घरसंपादकीयओपेडभाजपमधील घराणेशाहीकडे पंतप्रधान मोदींची डोळेझाक!

भाजपमधील घराणेशाहीकडे पंतप्रधान मोदींची डोळेझाक!

Subscribe

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला जेमतेम दोन-चार आठवडेच शिल्लक राहिलेत. केंद्रीय निवडणूक आयोग कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करून आचारसंहिता लागू करेल, असं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या २०० पावलं पुढं असलेल्या भारतीय जनता पक्षानं गेल्या आठवड्यात सुनियोजित पद्धतीनं १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बार उडवून दिला आहे. उर्वरित जागांवर विचारमंथन सुरू असतानाच ब्रँड मोदींनी ‘मोदी की गॅरंटी’ पाठोपाठ ‘मेरा भारत, मेरा परिवार’ असा नवा नारा दिला आहे. या नव्या टॅगलाईनद्वारे घराणेशाहीच्या मुद्यावरून विरोधकांना घेरताना पंतप्रधान मोदींनी भाजपच्या आक्रमक प्रचारतंत्राला सहानुभूतीचा नवा तडका मारला आहे. कधी काळी पार्टी विथ डिफरन्स अशी टॅगलाईन मिरवणार्‍या पक्षातील अंतर्गत लोकशाहीचं सरंजामशाहीत परिवर्तन करणारा हा वारू देशभर उधळू लागला आहे.

घराणेशाही ही देशाला लागलेली कीड आहे. घराणेशाहीने देशाचं आतापर्यंत खूप नुकसान केलं, घराणेशाही चालवणार्‍या पक्षाने देशातील सक्षम पिढीला नेतृत्वाची संधी नाकारली, विकासाची चाके रोखली, भ्रष्टाचारचे इमले रचले. त्यामुळं घराणेशाही हा लोकशाहीपुढील सर्वांत मोठा धोका असल्याचं वक्तव्य स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते दर दुसर्‍या सभेत, उठता-बसता उद्धरीत असतात.

काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अकाली दल, तेलगू देसम, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स इत्यादी घराणेशाहीवर वाढलेले प्रादेशिक पक्ष प्रामुख्याने भाजपच्या निशाण्यावर असतात. हाच धागा पकडून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यातील इंडिया आघाडीच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदी नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणावर बोलतात, पण घराणेशाहीचं राजकारण म्हणजे काय हे त्यांना कसं माहिती असणार? मोदींना तर ना कुटुंब आहे ना मुलं. राम मंदिर बांधल्याच्या फुशारक्याही मोदी मारत असतात, पण ते हिंदूदेखील नाहीत.

- Advertisement -

आईच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदू धर्मातील कुठल्याही प्रथा परंपरेचं पालन केलं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य करून लालूंनी भाजपच्या हाती आयतं कोलितच दिलं. लागलीच दुसर्‍या दिवशी सकाळी केंद्रातील सर्व मंत्री आणि भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘मोदी का परिवार’ असा बायो झळकू लागला, तर त्याच सायंकाळी तेलंगणातील अदिलाबाद येथील जाहीर सभेत भाषण करताना मोदींनी, भारतातील १४० कोटी देशवासी माझं कुटुंब असल्याचा पलटवार करत ‘तुम्ही मोदींचे, मोदी तुमचे’ अशी प्रचाराची नवी टॅगलाईन पक्षाला दिली.

घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असू शकतात, परंतु त्या सर्वांचा वर्ण एकच आहे. खोटं बोलणं आणि दरोडा टाकणं हेच त्यांचं चारित्र्य आहे. या उलट माझं जीवन एक खुलं पुस्तक आहे. देशवासीयांसाठी जगण्याचं स्वप्न घेऊनच मी लहानपणी घर सोडलं. माझं कोणतंही वैयक्तिक स्वप्न नाही. माझा प्रत्येक क्षण फक्त तुमच्यासाठी असेल. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य घालवेन, देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती हे माझे कुटुंब आहे. ज्यांना कोणीही नाही तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच. माझा देशच माझं कुटुंब आहे, असं म्हणत मोदींनी या टॅगलाईनला आपल्या भाषणातून अगदी हळुवारपणानं करूणेची झालर लावली.

- Advertisement -

घराणेशाहीवादी प्रादेशिक पक्ष विरुद्ध मोदींची घराणेशाही अर्थात भारतीय जनता या वळणावर भाजपला ही निवडणूक घेऊन जायची आहे, त्याला पंतप्रधान मोदी यांनी खूप आधीपासूनच मग ते विकासकामांच्या लोकार्पण सभा असोत किंवा लोकसभेतील भाषण असो, सर्वच ठिकाणी पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीवरून काँग्रेससहीत विरोधी पक्षांवर आसूड ओढलेत. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा जिथं जिथं सभा घेतात, त्या सर्व सभांमध्ये या प्रादेशिक पक्षातील कुटुंब प्रमुखांना आपल्या मुलांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे, असा राग आळवतात.

महाराष्ट्रात आलं की त्यांचा अंगुलीनिर्देश ठाकरे, पवार कुटुंबाकडं असतो, उत्तर प्रदेश- बिहारमध्ये गेलं की भाजप नेत्यांच्या टार्गेटवर यादव कुटुंब असतं आणि दक्षिणेकडं गेलं की स्टॅलिन कुटुंब असतं. बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकर्‍यांच्या पिकाला हमीभाव, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, देशातील स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप, मणिपूरसारख्या राज्यातील अंतर्गत हिंसाचार आदी समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करणं हादेखील भाजपच्या ‘मेरा मोदी, मेरा परिवार’ मोहिमेचा सुप्त उद्देश आहेच. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीविरोधात घराणेशाही हीच भाजपची प्रमुख प्रचाररेषा असणार आहे, हे स्पष्ट आहे.

अडवाणी-वाजपेयींच्या काळातील भाजप सामूहिक नेतृत्वावर अवलंबून होता. भाजप हा व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री असल्याचे दावे तेव्हाचे जुणेजाणते नेते करायचे, मात्र मोदी पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून दलपती ठरल्यापासून भाजप आता मोदींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागलाय. मोदी पर्वाच्या आधी वाजपेयी आणि अडवाणी हे भाजपचे दोन चेहरे होते. मोदी पर्वातही दोन चेहरे असले, तरी सर्वज्ञात नरेंद्र मोदी यांचाच चेहरा आहे.

म्हणूनच विकास आणि हिंदुत्वाच्या नावाने कात टाकलेला भाजप केवळ ब्रँड मोदीभोवती फिरताना दिसतो. मोदी है तो मुमकीन हैं, घर घर मोदी, हर घर मोदी, नमो योजना, गॅरंटी मोदी की, अब की बार ४०० पार मोदी सरकार आणि आता मेरा मोदी, मेरा देश या ना त्या माध्यमातून देशातील जनतेवर सातत्याने आदळणार्‍या टॅगलाईन याचंच प्रतीक नाही तर दुसरं काय आहे.

आपल्या भाषणात कमळ हाच भाजपचा उमेदवार असेल, असं म्हणत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना मोदी-शहा जोडगोळी उमेदवारांचं स्वतंत्र अस्तित्व नाकारत आहेत. भाजपच्या या पहिल्या यादीत १६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांचा समावेश आहे. त्यात ३४ केंद्रीय आणि राज्य मंत्री पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. लोकसभा अध्यक्ष आणि २ माजी मुख्यमंत्र्यांची नावंही या यादीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी इथून तर गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.

मोदी सार्‍या देशाला गॅरंटी देत असताना उरलेल्या यादीत आपल्या नावाचा समावेश असेल की नाही, एवढी शाश्वतीही नितीत गडकरींसारख्या जुन्याजाणत्या नेत्यांपासून सध्या कार्यरत असलेल्या नारायण राणेंसारख्या कॅबिनेट मंत्र्यांनादेखील नाही. आमच्याकडे घराणेशाहीला अजिबात थारा नाही, असा दावा भाजप नेते कितीही करीत असले तरी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपमध्ये घराणेशाही अनुभवास येते. भाजपच्या ४०० खासदारांपैकी ४५ खासदारांची आणि महाराष्ट्रात १०६ आमदारांपैकी २५ आमदारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची आहे.

राज्यातील भाजपच्या २३ खासदारांपैकी आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे-पाटील, हिना गावित हे सारे घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत. भाजपच्या १०६ आमदारांपैकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांचे पुत्र, माजी मंत्री दत्ता राणे यांचे पुत्र, दत्ता मेघे यांचे पुत्र घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे आमदार होते, तर काकी शोभाताई फडणवीस या मंत्री होत्या. विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची यादी काढायलाच नको. हे कमी की काय निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना वळकटी उचलायला ठेवून काँग्रेसच्या पिढीजात घराणेशाहीत नावलौकिक मिळालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देत भाजपने जवळ केलं. अजित पवारांचा महायुतीत समावेश करून त्यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं. कधी काळी पार्टी विथ डिफरन्स अशी टॅगलाईन मिरवणार्‍या पक्षातील अंतर्गत लोकशाहीचं सरंजामशाहीत परावर्तन करणारा हा वारू देशभर उधळू लागला आहे.

सलग तिसरी लोकसभा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्याची संधी मोदींच्या भाजपला आहे. सलग तीन वेळा पंतप्रधानपद मिळवण्याची कामगिरी आतापर्यंत केवळ पंडित जवाहरलाल नेहरु यांनाच साधता आली आहे. यंदा पंतप्रधान मोदींना या विक्रमाची बरोबरी करून काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा इरादा आहे. साम-दाम-दंड-भेद या नीतीचा सुरुवातीपासूनच प्रभावी वापर करणार्‍या भाजपनं या निवडणुकीत ३७० जागा आणि एनडीएपुढं ४०० पार जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे. उत्तर, पश्चिमेकडील राज्यांमध्ये भाजप आधीच सर्वोच्च कामगिरीच्या जवळ आहे. भाजपला ४०० पारचा आकडा गाठायचा असेल तर महाराष्ट्रासह, दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारावी लागणार आहे.

त्याची तयारी म्हणून गेल्या ३ महिन्यांत मोदींनी दक्षिणेकडील ५ राज्यांत १० दौरे केले आहेत. यांत उत्तरोत्तर आणखी भर पडत जाणार आहे. भावी विजयाचा ज्वर चढलेल्या भाजपनं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कामांचा आराखडा तयार केला. अशाच अतिमहत्त्वाकांक्षेच्या आधारे वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपनं इंडिया शायनिंगचा नारा देत मुदतपूर्व निवडणुका घेऊन पायावर धोंडा मारून घेतला होता. तुम्ही ४०० पार जाणारच आहात, तर सतत भीती व असुरक्षितता वाटणार्‍या वृद्ध इसमाप्रमाणं इतकी हातघाई कशाला? देशवासीयांना घराणेशाही विरुद्ध सरंजामशाहीच्या लढतीत निर्णय घ्यायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -