सायरस मिस्त्रींच्या अपघाताची चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर उद्योगक्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सायरस मिस्त्री यांच्या अकाली मृत्यूमुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धक्का बसला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या.

पालघरनजीक झालेल्या या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली आणि त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्या गाडीत 4 जण उपस्थित होते. त्यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले. मृत्यू झालेल्यांमध्ये सायरस मिस्त्री यांचासुद्धा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत व्यक्त केला शोक


हेही वाचा : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू