घरसंपादकीयओपेड जीवनभर अहिंसेची पाऊलवाट चालणारा महात्मा 

 जीवनभर अहिंसेची पाऊलवाट चालणारा महात्मा 

Subscribe

महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन म्हणजे माणूसपणाच्या उंचीवरचा प्रवास होता. गांधीजींना कोणी महात्मा म्हणते, कोणी राष्ट्रपिता, काहींनी प्रेमाने त्यांना देवत्व बहाल केले.. पण गांधी या पलीकडे माणूस होते.. त्यांच्यात माणूसपणाच्या संवेदना इतक्या ठासून भरल्या होत्या की, हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला असेल त्यावर भविष्यकाळ विश्वास ठेवणार नाही ही जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी वाहिलेलेल्या श्रद्धांजलीचे शब्द आजही तंतोतंत खरे ठरतात. आजही असा माणूस भारतात जन्माला आला होता यावर वर्तमानही विश्वास ठेवत नाही.

– संदीप वाकचौरे
 विज्ञानात असलेला मानव सामाजिक शास्त्रात माणूस होतो. मानवाचे माणसात रूपांतर होण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. जीवन प्रवासात मानवाचा माणूस होण्यासाठी चालावी लागणारी पाऊलवाट म्हणावी तितकी सोपी नाही. पराकोटीचा त्याग, सत्य, अहिंसा, प्रेम, करूणा आणि सामाजिक जाणिवांच्या उंचीवर सतत उभे राहावे लागते. चांगले विचार सांगून चालत नाही, तर त्या वाटेवर चालण्याचा अखंड प्रवास महत्वाचा ठरतो. जीवनभर विचाराशी बांधिलकी स्वीकारात विवेकाची वाट चालत राहणारी माणसं मोठी असतात. महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन म्हणजे माणूसपणाच्या उंचीवरचा प्रवास होता. गांधीजीना कोणी महात्मा म्हणते, कोणी राष्ट्रपिता, काहींनी प्रेमाने त्यांना देवत्व बहाल केले.. पण गांधी या पलीकडे माणूस होते.. त्यांच्यात माणूसपणाच्या संवेदना इतक्या ठासून भरल्या होत्या की, हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला असेल त्यावर भविष्यकाळ विश्वास ठेवणार नाही ही जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी वाहिलेलेल्या श्रद्धांजलीचे शब्द आजही तंतोतंत खरे ठरतात. आजही असा माणूस भारतात जन्माला आला होता यावर वर्तमानही विश्वास ठेवत नाही. एकाचवेळी प्रचंड लोकप्रियता आणि त्याचवेळी त्यांच्या विचाराचे शत्रूही, पण तरीसुद्धा या माणसाचा अखंड जीवन प्रवास माणूसपणाचाच होता. कारण एखाद्या माणसावर लाखावर पुस्तके लिहिली जावीत हे त्यांच्या माणूसपणाची उंची अधोरेखित करणारा नाही का?
       गांधीजींच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले, मात्र त्यांनी कधीच त्या संघर्षाला हिंसेने उत्तर देण्यासाठी हात उगारले नाहीत. किंबहूना तसा विचारही मनात डोकावला नाही. अखंड जीवनभर सातत्याने अंहिसेची पाऊलवाट चालणे पसंत केली. जेव्हा स्वतःला मारण्यासाठी माणसं आली होती, तरी पण हा माणूस आपल्या तत्वांवरती निस्सिम प्रेम करीत राहिला. त्यांनी मारेकर्‍यालादेखील माफ केले. त्यामुळे गांधी यांची तुलना त्यांच्या प्रत्येक अनुभवानंतर कोणी संताशी करीत होते, तर कोणी ईश्वराशी करू पाहत होते. जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेत्या रोमा लोला यांनी गांधीजींबद्दल बोलताना  म्हटले आहे की, गांधी हे दुसरे येशू होते. परोपकार येशूइतकेच आहेत. निराशेच्या छायेत गांधी हीच आशा.  गांधींच्या समग्र जीवन प्रवासाकडे आपण पाहिले, तर भगवान येशूंनी ज्या पद्धतीने  क्रुसावरती लटकविणार्‍यांना माफ केले, ती उदारता गांधीजींमध्येदेखील ठासून भरली होती. भगवान येशूंनी त्यांना चावणार्‍या कुत्र्यावरती हात न उगारता चावणार्‍या दातात सौंदर्याचा अनुभव पाहिला होता, त्याप्रमाणे गांधीजींच्या प्रत्येक व्यवहारात ती करूणा ठासून भरली होती. ही तुलना म्हणजे गांधीजींचा जीवन प्रवासाची दिशा स्पष्ट करणारी आहे. रोमा लोला यांनी तेव्हा जे म्हटले होते की, निराशेच्या छायेत गांधी हीच आशा आहे. वर्तमानात जाती, धर्माच्या भिंती अधिक भक्कम उभ्या राहाता आहेत. विषमता, व्देष, मत्सर ठासून भरलेला आहे अशावेळी आज आपल्यालादेखील गांधी हीच एकमेव आशा आहे. आपला धर्म आणि त्यांचे मोठेपण जगाने मान्य करावे म्हणून आपण कोणावर लादणे हा धर्माभिमान नाही. मुळातः धर्माचे आचरण माणूसपणाच्या दृष्टिकोनातून करणे हे धर्म आचरण होते. म्हणून गांधीजींना अवघ्या जगात अनुयायी मिळाले होते.
      गांधीजींचा मानव ते माणूस प्रवास जेथून अधोरेखित होतो तो आफ्रिकेतील रेल्वेतून साहित्य फेकून देणे, त्या घटनेनंतर रेल्वेस्टेशनवरती थंडीत कुडकुडत रात्र काढणे, यातून संघर्षासाठी सत्याग्रहाचा मार्ग अनुसरणे..हिंसेपासून स्वतःला आणि तेथील भारतीयांना दूर ठेवणे हे त्या तरुणपणातील तरुणांच्या जीवन प्रवासाची दिशा स्पष्ट करणारा आहे. गांधीजींवरती दक्षिण आफ्रिकेत आलम मीर या पठाणाने गैरसमजेतून हल्ला केला होता. गांधीजींवरती हा  प्राणघातक हल्ला झाल्यानंतर गांधी बेशुद्ध पडले. मारेकर्‍यांना वाटले गांधीजी मरण पावले. आपला हेतू साध्य झाला असे समजून ते घटनास्थळावरून पळून गेले. काही काळाने गांधीजी शुद्धीवर येताच त्यांनी आलम मीर व त्याच्या सोबत सहकार्‍यांची चौकशी केली. त्यांना सांगण्यात आले की त्यांना अटक करण्यात आली आहे. खरेतर अटक होणे हे कायदेशीर होते. गांधीजींवर झालेला हा हल्ला म्हणजे त्यांच्यासाठी जणू मृत्यूचाच मार्ग होता. त्यावेळीदेखील गांधी माणसांसारखेच वागले. त्यांनी तात्काळ त्या मारेकर्‍यांना सोडून द्या असा आदेश दिला. काय म्हणायचे या माणसाला.. ? हे वर्तन संतापेक्षा वेगळे होते का?  एकदा सभा सुरू होती. सभा संपल्यानंतर एक जण गांधींना व्यासपीठाच्या मागे घेऊन जातात. गांधीजी त्यांच्यासोबत बरेच पुढे चालत जातात. चालता चालता त्यांच्याशी संवाद सुरू होता. अनेकांना कळत नव्हते  की ते का चालता आहेत? काही वेळाने गांधीजी पुन्हा माघारी फिरतात. तेव्हा त्यांच्या हातात एक वस्त्र असते आणि त्या वस्त्राच्या आत काही वस्तू होत्या. तेथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना विचारले यात काय आहे? तेव्हा ते म्हणतात  त्यात फिस्तूल आहे. ते ऐकून उपस्थिकांना धक्का बसतो.. पण कशासाठी आणले होते? तो मारण्यासाठी आलेला होता. मग त्याच्या विरोधात तक्रार का केली नाही? बोलता बोलता त्याचे मन परिवर्तन झाले. तक्रार केली तर पुन्हा तो आणखी एक संधी शोधेल असे गांधीजींनी सांगितले. गांधीजी माणूसपणाच्या किती उंचीवर होते हे सहजतेने लक्षात येईल. गांधीजीवरती सुमारे चारवेळा प्राणघातक हल्ले झाले होते, पण त्यांनी कधीच मारेकर्‍यांविषयी तक्रार केली नाही. उलट ज्यांनी हल्ले केले त्यांचे पुढे मतपरिवर्तन झाल्याचे पहावयास मिळते. ज्या आलम मीरने प्राणघातक हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला तोच आलम मीर पुढे गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नौवाखालीत दगंल पसरली होती. धर्मभेदाच्या भिंती अधिक घट्ट झाल्या होत्या. गांधीजी ती शमविण्यासाठी तेथे फिरत होते..अगदी अनवाणी पायानी. गांधीजी मुस्लीम समूहाला भेटत होते..हिंदू समूहाला भेटत होते, मात्र दोन्ही समूहात ठासून व्देष पसरला होता आणि दोन्ही समूह गांधीजी आपले नाही, तर समोरच्या समूहाचे प्रतिनिधी आहेत असे मानत होते. त्यातच त्यांचा व्देष करणारे लोक त्यांच्या वाटेवर विष्ठा टाकत होते, मात्र गांधीजी आपल्या कामात स्वतःला गुंतून घेत होते. त्यांना इतका अपमान, त्रास होत असतानादेखील आपल्या कामावरील श्रद्धेपासून दूर न जाता, कोणाचाही मत्सर न करता सतत कार्यरत राहिले. आपण काय करीत आहोत? याची त्यांना पूर्णतः जाणीव होती. गांधीजींच्या जीवन प्रवासात त्यांचे शत्रूंचेदेखील मतपरिवर्तन त्यांच्या सहवासात आणि विचाराने होत होते. मुळात सहवासात आल्यानंतर व्यक्तीचे परिवर्तन होणे म्हणजे त्यांच्या वर्तनातदेखील त्याच्या विचाराचे प्रतिबिंब होते. गांधीजी अखंडपणे निर्मळतेने जीवन जगत होते. आपल्याला जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी साधनदेखील शुद्ध असायला हवे. गांधीजींची साध्यता ज्या उंचीला दिसते त्याचे कारण त्यांची जीवनभर वापरलेली साधने होते. इंग्रज राजसत्ता कितीही हिंस्त्र व वाईट असली तरी त्यासाठी त्यांनी अंहिसेचा विचार करत सत्याग्रह, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह ही साधने कितीतरी साधी होती, पण त्या साधनाची शुद्धता कोणी नाकारणार नाही. गांधीजींच्या अंतकरणात कधीच कोणाहीबद्दल व्देष नव्हता. त्यांना मोहदेखील नव्हता. उलट सतत म्हणायचे आपण समाजाचे विश्वस्त आहोत. आपल्यावरती काही जबाबदारी आहे. त्यामुळे आश्रमात जेवणासाठी ते सतत भोपळा किंवा जे स्वस्त असेल त्या भाज्या आणून खाण्याकडे कल असायचा. आश्रमातील लोक वैतागायची, पण गांधींनी मात्र पैसे खर्च करण्यावरती निर्बंध कायम ठेवले. आपणाकडे पैसे अधिक असले तरी त्या पैशावरती गरिबांचादेखील अधिकार आहे. त्यामुळे आपण श्रीमंत असाल तर त्या पैशावरती आपली एकट्याची मालकी नाही हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या प्रत्येक कृतीत गांधीजींच्या सोबत सामान्याचा विचार होता.
गांधीजी जीवनभर सामान्य माणंसासारखे जगत राहिले. त्यांनी आपल्या महात्मापणाचे ओझे कधीच मस्तकावरती घेतले नाही. आश्रमात स्वतःचे काम स्वतः करण्याकडे त्यांचे लक्ष असायचे. भाजी चिरणे असेल तर तेही करायचे. स्वच्छता करण्यासाठी ते काम करीत असायचे. गांधीजी नेहमीच सामान्य माणसं जशी जगत होती, तसेच जगणे पसंत करत होते. त्यामुळे गांधीजी महात्मा होते..त्यांचे ते महात्मेपण हे त्यांच्या सामान्यपणाच्या वागण्यात होते हे विसरता येत नाही. त्यांचा विरोध केला, टीका केली तरी ते प्रत्येकावरती प्रेमच करत राहिले. त्यामुळे गांधीजी माणूसपणाच्या एका उंचीवर होते हे विसरता येत नाही. त्यांची वृत्ती जगभरातील राज्यकर्त्यांना लाभली, तर जग शांततेच्या वाटेने चालत राहील.
संदीप वाकचौरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -