. खरेतर श्रद्धेचा अतिरेक झाला की, त्याचे अंधश्रद्धेत रूपांतर होते. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये बारीक रेषा असते, ती कोण कधी ओलांडेल हे सांगता येत नाही. बहुधा ज्यावेळी माणसांच्या जीवनात अनिश्चितता वाढते तेव्हा ती व्यक्ती फलज्योतिषी किंवा अन्य कुठल्या माध्यमातून आपले भविष्य सांगणार्‍या व्यक्तीकडे वळते. एखाद्याच्या जीवनात सतत काही अडथळे निर्माण होत असतील, तर त्यावेळी दृश्य घटक जेव्हा आपल्याला सहाय्यभूत ठरत नाहीत, तेव्हा कुठले तरी अदृश्य घटक आपली यातून सुटका करतील का, अशी त्याला आशा वाटते. जेव्हा माणूस संकटात सापडलेला असतो, तेव्हा गरजवंताला अक्कल नसते, या न्यायाने तो कुणाच्याही बोलण्याप्रमाणे कृती करू लागतो. जेव्हा एखादा ज्योतिषी म्हणतो की, मी यातून तुम्हाला मार्ग दाखवतो, तेव्हा तो नेता त्याच्या गळाला लागतो.

- Advertisement -

सगळ्या क्षेत्रात जर कुठले अस्थिर क्षेत्र असेल तर ते राजकारण आहे. राजकारणात बदलांचा वेग हा सर्वात जास्त असतो. तुमच्या सोबत काही वेळा पूर्वी पंगतीत जेवायला बसलेले लोक कधी तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लावतील आणि तुम्हाला उलथवून पाडतील, ते कळत नाही. कारण इथे प्रत्येकाला खुर्ची आणि पद मिळवण्याची महत्वाकांक्षा असते. त्यासाठी सगळी शक्ती एकवटून माणूस राजकारणात उतरतो. त्यामुळे राजकारणात जसा मानमरातब मिळतो तशीच अनिश्चितता कायम नेत्याची सोबत करत असते. त्यामुळेच राजकारणात असलेल्या नेत्यांना नेहमी स्वत:बद्दल आणि सत्तेबद्दल पुढे काय होणार याची चिंता सतावत असते. परिणामी यांना गुरू, फलज्योतिषी, हस्तरेखांचे जाणकार किंवा आध्यात्मिक गुरूंचा आधार शोधावा लागतो. केवळ एकनाथ शिंदे यांनी आपले भविष्य जाणून घेतले किंवा कुणाला हात दाखवला म्हणून त्यांनी काही घोर अपराध केला आणि त्यांच्यावर टीका करणारे त्यांचे राजकीय विरोधक हे काही निष्कलंक आणि निडर आहेत, अशातला भाग नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांचे मार्गदर्शक, आध्यात्मिक गुरू असतात. ही मंडळी गुप्तपणे विविध गुरूंना बोलवून आपल्या निवासस्थानी किंवा गुप्त ठिकाणी विधी करून घेत असतात. याची अनेक उदाहरणे वेळोवेळी पुढे येत असतात, पण बोलताना बरेचजण आपण पुरोगामी असल्याचा आव आणत असतात.

मनाला जेव्हा अनिश्चिततेचा विळखा पडलेला असतो, तेव्हा माणूस सुरक्षितेचा शोध घेत असतो, त्यासाठी त्याची धडपड सुरू असते. २०१९ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आव्हान देणार्‍या अनेक कर्मकांडांनी जोर धरला. ही विधानसभा निवडणूक म्हणजे एक औपचारिकता आहे, त्यामुळे मी पुन्हा येईन, असा ठाम विश्वास सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत होता, पण तो शिवसेनेने अकल्पित भूमिका घेतल्यामुळे फोल ठरला. त्यामुळे भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील नेते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यानंतर राज्यात सुमारे अडीच वर्षे सगळ्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणा महाराष्ट्रात वेगाने कार्यरत होत्या, जसे देशातील सगळे चोर आणि घोटाळेबाज महाराष्ट्रातच आहेत. शेवटी शिवसेनेत नाराज असलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५० आमदारांना बाहेर पडण्याचा रस्ता भाजपने दाखवला. त्यांना अगोदर एकदम सुरक्षित अशा भाजपशासित गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना गुवाहाटीला हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे नेण्यात आले. सुरुवातीला भाजपवाले यात आमचा काही हात नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, असे म्हणत होते, पण पुढे यामागे भाजप होता, हे स्पष्ट झाले.

- Advertisement -

शिंदेसोबत शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांच्या डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार होती. आपले पुढे काय होणार याचा त्यांना अंदाज येत नव्हता. त्यात पुन्हा बंड केल्यामुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्रात शिवसेनेतून संतापाची लाट उसळली होती. त्यांच्याविरोधात टोकाच्या धमक्यांची भाषा बोलली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रात कसे याचचे असा प्रश्न त्यांना पडला होता. एका बाजूला झाडी, डोंगर आणि अलिशान हॉटेल याचे सुख होते, पण त्याचवेळी गुवाहाटीला आलाय, पण पुन्हा महाराष्ट्रात कसे जाणार ही चिंता त्यांना सतावत होती. त्याचवेळी त्यांनी तेथील कामाख्या देवीला या अनिश्चिततेतून मार्ग निघू देत, अशी प्रार्थना केली. पुढे भाजपने त्यांना गुवाहाटीहून मोठ्या संरक्षणात अगोदर गोव्यात आणले आणि त्यानंतर महाराष्ट्रात थेट विधानसभेत आणले. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. कामाख्या देवीने आपले मागणे मान्य केले आणि सरकार स्थापन झाले म्हणून शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले होते. त्यावर महाविकास आघाडीतील विशेषत: शिवसेनेकडून प्रखर टीका करण्यात आली. शिंदे जसे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते, तसे उद्धव ठाकरे हे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनाला जाऊन आले. त्यामुळे एकमेकांकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणून बोटे दाखवली तरी सगळेच गरज पडली की, माथा टेकवतात हे खरे. बाकी सब झूट.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -