घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठी । कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥
अर्जुना, दुसरा जो संसारी, तो कर्मबंधाने बांधला जाऊन अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकटपणे बांधला जातो.
जैसा फळाचिये हांवें। तैसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥
फलेच्छेने कर्माचरण करणार्‍याप्रमाणे जो सर्व कर्मे यथासांग करितो, परंतु त्या कर्माचा मी कर्ता नव्हे, असे समजून कर्माचा त्याग करितो, त्या पुरुष्याची काय योग्यता सांगावी.
तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये। तो म्हणे तेथ राहे। महाबोधु ॥
तो पुरुष जिकडे जिकडे पाहतो, तिकडे तिकडे सुखमय सृष्टि होते, आणि तो म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते.
नवद्वारें देहीं। तो असतुचि परि नाहीं। करितुचि न करी कांहीं। फलत्यागी ॥
एक फलाची इच्छा धरली नाही, म्हणजे तो नवद्वारांच्या देहांत असूनहि नसल्यासारखा आहे, आणि सर्व कर्मे करूनहि त्याने ती न केल्याप्रमाणे आहेत.
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥
जसा ईश्वर पाहिला असता अकर्ता आहे, परंतु
( मायोपाधीचा आरोप त्याच्यावर केला म्हणजे ) या त्रिभुवनाचा विस्तार तोच करितो (असे दिसते)
आणि कर्ता ऐसें म्हणिपे। तरी कवणें कर्मीं न शिंपे । जें हातुपावो न लिंपे। उदासवृत्तीचा ॥
आणि तो कर्ता आहे असे म्हटले तर तो कोणत्याहि कर्माने लिप्त होत नाही. कारण त्याची उदासीन वृत्ति असल्याकारणाने कोणतेहि कर्म त्याला स्पर्श करीत नाही.
योगनिद्रा तरी न मोडे। अकर्तेपणा सळु न पडे। परि महाभूतांचें दळवाडें। उभारी भले ॥
त्याच्या योगनिद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाहि घडी लागत नाही, म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही; पण तो महाभूतांच्या समुदायांची उत्तम उभारणी करितो!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -