घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो मी पुससी कैसा । तरी जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥
तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर सर्व भूतांचे ठिकाणी नेहमीसारखा असून माझ्या ठिकाणी ‘माझे’ व ‘तुझे’ असा भेद नाही.
जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवें कर्में करूनि । मातें भजले ॥
जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात व अहंकाराचा बीमोड करून कायावाचामनाने मला भजतात.
ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझ्या ठायीं । आणि मी तयांच्या हृदयीं । समग्र असें ॥
ते जगात देहाने व्यवहार करितात खरे, तथापि देहात नसून त्यांचे चित्त माझे ठिकाणी असते आणि मीही संपूर्ण त्यांच्या हृदयात असतो.
सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥
ज्याप्रमाणे वडाचे मोठे झाड वडाच्या बीजातच असते व बीज त्या झाडातच असते.
तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेर नामाचींचि अंतरें । वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥
त्याप्रमाणे माझ्यात व त्यांच्यात केवळ नावाचेच अंतर असते, बाकी अंतःस्थितीचा विचार करून पाहता ते व मी हे एकच आहोत.
आतां जायांचें जैसें लेणें । आंगावरी आहाचवाणें । तैसें देह धरणें । उदास तयांचें ॥
आता, लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ, त्याचप्रमाणे त्यांचे देहधारण करणे उदासीनपणाचे असते.
परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देंठीं । तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥
वार्‍याबरोबर ज्याप्रमाणे फुलाचा वास त्याच्या मागोमाग जातो व देठापाशी फूल जसे वासरहित राहते, त्याप्रमाणे आयुष्याची मुदत संपण्यापुरताच त्यांचा देह असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -