घरसंपादकीयओपेडयूज अँड थ्रो वृत्तीचा घाव वैवाहिक संबंधांच्या मुळावर !

यूज अँड थ्रो वृत्तीचा घाव वैवाहिक संबंधांच्या मुळावर !

Subscribe

समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढून आर्थिक संपन्नता येत असताना त्याची नकारात्मक बाजू दिसू लागली आहे. पूर्वी समाज व्यवस्था बंदिस्त होती. जीवनाचे काही नियम हे संस्कृतीचा भाग किंवा सक्तीने पाळावे लागत होते, पण आता समाज व्यवस्था जशी खुली होत आहे, अनेक गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये ‘यूज अँड थ्रो’, या वृत्तीचा पगडा वाढत आहे. त्याचा परिणाम विवाहसंस्था आणि कुटुंब व्यवस्थेवर होत आहे. केरळ उच्च न्यायालयाने अलीकडे या वाढत जाणार्‍या बेजबाबदारपणावर परखडपणे समाजाची कानउघाडणी केली आहे. खरे तर या विषयावर समाजात सखोल चिंतन होण्याची गरज आहे, कारण वाढत्या बेजबाबदारपणाचे घाव कुटुंबव्यवस्थेवर होत आहेत.

केरळ उच्च न्यायालयाने अलीकडेच नोंदवलेले मत खूप विचार करायला लावणारे आहे. ‘यूज अँड थ्रो’ या कन्झ्युमर कल्चरचा वैवाहिक संबंधांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. त्यामुळेच लिव्ह-इन-रिलेशिनशिपकडे तरुणांचा कल वाढत चालला असल्याचा निष्कर्षही न्यायालयाने काढला आहे. शांतपणे अवती-भवती पाहिल्यावर यातील सत्यता लगेच लक्षात येऊ शकते. ही धरसोड वृत्ती का वाढत आहे? जीवनाचा आधार समर्पण भाव आहे, हे ध्यानीच घेतले जात नाही का? या सगळ्याचा सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे.
न्यायालयाने एका खटल्यात केलेली टिप्पणी फार महत्वाची आहे. पूर्वी ‘वाइफ’ या शब्दाची फोड ‘वाइज इन्व्हेस्टमेन्ट फॉर एव्हर’ अशी केली जात होती. पण आता ‘वरी इन्व्हायटेड फॉर एव्हर’ अशी केली जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे. पिढी बदलत गेली, तसा पती-पत्नीच्या नात्यामध्येही बदल होत गेला. पत्नी ही अर्धांगिनी मानण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. त्यानंतर पत्नीला सहचारिणी मानले गेले आणि आता न्यायालय म्हणते तसे, पत्नी ही ’आयुष्यभराची चिंता’ वाटू लागली आहे.
वस्तुत: भारतात पितृसत्ताक पद्धतीच पूर्वापार चालत आली आहे. आता कितीही 21 व्या शतकाचा उदोउदो केला, स्त्री-पुरुष समानतेवर चर्चा होत असल्या तरी, पतीच्या बाबतीत दृष्टीकोन खूप बदलला आहे, असे चित्र नाही. पूर्वी ‘पती परमेश्वर’ मानला जात होता. अर्थात, परमेश्वराप्रमाणे आपल्या पत्नीच्या इच्छाआकांक्षा किती जणांनी समजून घेतल्या, हा वेगळा विषय. पण तरीही ते एक बांधलेपण होते. पती आजारी असताना त्याची देखभाल करणारी, उशाशी बसून राहणारी जशी पत्नी होती, तशी पत्नी आजारी असताना, भलेही उशाशी बसलेला नसला तरी वारंवार चौकशी करणारा पती होता. हा जिव्हाळा, ही आपुलकी, हा ओलावा आता कमी होत चालला आहे. आता समोरची व्यक्ती आपल्या किती कामाची आहे, हाच हिशेब सुरू होतो. मग ती व्यक्ती पती असो, पत्नी असो किंवा अगदी आई-बाप! अर्थात, ही फूटपट्टी सर्वच कुटुंबात लागते असे नाही. पण तरीही हे प्रमाण वाढत चालले आहे, हे नाकारता येणार नाही.
पूर्वी दिसणारी निष्ठा आणि आपुलकी याची जागा आता व्यवहारीपणाने घेतली आहे. नोकरीच्या ठिकाणीदेखील व्यवहारीपणा दिसतो. पूर्वी वडील जिथे नोकरी करायचे, तिथेच ते आपल्या मुलालाही ‘चिकटवायचे’. मालकालाही त्यांच्या निष्ठेवर विश्वास असल्याने तोही मुलाला नोकरी द्यायचा. अशा पद्धतीने दोन-तीन पिढ्या एकाच कंपनीत काम करायच्या. एकदा कुठे चिकटलो की, ग्रॅच्युएटी आणि प्रॉव्हिडंट फंड घेऊनच बाहेर पडायचे, एवढी चौकट ठरलेली असायची. पण काळाच्या ओघात ही गणिते बदलली. आता त्याची जागा रोख व्यवहाराने घेतली आहे. भावभावना मागे पडल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला नोकरी दिल्यानंतर तो जास्तीत जास्त ‘आऊटपूट’ देतो का, हे पाहिले जाते. नसेल तर, लगेच दुसर्‍याचा विचार केला जातो. नोकरदारावर हा अन्याय असतो, असे नाही. नोकरदाराकडूनही तसाच व्यवहारीपणा दाखवला जातो. आपण जेवढे काम करतो, तितका मोबदला आपल्याला मिळत नाही, अशी भावना निर्माण झाली की, तोही लगेच दुसरा पर्याय शोधायला लागतो. त्यामुळे एखाद्या कंपनीलाच वाहून घेणे वगैरे आता बरेच मागे पडले आहे.
हाच व्यवहारीपणा अलीकडे अनेक कुटुंबातही दिसतो. यामुळेच काही वेळा मुले थेट आई-बापाला प्रश्न विचारतानाही दिसतात की, ‘तुम्ही आमच्यासाठी काय केले?’ वस्तुत: अशी परिस्थिती निर्माण होण्यास आई-वडीलदेखील काही प्रमाणात कारणीभूत असतात. हा व्यवहारीपणा कळत-नकळत ते आपल्या मुला-मुलींच्या मनावर बिंबवत असतात. घरी येणार्‍या पाहुण्यांबद्दल होणारी चर्चा, लग्नकार्यातून घरी परतल्यानंतर होणारी टिकाटिप्पणी, नोकरीच्या ठिकाणी सहकारी व बॉसबद्दल असणारी मते आणि त्याबद्दल घरात नाही, पण फोनवरून जवळच्या सहकार्‍याबरोबर किंवा मित्र-मैत्रिणीबरोबर होणारी चर्चा… यातूनच ही मुले शिकत असतात. ‘अतिथी देवो भव’ मानण्याची संस्कृती शहरी भागात हळूहळू लोप पावत आहे. समोरच्या व्यक्तीशी आपले किती भावनिक संबंध जोडले गेले आहेत किंवा ती पुढे आपल्याला कशी फायद्याची ठरू शकते, याच निकषावरून संबंधित व्यक्तीचे आदरातिथ्य केले जाते. अर्थातच, याला नक्कीच अपवादही आहेत. सर्वांना एकाच तागडीत मोजता येणार नाही. पण लोकांचा दृष्टीकोन हळूहळू बदलत चालल्याचे दिसते.
दुसरी गोष्ट म्हणजे, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना दाखविली जाणारी आमिषे. पूर्वी परीक्षेत कमी मार्क मिळाले तर, वडिलांचा फक्त ओरडाच नव्हे, तर मारही खायला लागेल ही धास्ती मुलांना असायची. पण आता तू एवढे टक्के मार्क आणलेस तर, तुला अमूक एक कंपनीचा स्मार्ट फोन, अमूक एक मॉडेलची मोटारसायकल घेऊन देण्याचे आमिषही काही घरांत दाखवले जाते. हाही एक प्रकारचा व्यवहारच. त्यात पती-पत्नी हे दोघेही कमावते असतात. ते मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. मनातील ही सल दूर कशी करायची? मग मुला-मुलींचे लाड पुरवून त्याची भरपाई केली जाते. हा व्यवहारीपणा आई-वडील आणि मुले-मुली या दोघांच्या लक्षात येतो. आयुष्याच्या रहाटगाडग्यात हे अपरिहार्य असले तरी, त्याचे परिणाम दूरगामी होत असतात. लहान वयातच मुलांच्या हाती पैसा खेळू लागतो. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरत असला तरी, नवी पिढ्याच्या दृष्टीने त्याचे मूल्य केव्हाच घसरले आहे. उच्चभ्रू तसेच अलीकडे उदयास आलेल्या उच्च मध्यमवर्गीय मुलांकडे पाहिल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवते. हे केवळ आर्थिक अवमूल्यन नसून सामाजिक आणि सांस्कृतिक अवमूल्यनदेखील आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वरचेवर पार्ट्या रंगवल्या जातात. त्यांच्या दृष्टीने यात नवीन काही नाही, ‘रुटीन’ असते. उमलत्या वयात अनेक जण ‘प्रेमात पडतात’, पण लगेच ‘ब्रेक-अप’ही होतात. हीच ‘ब्रेक-अप’ची परंपरा लग्नानंतरही पाहायला मिळते. म्हणूनच केरळ उच्च न्यायालयाने यावरदेखील भाष्य केले आहे. लग्न ही एक वाईट प्रथा असून कोणतेही दायित्व किंवा जबाबदार्‍यांशिवाय मुक्त जीवन जगण्यासाठी ती टाळली जाऊ शकते, असे आजच्या तरुण पिढीला वाटते. परिणामी लिव्ह-इन-रिलेशनशिप वाढत आहेत, वेगळे होताना केवळ ‘गुडबाय’ म्हणावे लागते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
विवाहानंतर पती-पत्नीचे आई-वडील होतात, पण त्यापैकी खरे पालक कितीजण होतात, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला जे मिळाले नाही, ते आपल्या मुलाला मिळाले पाहिजे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. त्यापेक्षा जास्त काही देण्याची धडपड प्रत्येकाची असते. पण त्यासाठी आपण धृतराष्ट्र किंवा डोळ्यावर पट्टी लावलेली गांधारी बनणे, हे कितपत योग्य आहे. मुलगा किंवा मुलगी चुकत असेल तर, तिला वेळीच आवर घालण्याचा ‘डोळस’पणा पालकांनी दाखवणे गरजेचे आहे. केरळ न्यायालयासमोर आलेल्या त्या खटल्यात मुलाचे विवाहबाह्य संबंध होते आणि आईला त्याचा अंदाज होता, त्यामुळे ती आपल्या सुनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. न्यायालयाने त्याची दखलही घेतली. विवाहबाह्य संबंध असल्याचे ठोस पुरावे नसले तरी, प्रथमदर्शनी तसे आढळत असल्याने न्यायालयाने त्याचा घटस्फोट नाकारला. आई-वडिलांनीदेखील योग्य असेल त्यावर ठाम राहणे अपेक्षित आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे पूर्वी स्टॅण्डअप कॉमेडी करायचे. एका वाहिनीवरील ‘लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय दाम्पत्य आणि विदेशी दाम्पत्य यांच्यातील फरक विनोदी पद्धतीने सांगितला होता. ‘परदेशात पती-पत्नी दोघे हातात हात घालून बाहेर फिरतात. कारण हात सोडला तर, ‘तो’ किंवा ‘ती’ दुसर्‍या कोणाचा तरी हात धरून निघून जाण्याची भीती असते. पण भारतात पती कुठे तरी पुढे चालत असतो आणि त्याच्या मागोमाग पत्नी घाईघाईत चालत असते. तो मागे वळून पाहतदेखील नाही; कारण त्याला खात्री असते ती आपल्या मागोमाग घरीच येणार आहे’. यातला विनोदाचा भाग वगळला तरी एक प्रश्न शिल्लक राहतोच. आजच्या व्यावसायिकीकरणाच्या जगात एकमेकांबद्दलचा विश्वास राहिला आहे का? की त्याची जागा द्वेष, मत्सर, आकस यांनी घेतली आहे?
‘अभिमान’ चित्रपटासारखी घरातच एकमेकांशी स्पर्धा असेल तर, बघायलाच नको. काही वेळास पत्नीची प्रगती नातेसंबंधात आड येते. पत्नी घरदार सांभाळून केवळ नोकरी एके नोकरी करणारी असली तरी, पतीला खटकू शकते. यातूनच त्याच्यातील ‘पुरुषपणा’चा अहं जागृत होतो. त्यानेही कौटुंबिककलह निर्माण होऊ शकतो. अशा बाबतीत मद्रास उच्च न्यायालयानेदेखील एक महत्वाची टिप्पणी केली आहे. ‘घरात नवरा असल्याने भीतीच्या छायेत राहणार्‍या महिलांबाबत न्यायालयांनी उदासीन भूमिका घेता कामा नये. घरात शांतता नांदण्याच्या दृष्टीने पतीला घराबाहेर काढणे हाच एकमेव मार्ग असेल तर, तसे आदेश न्यायालयांनी दिले पाहिजेत. पतीकडे निवासासाठी पर्यायी व्यवस्था आहे किंवा नाही, याचा विचार करू नये. त्याच्याकडे पर्यायी व्यवस्था असेल तर ठीकच आहे. पण जर नसेल तर, ते शोधण्याची जबाबदारी त्याचीच राहील, असे मद्रास न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीत म्हटले आहे.
म्हणूनच नात्यातील ओलावा फार महत्वाचा आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले पाहिजेत. नात्यातील कृत्रिमपणा घरातील मुलांवरदेखील परिणाम करतो. ती एकलकोंडी किंवा आपमतलबी होतात किंवा मित्रमैत्रीणींमध्ये रमतात. त्यातही चांगली संगत मिळाली तर, ते सावरतात अन्यथा हाताबाहेर जातात. कुटुंबात धुसफूस असेल तर, त्याचा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो. कोणीच समाधानी नसल्याने समाजातच अस्वस्थता पाहायला मिळते. म्हणूनच प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या सांगण्याप्रमाणेच ‘शुभविवाह’ इथेच आम्ही थांबलो आहोत. ‘शुभसंसार’ याच्याशी कितीजणांना कर्तव्य आहे?… एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाहीत, अंडरस्टॅण्डिंग लागते.’ पुढे जाऊन हेही म्हणता येईल की, विवाह असो की ‘लिव्ह-इन’, अंडरस्टॅण्डिंग महत्त्वाचे! अन्यथा दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहतात खरे, पण घराचा पायाच ठिसूळ झालेला असतो!

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -