घरसंपादकीयओपेडवेगवान गतिमान शिंदेंना भाजप ब्रेक लावणार का?

वेगवान गतिमान शिंदेंना भाजप ब्रेक लावणार का?

Subscribe

भाजपचं हिंदुत्व हे महाराष्ट्राच्या मातीला अजून मान्य झालेलं नाही. त्यामुळेच भाजपला शिवसेनेची आजपर्यंत मदत घ्यावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा भाजप हा राज्यात छोट्या भावाच्या भूमिकेत होता, मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला आणि आता शिवसेनेलाच संपवणार की काय, असा जागावाटपाचा फॉर्म्युला बावनकुळेंनी सादर केला आहे. वेगवान, गतिमान शिंदेंच्या शिवसेनेला भाजप ब्रेक लावणार का, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’ या टॅगलाईनने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे, मात्र हे सरकार किती दिवस टिकेल याची खात्री कोणीच देत नाही. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. दुसरीकडे भाजपला लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका झाल्या पाहिजेत याची घाई आहे. वरील दोन्हीपैकी काहीही आधी झालं तरी राज्यात विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. याच निवडणुकांची तयारी भाजपकडून सध्या सुरू झाली आहे.

महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया अभ्यासवर्गाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं बावनकुळेंनी याच बैठकीत सांगितलं. याचा अर्थ त्यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फक्त ४८ जागा सोडल्या जाणार आहेत. बावनकुळेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र मंत्रीपदापासून दूर राहिलेले आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना जागावाटपाचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत, ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? असा तिखट सवाल भाजपला केला आहे. बावनकुळेंनी यानंतर आपले वक्तव्य मोडतोड करून सादर करण्यात आले. अर्धवटच दाखवण्यात आले. मला १४० जागा म्हणायच्या होत्या. भाजप-शिवसेना युती २८८ जागा लढवणार आणि २०० जागा जिंकणार असं ते वाक्य होतं. अशी सारवासारव केली आहे, मात्र भाजपच्या नेत्यांकडून, तेही प्रदेशाध्यक्षांकडून अशी चूक होऊ शकते. हे कोणीही सूज्ञ व्यक्ती मान्य करू शकत नाही.

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे यायचे आहे, ही भाजप नेत्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने फडणवीसांच्या नावापुढील ‘उप’ हा शब्द लवकरात लवकर जाईल यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे विधान केले होते. भाजपला हा ‘उप’ शब्द किती खटकतो याचे दुसरे उदाहरण, हे सरकार स्थापन झाले तेव्हा, चंद्रकांत पाटील म्हणाले होते, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले आहे. भाजपला महाराष्ट्रात एकहाती सत्ता हवी आहे, परंतु उत्तर भारतात मिळालेला पाठिंबा, हा भाजपला अजून महाराष्ट्रात मिळालेला नाही. त्याचं कारणही स्पष्ट आहे, भाजपचं हिंदुत्व हे महाराष्ट्राच्या मातीला अजून मान्य झालेलं नाही. त्यामुळेच भाजपला शिवसेनेची आजपर्यंत मदत घ्यावी लागत आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा भाजप हा राज्यात छोट्या भावाच्या भूमिकेत होता, मात्र २०१९च्या निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला आणि आता शिवसेनेलाच संपवणार की काय, असा जागावाटपाचा फॉर्म्युला बावनकुळेंनी सादर केला आहे. वेगवान, गतिमान शिंदेंच्या शिवसेनेला भाजप ब्रेक लावणार का, असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजप हा आपल्या मित्रपक्षांना कसा गिळंकृत करतो, हे गोव्यात सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या खांद्यावर बसून भाजपने गोव्यात प्रवेश केला. आज या प्रादेशिक पक्षाची अवस्था काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. २०२२ च्या विधानसभेत भाजपने २०, तर मगोपने २ जागा जिंकल्या आहेत. आता त्यांना भाजपवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. आता पुन्हा महाराष्ट्राकडे येऊ. १९८९ मध्ये शिवसेना-भाजप यांच्यात युती झाली. १९९५ मध्ये युती पहिल्यांदा सत्तेत आली. दुसर्‍यांदा युतीची सत्ता आली ती २०१४ मध्ये, परंतु यावेळी दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व युती नव्हती हे विशेष. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपात जागावाटप कसे होत गेले तेही पाहू. २००४ मध्ये शिवसेनेने १६३, तर भाजपने १११ जागा लढवल्या. २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजपने ११९ जागा लढवल्या. २०१४ मध्ये युती फिसकटली, मात्र निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले.

- Advertisement -

भाजपच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली. २०१४ पासून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळायला लागली. ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हे भाजप नेत्यांच्या मनात आणि डोक्यात फिट झाले. त्यातूनच २०१९ मध्ये भाजपने प्रथमच शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढवल्या (१६४) आणि शिवसेनेने १२६. आता बावनकुळेंनी २०२४ मध्ये भाजपला २४० आणि शिवसेनेला ४८ जागा सोडण्याचे वक्तव्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून हे चुकून झालेले वक्तव्य मुळीच नाही. शिंदे गटाच्या नेत्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे समीकरण कळले तर होणारा असंतोष भाजपला परवडणारा नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांची मानसिक तयारी आतापासून झाली पाहिजे, यासाठीच केलेले हे वक्तव्य असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडिया अभ्यासवर्गातील लीक झालेला तो व्हिडीओ, ठरवून समोर आणला गेला असण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण अशाच एका सोशल मीडिया बैठकीत भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहांनी व्हिडीओ लीक होण्याचा फायदा कसा होतो, हे उदाहरणासह पटवून सांगितले होते.

आता प्रश्न आहे की भाजपचा जागावाटपाचा हा फॉर्म्युला हिंदुत्वाच्या मुद्यावर फुटून बाहेर पडलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आणि शिवसैनिकांना मान्य होणार का? शिवसेना हा प्रादेशिक अस्मितेचा पक्ष राहिलेला आहे. आमचं अस्तित्व आणि अस्मिता भाजपसोबत गेल्यानं नष्ट होत आहे, असेच सांगून उद्धव ठाकरे हे भाजपसोबतच्या युतीतून २०१९ ला बाहेर पडले. मग त्यांचं काय चुकलं, असा प्रश्न फुटलेल्या आमदारांसह सामान्य शिवसैनिकाला पडला तर नवल नाही. ४८ जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ‘कमळ’ चिन्हावरील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेऊन फिरणार आहेत का, असा सवाल खासगीत शिंदेंचे आमदारही विचारायला लागले आहेत.बावनकुळेंच्या या फॉर्म्युल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा होण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण भाजप नेते कितीही म्हणत असले की, शिवसेना आम्ही फोडली नाही, तरी आता हे सत्य लपून राहिलेले नाही. नाराज शिवसैनिक काय करू शकतात, हे त्यांनी कसब्यात दाखवून दिले आहे.

पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, १९९५ पासून महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळालेली नाही. त्यामुळे भाजपची कितीही इच्छा असली तरी त्यांना एकनाथ शिंदेंना सोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासोबतच इतर छोट्या-छोट्या पक्षांनाही सोबत ठेवावे लागणार आहे, मात्र खरंच शिंदेंच्या शिवसेनेला फक्त ४८ जागा देण्याची भाजपची तयारी असेल, तर त्यांच्यासोबत गेलेले जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसैनिकांचे काय होणार? याठिकाणी एका गोष्टीची आठवण होते. एक राजा आपल्या सुंदर मुलीसाठी वरसंशोधन करत असतो. राजकन्येसोबत विवाह करण्यासाठी अनेक तरुण इच्छुक असतात. राजा एक अट ठेवतो, मी राजकन्येचा विवाह त्याच तरुणासोबत लावून देईन जो आपल्या राज्यातील मोठी नदी पार करून जाईल. सर्व तरुण त्या नदीच्या काठावर जमतात. नदी मोठी आहे हे तर राजाने आधीच सांगितलेले असते. नदी काठावर तरुणांची जमलेली गर्दी पाहून राजा नदीबद्दल आणखी माहिती देतो. नदीत अनेक प्रकारचे मासे आहेत.

मनुष्याला गिळंकृत करतील अशा मगरी आहेत. साप, विंचू आणि अनेक जलचर आहेत. तेव्हा नदीत उडी घेण्यापूर्वी विचार करा, जो नदीतून पोहून त्या तिरावर पोहोचेल त्याच्याशीच राजकन्येचा विवाह होईल. त्यातच एकाजणाने नदीत उडी घेतल्याचे सर्वजण पाहतात. सर्वत्र शांतता पसरते. त्या तरुणाने उडी घेताच शांत असलेल्या मगरी त्याचा पाठलाग करायला लागतात. त्याचे लचके तोडायला लागतात. रक्तबंबाळ होत तो जीवाच्या आकांताने दुसर्‍या किनार्‍यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. राजासह तिथे जमलेली प्रजा हे सर्व पाहत असते. रक्तबंबाळ झालेला तो तरुण दुसर्‍या तिरावर पोहोचतो. त्याच्याभोवती अनेक लोक जमा होतात. त्याच्या धाडसाचं कौतुक करतात. आता राजकन्येशी त्याचा विवाह होणार हे निश्चित होते. त्याचे मित्र एकांतात घेऊन त्याला विचारतात, अरे तू अशी मरणाच्या दारात उडी का घेतलीस. राजाची ती अट कोणीच मान्य करायला तयार नव्हता, मग तू हे धाडस कसं दाखवलं? तेव्हा तो तरुण म्हणतो, मी काही धाडस दाखवलेलं नाही. मी काठावर उभा होतो, मला नदीत कोणी ढकललं ते पहिलं सांगा? असं विचारण्याची वेळ एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांवर येणार नाही, याची काळजी आता त्यांना घ्यावी लागणार आहे, एवढं नक्की.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -