घरसंपादकीयओपेडबैल गेला आणि झोपा केला...

बैल गेला आणि झोपा केला…

Subscribe

या देशातील लोकशाही वाचवायची असेल तर मोदींना हटवणे आवश्यक आहे, त्यामुळे विरोधी बाकांवर असलेल्या आपल्या सगळ्यांचा शत्रू नंबर एक हे मोदी आहेत, अशी भूमिका घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शत्रू मानत नाही, असे विधान राजापूर येथे नुकतेच केले. ठाकरे यांच्या या विधानाचे विविध अर्थ निघत आहेत. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते फुटल्यावर आता मोदी विरोधकांचा आवाजही कमी होत चालला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींविषयी चांगले उद्गार काढले असले तरी आता परिस्थिती बैल गेला आणि झोपा केला अशी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी दुय्यम भूमिका घेऊन भाजपसोबत युती आणि मैत्री टिकवली असती तर आज शिवसेनेची जी अवस्था झालेली आहे ती झाली नसती. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले होते, पण शिवसेनेने २०१९ साली ज्या पक्षांसोबत महाविकास आघाडी केली, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा फायदा भाजपने उठवला. त्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणात राजापूर येथील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे विधान केलेे, त्यामुळे काही नवे संकेत मिळत आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्योरापांचे रणकंदन सुरू आहे. ठाकरे गट पंतप्रधान मोदींवर तुटून पडत आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते तर दररोज सकाळी पंतप्रधानांची धुलाई करण्यासाठीच बसलेले असतात, असेच दृश्य प्रसारमाध्यमांवर दिसते.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कोकणाने शिवसेनेला नेहमी साथ दिली. कारण त्यावेळी काँग्रेसकडून कोकणाची जी उपेक्षा झाली होती, ती राजकीय पोकळी भरून काढण्याचे काम शिवसेनेने केले. कोकणातून अनेक नेते शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आले. तसे पाहायला गेल्यास शिवसेनेमुळेेच कोकण पॉलिटिकली अ‍ॅक्टिव्ह झाले. कारण त्यापूर्वी कोकण राजकीयदृष्ठ्या तसे सुशेगात होते. देशावरील सहकार क्षेत्रातील धनदांडग्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत कोकणातील नेत्यांना शिवसेनेनेच दिली.

- Advertisement -

सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेची जी स्थिती झालेली आहे ती पाहता आता संघटनेची पुन्हा उभारणी करण्यासाठी त्यांना सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ज्या प्रकारे फुटली, तो प्रकार कल्पनेपलीकडचा आणि संघटनेच्या मुख्य नेत्याला निष्प्रभ करून टाकणारा होता. अर्थात त्यामागे भाजपचे डोके होते. ही गोष्ट सुरुवातीला भाजप नेते नाकारत असले तरी तुमचा पक्ष तुमच्या नाकाखालून पळवला, हे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले. त्यावरूनच सगळे स्पष्ट झाले.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यावेळचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते की, भाजपने आम्हाला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन दिले होेते, पण पुढे भाजपचे नेते म्हणू लागले की, असे आम्ही त्यांना कुठलेही वचन दिले नव्हते, पण उद्धव ठाकरे म्हणत होते की, भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाचे हे वचन आपल्याला बंद दरवाजाआड दिले होते, पण भाजप नेते मान्य करायला तयार नव्हते. भाजपला असे वाटत होते की, २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जशी काही दिवसांनी शिवसेना आपल्या मागून आली तशीच आता येईल, पण यावेळी तसे झाले नाही.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, मी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता, तो मला पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थिीत मुख्यमंत्रीपद हवे. खरेतर त्याअगोदर मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले होते. युतीने लढलेले शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढचे सत्ता स्थापनेचे रस्ते बंद झाले होते. या अवघड राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संधी साधली.

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाकडे घेण्याची तीव्र इच्छा ओळखली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे मन वळवून शिवसेनेसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि सत्ता मिळवली. हा भाजपसाठी प्रचंड मोठा धक्का होता. कारण उद्धव ठाकरे असे काही करतील अशी त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे सूडभावनेने पेटून उठलेल्या भाजपने पुढे अडीच वर्षे काय केले आणि सत्ता कशी मिळवली ते सगळ्या जनतेने पाहिले आहे.

भाजपसोबत युतीत असताना कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हे आपल्याकडे राहिले पाहिजे हा जो शिवसेनेचा अट्टाहास राहिला तोच त्यांना घातक ठरलेला आहे. ज्यावेळी आपली ताकद कमी असते त्यावेळी आपण दुय्यम भूमिका घ्यावी, ज्यावेळी आपले अच्छे दिन येतील त्यावेळी पहिले स्थान मिळवावे ही रणनीती शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबीयांनी लक्षात घेतली नाही. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पातळीवर आल्यानंतर परिस्थिती बदलली होती. भाजपचा प्रभाव वाढलेला होता.

त्यांच्या निवडून येणार्‍या आमदारांची संख्या वाढली होती, पण बदललेली परिस्थिती लक्षात न घेता आपणच मोठा भाऊ आहोत या अट्टाहासाला चिकटून राहणे ही ठाकरेंची मोठी चूक ठरली. त्यामुळे पुढच्या घडामोडी होत राहिल्या. उद्धव ठाकरे यांनी काँगे्रस आणि राष्ट्रवादीसारख्या विरुद्ध विचारसरणीच्या पक्षांशी महाविकास आघाडी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होता आले, पण इतर नेते आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली. भाजपने हे बरोबर हेरले होते. त्याचीच परिणती एकनाथ शिंदे यांच्या बंडात झाली. शेवटी पक्षाचे नाव आणि चिन्ह ठाकरेंना गमवावे लागले.

उद्धव ठाकरे यांनी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवले त्याच वेळी त्यांच्या विषयीच्या लोकांच्या मनात असलेल्या सहानुभूतीला ओहोटी लागली. राज ठाकरेंनी पक्ष सोडल्यावर जो पक्ष त्यांच्या हातात होता तोच छिन्नविच्छिन्न झाला आहे. जे नेते शिवसेनेचे खंदे शिलेदार म्हणून निवडणुकीत ठाकरे यांच्यासाठी लढत होते, तेच आज विरोधात गेले असून ठाकरे यांच्यावर एकेरीवर येऊन टीका करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत जी मंडळी लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणू शकतात, तीच आज उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलेली आहे. सभांना गर्दी जमणे याचा अर्थ ती संख्या मतांमध्ये रूपांतरित होईल असे नाही. दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन मोठमोठ्या प्रकल्पांची उद्घाटने करत आहेत. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे.

मोदी हैं तो मुमकिन हैं, असे भाजप दणकावून सांगत आहे. उद्धव ठाकरे कोकण दौर्‍यावर गेले होते, पण मुंबईला येताना ते मोदी सरकारने सुरू केलेल्या आलिशान वंदे भारत एक्स्प्रेसने आले. अशा अनेक वंदे भारत देशभर मोदींनी सुरू केल्या आहेत. तो फरक उद्धव ठाकरे यांना जाणवत असणार हे नक्की. राजापूर येथील भाषणात ‘नरेंद्र मोदींना मी शत्रू मानत नाही, पण ते मला शत्रू मानतात. ज्या बाळासाहेबांनी त्यांना संकटकाळात मदत केली, त्यांची शिवसेना फोडणार्‍यांना त्यांनी मदत केली,’ असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना हातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींच्या विरोधात पेटून उठले होेते. कारण आमच्या मागे महाशक्ती आहे, असे एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोदी हे नंबर एकचे शत्रू झाले.

मोदींना हटवून देश वाचवण्यासाठी विरोधी पक्षांच्या उभारलेल्या ‘इंडिया आघाडी’ला विशेष महत्त्व आहे, असे उद्धव ठाकरे देशभरातील मोदी विरोधकांना कळकळीने सांगत होते, पण खुद्द इंडिया आघाडीचे समन्वयक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच अचानक भाजपशी हातमिळवणी केली. ममता बॅनर्जी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. हे असे भूकंप झाले. हे सर्व पाहिल्यावर इंडिया आघाडीचे भवितव्य काय असणार हे उद्धव ठाकरे यांना लक्षात येऊ लागले असावे. इंडिया आघाडीतील प्रमुख नेते फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मोदी यांच्यावरील टीकेची तीव्रता कमी झालेली पाहावयाला मिळाली.

त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आपण शत्रू मानत नाहीत, असे उद्गार ठाकरे यांच्या तोंडून आले असावेत, पण आता त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. कारण डॅमेज हे कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी यासाठी अगोदर प्रयत्न करायला हवे होते. त्यांनी काही काळ दुय्यम भूमिका घेऊन अच्छे दिनची वाट पाहायला हवी होती. मोदींनाही मर्यादा आहेत, पण ठाकरेंनी तेवढा संयम राखला नाही. त्याची परिणती पक्षाचे अतोनात नुकसान होण्यात झाली. आता उद्धव ठाकरे मोदींविषयी सबुरीचे धोरण घेऊ इच्छित असले तरी हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला, असेच होऊन बसले आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -