घरसंपादकीयओपेडछत्रपती शिवाजी महाराजांवरून वाद सुरू... निवडणुका जवळ आल्या!

छत्रपती शिवाजी महाराजांवरून वाद सुरू… निवडणुका जवळ आल्या!

Subscribe

महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता ठेवण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नशील आहेत. या वादाच्या वणव्यात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना हवे तसे वापरले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कट्टर हिंदुत्ववादी रंगात रंगवल्याचा आरोप शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर अनेकदा केला गेला आहे. हे खरे आहे की शिवाजी महाराजांची मांडणी विविध राजकीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या रंगात केली गेली आहे. एक निव्वळ घटना आणि त्यांची समकालीन, विश्वासार्ह साधनांनी केलेली शहानिशा व दुसरे म्हणजे त्या घटनांच्या साखळीचे विश्लेषण करून काढलेले निष्कर्ष. जेव्हा छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल वाद निर्माण केले जातात, तेव्हा समजायचे की निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकारण्यांनी त्यांच्या प्रचाराचा हुकमी राजा प्रचारात उतरवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन व्यक्ती मराठी मातीतला चमत्कार म्हणावे अशा होत्या. जवळपास चारशे वर्षे होत आली तरी मराठी मनावरून महाराजांचे गारुड उतरण्यास तयार नाही. कितीही खोल जावे तरीही थांग लागू नये अशीच ही दोन व्यक्तिमत्व. मात्र राज्यात विशेषत: निवडणुकांचे वारे वाहू लागले की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाने नवनवे वाद निर्माण केले जातात अणि मतांच्या आपापल्या पोळ्या भाजल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि उदंड भक्तीभावाचा विषय आहे.
छत्रपती हे आमचे ऊर्जास्थान, प्रेरणास्थान! मात्र हल्ली या जाणत्या राजाच्या नावाभोवती वादाचे वादळ घोंघावू लागले आहे.

हे वाद जातीय, राजकीय खरे, पण ते निव्वळ अजाणतेपणामुळे सुरू झालेत असे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे महाराष्ट्रधर्माच्या हिताचे नाही. छत्रपतींच्या नावावर राजकारण करायचे आणि छत्रपतींचा एकही गुण आपल्यात कसा येणार नाही याची पुरेपूर काळजी सर्वपक्षीय राजकारण घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊमाता यांचा आपल्या सोयीने उपयोग करायचा आणि निवडणुका जवळ आल्या की त्याचेच भांडवल करून मतांचा जोगवा मागताना राजकारणी, अभ्यासकर्ते त्या त्या पक्षाप्रमाणे वाटले गेलेत. त्यामुळे ज्या छत्रपतींच्या नावावर अनेकांनी राजकीय पक्ष, संघटना काढल्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे काहीच गुण घेतलेले नाहीत. मात्र जी घराणी शिवाजी महाराजांची वंशवेल पुढे नेत असल्याचा दावा करतात त्या घराण्यांच्या वंशजांमधूनही छत्रपतींचे महत्व समाजाला पटवून देण्यात ते कुठे तरी कमी पडत आहेत, असेच म्हणावे लागेल.

- Advertisement -

कारण जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची घराणी ही राजकारणात येऊ लागली तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे वाटले गेले. कधी ते काँग्रेस विचाररसणीचे तर कधी भाजपप्रमाणे दिसू लागले. सुरुवातीला शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदर्श मानणार्‍या या राज्यकर्त्याकडून काहीच शिकवण घेतली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ यायला लागल्या, तेव्हा तेव्हा छत्रपतींचा इतिहास हा त्या त्या राजकीय पक्षाच्या फायद्यानुसार नव्याने मांडण्यात आला. कित्येकदा तो इतिहास तोडून मोडून मांडण्यात आला. कधी तो छोट्या पडद्यावरील सीरियलमधून, कधी पुस्तकातून, कधी चित्रपटातून, कधी कधी इतिहास संशोधकांच्या निवेदनातून तर कधी स्वयंघोषित नेत्यांकडून शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही तरी विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नव्या पिढीसमोर मांडण्यात आला. त्यामुळेच आता नव्याने ‘हर हर महादेव’… चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांबाबत नवी माहिती दिग्दर्शकाने मांडली तेव्हा माजी खासदार, छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजेंनी त्याला विरोध दर्शविला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेत माजी मंत्री आणि मुंब्याचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील या चित्रपटाचा शो बंद केला. त्यामुळे लगेच मनसेने हा चित्रपट शिवप्रेमींसाठी मोफत पाहण्यासाठी विशेष आयोजन करीत आता ‘हर हर महादेव’… याला मनसे संरक्षण देण्याचा जणू संकल्पच केला.

मुळात सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील दिल्यानंतर हे तथाकथित राजकारणी कोणत्या अधिकारात चित्रपटाचा शो बंद करतात. तसेच ऐतिहासिक अशा चित्रपटांच्या नामावलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वारसदार यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केल्यानंतर पुन्हा अचानक कशी काय जाग अनेकांना येते. मग त्यात संभाजी ब्रिगेड, मराठा संघटना उतरतात आणि चित्रपटाचे शो बंद करण्यासाठी पुढे येतात. महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर जर काणेतीही कलाकृती किंवा लिखाण करायचे असल्यास राज्य सरकारने एक संशोधन समिती नियुक्त करावी. त्यांच्यापुढे चित्रपटात काय दाखवणार, पुस्तकात काय लिहिणार किंवा मालिकांमधून छत्रपतींचे कोणते रूप दाखवणार याबाबत कडक आचारसंहिता बनवायला हवी. त्यांच्या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही इतिहास पुरुषावर कोणतेही चित्रण व्हायलाच नको अशी अट घालणे आवश्यक झाले आहे. कारण कुणीही सोमा गोम्या हातात पेटी-खोके नाचायला लागले की आपल्या थोर महापुरुषांवर कलाकृती काढणार आणि निर्माता दिग्दर्शक काही लाखांच्या बदल्यात इतिहासाशी प्रतारणा करणार हे आता खपवून घेऊ नये.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे. महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी १९ फेब्रुवारी १६३० तर कोणी ८ एप्रिल १६२७ तर कोणी तिथीप्रमाणे जयंती साजरी करावी. यासारखे वाद घातले जातात. यातून नेमका कोणता संदेश आणि कोणत्या इतिहासकारांचा इतिहास आजच्या तरुणांसमोर दिला जातोय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरे खुरे रयतेचे राजे होते. राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीचे आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरले आहेत.

शिवरायांच्या नावाने मतांची भीक मागत फिरकत आहेत. मावळ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय लढवय्ये नक्कीच होते, परंतु विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जातीधर्मासाठी संघर्ष करणारे राजेे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो, जाती धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवतो, ही लाजीरवाणी बाब आहे. रयतेचा राजा अशी ओळख असलेला आपला सर्वांचा राजा महिलांच्या अब्रूचे रक्षण करणारा, रयतेच्या पिकवलेल्या धान्याला, काडीलाही हात न लावणारा आणि अन्यायाविरोधात चिडून उठणारा असा राजा सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या बॅनरखाली लपवून ठेवला आहे.

शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठली जात व धर्म यांच्यासाठी नव्हता, तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी होता. आजचा तरुण पूर्वीपासून फक्त नावीन्य स्वीकारत आला, परंतु नावीन्य शोधण्याचा प्रयत्न मात्र करताना दिसत नाही. धार्मिक गोष्टीत शिवरायांना गुरफटून त्यांना एखाद्या विशिष्ट जातीच्या, धर्माच्या चौकटीत गुंतवून ठेवणे ही कोणाच्या घरची मक्तेदारी नव्हे, शिवराय अठरापगड जातीचे, सर्व धर्मांचा सन्मान करणारे होते. त्यांच्या स्वराज्यात जाती-धर्माला थारा नव्हता, तर मग आपण त्यांना जातीच्या राजकारणात का बांधून ठेवतो? तर मग या मावळ्यांना शिवराय समजले तरी कसे, हा गंभीर प्रश्न आहे. जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाया जिंकल्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, ‘जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते.’ या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टीचे चिंतन करावे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी महाराज होत नसतो, तर त्यासाठी जिजाऊंचे संस्कार पाहिजेत. जर तसं झालं असतं तर आज या महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहिल्या असत्या. किशोवरीन मुलं, मुली ते आबालवृद्ध आज या महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वावरू शकत नाहीत, या सर्व गोष्टींना एकमेव कारण आहे तो म्हणजे आम्ही आमचा इतिहास विसरत चाललो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो, तो कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत,’ अगदी तेच झाले. शिवरायांच्या स्वराज्यात शत्रूची महिलादेखील सुरक्षित घरी परतत होती. शिवरायांनी शत्रूच्या सुनेलादेखील सन्मानाने वागवून साडीचोळी देऊन सुखरूप घरी पोहोचते केले. माणुसकी आणि मानवतेचा आदर्श असलेला जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

शिवजयंतीच्या उत्सवाची सुरुवात करण्याचा मान महाराष्ट्राच्या भूमीकडे आहे, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा उत्सव आरंभिला गेला तो छत्रपतींच्या कर्मभूमीत! मात्र काळाच्या ओघात काही नतद्रष्टांनी या उत्सवामागे वादाची वादळे निर्माण केली आणि समाजात तेढ निर्माण होऊ लागली. आजही शिवजयंतीचा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला नाही तर ज्योतिबा फुल्यांनी तो सुरू केला अशी धारणा बहुजन समाजाची आहे. बहुजन वर्गात हा समज कसा निर्माण झाला? यामागे तथ्य आणि सत्य किती? हे समजून त्याचे निराकरण करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्यच आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास असताना आजच्या महाराष्ट्रात विकृतीकरणाने रौद्ररूप धारण केले आहे, शिवराय हिंदूंचे, मुस्लीमद्वेषी होते, अशी काही स्फोटक विधाने महाराजांच्या तोंडी किंवा काही निवडक लिखाणातून वाचायला मिळतात. पण शिवरायांच्या अस्मितेत हा भेदभाव कधीही नव्हता. मात्र राजकारण्यांनी आणि काही स्वार्थी इतिहास संशोधकांमुळे हिंदू, मुस्लीम हा भेदभाव आज पहायला मिळत आहेत. शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात उत्साहाने साजरी होते. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा अनेक उपक्रमांनी आज जयंती साजरी होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांना कितपत समजला हे आवर्जून समजावून घेण्यासारखे आहे. छत्रपती शिवराय बहुजनांचे राजे होते. हिंदूधर्मरक्षक असले तरीही साम्राज्यवादी नव्हते. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यकारक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनेही सोयीने छत्रपतींचे नाव वापरले तर मतदार राजा तुम्हाला सोयीने घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -