Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय ओपेड जागतिक परिचारिका दिन आणि लेडी विथ द लॅम्प!

जागतिक परिचारिका दिन आणि लेडी विथ द लॅम्प!

Subscribe

आज जगभर साजर्‍या होणार्‍या जागतिक पारिचारिका दिनाचे औचित्य साधून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जीवन परिचयदेखील समजून घेणे आवश्यक आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा अग्रगण्य परिचारिका, लेखिका व संख्याशास्त्रज्ञ म्हणून लौकीक होता. इ.स. १८५३ साली झालेल्या क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले आहे, अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या.

–भूषण खापणे

अनुरक्त: शुचिर्दक्षो बुद्धिमान परिचारक: ।

- Advertisement -

अर्थ : रुग्णांवर प्रेम करणारी,स्वच्छतेसाठी नेहमी तत्पर असलेली, बुद्धीने प्रगल्भ असलेली, परिचारिका असते.

: अष्टांग हृदयम् (आयुर्वेदिक संस्कृत ग्रंथ)

- Advertisement -

१२ मे, जगभरात आजचा दिवस ‘जागतिक परिचारिका दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. चालू वर्ष २०२३ साठी ‘आपल्या परिचारिका, आपले भविष्य’ या थीम अंतर्गत साजरा केला जाणार आहे. १२ मे १८२० रोजी परिचारिका क्षेत्राच्या जनक ‘मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ यांचा जन्म झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हातात लॅम्प घेऊन युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकांचा शोध घेत त्यांनी सैनिकांवर सुश्रुषा केली आणि या त्यांच्या कार्यातून जगासमोर ‘परिचारिका क्षेत्र’ उदयास आले. संपूर्ण जगाला परिचित करून दिलेले एक नवीन परिचारिका क्षेत्र व या क्षेत्राच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रास मिळालेल्या यशाच्या महत्वामुळे त्यांच्या स्मरणार्थ १२ मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १८५१ मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल जर्मनीला गेल्या आणि १८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय उघडले. त्याच वर्षी क्रिमियन युद्ध सुरू झाले. फ्लॅॉरेन्स यांनी तुर्कीतील लष्करी रुग्णालयात सैनिकांची सेवा करण्यासाठी ३८ नर्सेस घेतल्या.

हॉस्पिटलमध्ये फ्लॉरेन्स यांना घाणीचा डोंगर दिसला. त्यांनी सर्वप्रथम आपले लक्ष स्वच्छतेवर केंद्रित केले. जखमी आणि आजारी सैनिकांच्या काळजीत त्यांनी अहोरात्र एक केली. रात्रीही त्या सैनिकांच्या सेवेत व्यग्र असत. यादरम्यान त्या हातात कंदील घेऊन रुग्णांना पहायला जात असत, त्यामुळे सैनिक त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणू लागले. युद्धानंतर फ्लॉरेन्स परत आल्या तेव्हा त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. आजही संपूर्ण जग त्यांना याच नावाने ओळखते. मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी सन १८६० मध्ये लंडन येथे जगातील पहिले परिचारिका महाविद्यालय ‘नाइटिंगेल नर्सिंग स्कूल’ परिचारिका क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केले.

जागतिक आरोग्य संबंधातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व सर्वांकरिता जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी परिचारिकांवर असलेली जबाबदारी व या जबाबदारीस सार्थ ठरवणार्‍या सर्व परिचारिकांच्या कष्टासाठी ‘आपल्या परिचारिका, आपले भविष्य’ या थीममार्फत परिचारिका क्षेत्रास एक प्रकारे मानवंदना ठरणार आहे. एखादा रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो तिथून तो निरोगी होऊन रुग्णालयाच्या बाहेर येण्यापर्यंतच्या प्रवासात त्यास जितके डॉक्टर महत्वाचे तितकेच परिचारिकाही महत्वाच्या असतात. या प्रवासात रुग्णास सुश्रुषा देण्यासोबत त्यास मानसिक आधार देत डॉक्टरांच्या पेक्षाही परिचारिका या जास्त वेळेच्या सोबती असतात. रुग्णालयात येणारा रुग्ण आपल्या आजारासोबत आपला भूतकाळ आणि वर्तमानकाळ घेऊन येतो, पण त्याच्या निरोगी भविष्यासाठी डॉक्टरांबरोबर परिचारिकाही देवदूत म्हणून कार्य करीत असतात.

रुग्णासोबत त्यांच्या परिवारास कठीण काळात आधार देण्याचे कार्यही परिचारिका करीत असतात. जागतिक महामारी कोव्हीड-१९ च्या काळात आपण आपला वैयक्तिक व आपल्या कुटुंबाचा जीव वाचविण्यासाठी घरात बसलो असताना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांसोबत आपल्या परिचारिकाही महामारीच्या विरोधातील लढाई लढत होत्या. स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार न करता संपूर्णपणे तत्परतेने आणि शौर्याने सहभागी झाल्या होत्या. या महामारीवर मिळवलेल्या नियंत्रणामध्ये परिचारिका क्षेत्राचे कौतुकास्पद योगदान आहे. सन २०२० मध्ये मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधत व कोव्हिड-१९ या जागतिक महामारीच्या काळातील परिचारिका क्षेत्राच्या मोलाच्या योगदानामुळे ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्या मार्फत हे २०२० वर्ष ‘परिचारिका वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले होते.

अनेक क्षेत्रही उपजीविका भागविण्यासाठी कार्यरत असतात, परंतु परिचारिका हे क्षेत्र उपजीविका भागविण्यासोबतच समाजकार्य म्हणजेच रुग्ण सेवा देण्याचे कार्य करीत होते, अजूनही करीत आहेत आणि यापुढेही त्याच जिद्दीने करत राहतील. परिचारिकांना त्यांच्या कामाचा मोबदला हा त्यांच्या कामाच्या आणि अत्यावश्यक सेवेच्या मानातून कमी मिळत असेल, पण मोबदला किती आणि कसा भेटतो? याचा विचार बाजूला सारून सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेचे काम अजून अविरत व एकनिष्ठेने करण्यासाठी परिचारिका नेहमी प्रयत्नशील असतात. संपूर्ण जगात रुग्ण सेवेसाठी आपल्या देशातील परिचारिकांना विशेष व प्रथम प्राधान्य दिले जाते ही भारतासाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे. माणसाच्या दैनंदिन आयुष्यात जीवनात इतके आजार निर्माण झाले आहेत की, उपलब्ध असलेल्या परिचारिका क्षेत्रातील व्यक्तींची संख्या कमी पडत आहे, त्यामुळे उपलब्ध असलेल्या व्यक्तींवर अधिक भार व जबाबदारी निर्माण झाली आहे.

जागतिक महामारी कोव्हीड-१९ च्या काळात रुग्णालयात ०१:१० परिचारिकांची संख्या गरजेची असताना फक्त ०१:०३ परिचारिका उपलब्ध होत्या. त्यामुळे त्याकाळात परिचारिकांचा निर्माण झालेला तुटवडा आणि तरीदेखील उपलब्ध असलेल्या परिचारिकांनी दिलेले अधिकचे योगदान यामुळे संपूर्ण जगासमोर या क्षेत्राचे महत्व अधिक उलगडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी करियर आणि समाजसेवा यांची सांगड घालून भविष्यातील उत्तम क्षेत्र परिचारिका क्षेत्र असेल असा दृष्टिकोन निर्माण झाला. तसेच परिचारिकांच्या वेतन श्रेणीत वाढ केल्यास म्हणजेच कामाचा व्याप व गांभीर्यता लक्षात घेऊन त्या मूल्यांकाने कामाचा मोबदला दिल्यास, या क्षेत्रास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास, या क्षेत्राचा आदर केल्यास व या क्षेत्रासोबत प्रत्येक लढाईत उभे राहिल्यास आपण या क्षेत्राने आपल्या प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी दिलेल्या सेवेकरिता एकप्रकारे मानवंदना ठरेल.

अर्थात जागतिक पारिचारिका दिनाचे औचित्य साधून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जीवन परिचयदेखील समजून घेणे आवश्यक आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ म्हणून लौकीक होता. इ.स. १८५३ साली झालेल्या क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले आहे, अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्ण सेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये ‘जागतिक परिचर्यादिन’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते.

विल्यम प्लेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास ‘नाइटिंगेल रोझ प्लॉट’ असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत, परंतु नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुर्‍या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशननेदेखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

नाइटिंगेल यांनी त्यांच्या जीवनकाळात बरेच लेखन केले. त्यांचा ‘नोट्स ऑन नर्सिंग’ (१८६०) हा ग्रंथ नावाजलेला आहे. तसेच, ‘नोट्स ऑन मेटर्स अफेक्टिंग दि हेल्थ, एफिशियन्सी अ‍ॅण्ड हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी’ हा त्यांचा मोठा ग्रंथ १८५८ साली प्रसिद्ध झाला. संख्याशास्त्राची कुठलीही पदवी पदरी नसूनही १८५९ मध्ये त्या ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’च्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. त्या अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या मानद सदस्यही झाल्या. १८८३ मध्ये राणी व्हिक्टोरियाने त्यांना ‘रॉयल रेड क्रॉस‘ प्रदान करून सन्मानित केले. सन १९०७ मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘ऑर्डर ऑफ मेरिट‘ हा किताबही बहाल करण्यात आला व तो मिळविणार्‍या त्या ‘पहिल्या महिला’ होत्या, मात्र सन १९१० च्या सुमारास त्यांना अंधत्त्व आले आणि त्यातच त्यांचा १३ ऑगस्ट १९१० रोजी लंडन येथे मृत्यू झाला.

- Advertisment -