घरसंपादकीयओपेडमारुतीच्या शेपटीला आग लावण्याचे परिणाम!

मारुतीच्या शेपटीला आग लावण्याचे परिणाम!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या संदेशाचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पार विसर पडल्याचे दिसले. त्यांनी श्री राम हे मांसाहारी होते, असे वक्तव्य केले. त्यामुळे विशेषत: राज्यभर आव्हाडांच्या निषेधाची लाट उसळली. त्यानंतर आव्हाडांनी नमते घेत दिलगिरी व्यक्त केली, पण सध्या देशभर राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीचा उत्सव साजरा होत असताना आव्हाड यांचे हे वक्तव्य म्हणजे लंकेत मारुतीच्या शेपटीला आग लावण्यासारखे आहे. त्यामुळे जे नुकसान व्हायचे ते काही टाळता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा जाऊन तो एक प्रादेशिक पक्ष झाला. त्यानंतर त्या पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हटले जाणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी बंड करून पक्षावर दावा सांगितल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचित्र कोंडीत सापडला आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकाच घरातले आहेत. त्यांच्यामध्येच दुफळी निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा नेमका कुणाचा पक्ष, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन्ही बाजू पक्षावर आपलाच दावा सांगत आहेत.

इतकेच नव्हे तर या प्रकरणाची आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. त्यातून काहीही निष्पन्न झाले तरी शेवटी राष्ट्रवादी पक्षाचे नुकसान होणार आहे. खरेतर पवार घराणे हे आपल्या सहकार तत्त्वासाठी ओळखले जाते. अजूनही त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. सणसुदीला सगळे पवार कुटुंबीय त्यांच्या बारामतीच्या घरी जमतात. त्यामुळे सहकार तत्त्वाचे संस्कार असलेल्या या कुटुंबामध्ये कशी फूट पडली हेच एक आश्चर्य मानले जात आहे, पण आपल्याला काकांकडून पुरेशी संधी दिली जात नाही, आपण शरद पवारांचे राजकीय वारसदार असूनही आपल्याला डावलेले जात आहे, अशी भावना अजित पवार यांच्या मनात वाढू लागली.

- Advertisement -

त्यामुळेच त्यांनी विविध प्रसंगी आपली नाराजी व्यक्त केली. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी मोठ्या कौशल्याने ते बंड मोडून काढले आणि सुबह का भुला शाम को घर आया तो उसे भुला नही कहते, या न्यायाने अजितदादा स्वगृही आले. घरगुती मामला असल्यामुळे यावर जास्त चर्चा करण्यात आली नाही.

अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीत आलेे तरी त्यांच्या मनातील खदखद काही शांत झालेली नव्हती. त्यामुळे पुढे अजितदादांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्षावरच दावा केला. त्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या सरकारशी हातमिळवणी करताना आपल्या सहकारी आमदारांना मंत्रीपदे मिळवून दिली. अजितदादा खरेतर मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपसोबत आले होते, पण अजितदादांना आम्ही मुख्यमंत्रीपदाचा शब्दच दिला नव्हता. जो शब्द आम्ही दिला होता, तो आम्ही पाळला, असे राज्यात भाजपची सत्ता येण्यामागील मुख्य सूत्रधार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेे आहे.

- Advertisement -

त्यामुळे दादांची भाजपकडून मुख्यमंत्री होण्याची आशा मावळलेली आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावरून सध्या निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर युक्तिवाद सुरू आहे. दुसर्‍या बाजूला आपली बाजू बळकट करण्यासाठी अजितदादांनी सुरुवात केली आहे. अजितदादांनी आपल्या नेतृत्वाखालील पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किती जागा हव्यात हे जाहीर केले. इतकेच नव्हे तर खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी आक्रमक वक्तव्ये केली आहेत. बारामती हा पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो ताब्यात घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला ठसा उमटणार नाही याची अजितदादांना कल्पना आहे.

त्यामुळेच त्यांनी बारामती मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेऊन लोकांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार आणि अजितदादा यांची चुलत बहीण सुप्रिया सुळे यांना धक्का बसला आहे. कारण बारामतीचा लोकसभा मतदारसंघ हा सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. अजितदादा जर आपला उमेदवार बारामतीतून उभा करणार असतील तर ते आव्हान सुप्रिया सुळे यांना अवघड जाईल यात शंकाच नाही. त्यामुळे आपण बारामतीत ठाम मांडून बसणार आहोत, असे सुप्रियाताईंनी जाहीर करून टाकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्या दोन भाग झाले आहेत. त्यामुळे नेमका हा पक्ष कुणाचा शरद पवार की अजित पवार यांचा असा सध्यातरी कायदेशीर पेच आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांसोबतच कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची पक्ष म्हणून विचित्र अवस्था झाली आहे. शरद पवार एका बाजूला राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या इंडिया आघाडीला मजबूत करण्याचे आवाहन करत आहेत. आपल्याला मोदींना खाली खेचायचे आहे, असाच त्यांच्या भाषणाचा मुख्य सूर असतो.

पण याचवेळी राज्यातील त्यांच्या पक्षाची परिस्थिती दिवसेंदिवस अवघड बनत चाललेली आहे. कारण अजितदादा आणि शरद पवार या दोन्ही बाजूंकडील नेते अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहेत. अजितदादांचे मागील बंड शरद पवारांनी मोडून काढले होते, पण आता परिस्थिती अवघड होत चाललेली आहे. जसे सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती यामुळे काँग्रेसवर परिणाम झाला आहे, तसेच शरद पवार यांचे वय आणि प्रकृती याचा त्यांच्या पक्षावरही परिणाम होत आहे. आज शरद पवार म्हणत आहेत की, माझे वय झाले असे म्हणू नका. माझ्याबरोबर कुस्ती खेळायला या.

ते असे म्हणत असले तरी आता त्या विधानाकडे विनोदाने पाहिले जात आहे. अजितदादांची मुख्यमंत्री होंण्यासाठी आपली बाजू बळकट करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि अस्तित्वाचा लढा देणारी पक्षाची शरद पवारांची बाजू यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूंनी खेचला जात आहे. त्यात तो खिळखिळा होत आहे. अशी पक्षाची स्थिती असताना शरद पवारांच्या बाजूचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये श्री राम मांसाहार करत होते. त्यामुळे ते बहुजनांचे नेते होते, ते त्यांना शाकाहारी बनवणार्‍यांचे नेते नाहीत, असे वक्तव्य केले. सध्या अयोध्योत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्ला यांच्या विराजमान सोहळ्याची मोठी तयारी देशभर सुरू आहे. २२ जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात येईल.

जगभरातून रामभक्त अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. ५०० वर्षांपूर्वी बाबराने अयोध्येतील राम मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती. त्यानंतर आता इतक्या वर्षांनंतर श्री रामाचे भव्य मंदिर अयोध्येत उभारण्यात आले आहे. देशभर २२ जानेवारीला दिवाळी साजरी करण्यात यावी, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अशा जल्लोषाच्या वातावरणात जितेंद्र आव्हाड यांनी केवळ आपलेच नव्हे तर पक्षाचेही मोठे नुकसान केले आहे. आव्हाड यांच्या श्री राम हे मांसाहारी होते, या वक्तव्यावरून महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे आव्हाड देशभर फेमस झालेे, पण त्यामुळे त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये भाजपवाले खुबीने उचलणार यात शंका नाही.

श्री राम हे मांसाहारी होते, या आपल्या विधानावरून आपल्याविरोधात टीकेचे वादळ उठले आहे हे लक्षात आल्यावर दुसर्‍या दिवशी आव्हाड यांनी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले, पण त्याच वेळी आपण अभ्यासाशिवाय बोलत नाही, असे म्हणून रामायणातील काही श्लोकांची उदाहरणे देऊन आपले म्हणणे कसे खरे आहे हे सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी श्री राम हे मांसाहारी होते, असे विधान करताना आपण पौराणिक साहित्याचे अभ्यासक नसून एका राजकीय पक्षाचे नेते आहोत हे लक्षात ठेवायला हवे होते. आपल्या विधानाचे अगोदरच दुभंगलेल्या आपल्या पक्षावर काय परिणाम होतील याचा त्यांनी विचार करायला हवा होता.

या देशात तसेच राज्यात ८० टक्के बहुजन आहेत. त्यामुळे श्री राम हे बहुजनांचे नेते होते, ते मांसाहारी होते, असे सांगून ८० टक्के बहुजनांना आपल्या पक्षाकडे वळवता येईल असा आव्हाडांचा राजकीय व्यवहार होता असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. भाजपने जसा श्री रामाचा राजकारणासाठी उपयोग केला तसा आपणही करण्याचा आव्हाड यांचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. मी भावनेच्या भरात बोलून गेलो, असे आव्हाड दुसर्‍या दिवशी म्हणाले, पण त्यावेळी त्यांनी या देशातील बहुसंख्य लोकांच्या श्री रामांविषयी काय भावना आहेत याचा विचार केला नाही. त्यामुळे फुटीमुळे अगोदरच हतबल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यामुळे अधिक नुकसान झाले आहे. आव्हाडांचे हे वक्तव्य म्हणजे लंकेत गेलेल्या मारुतीच्या शेपटीला आग लावण्यासारखे आहे. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -