घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लगेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥
म्हणून याला मोक्षरूप फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल. कारण हा विरक्त झाला आहे, अशी श्रीकृष्णाचीही खात्री झाली.
म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥
श्रीकृष्ण म्हणतात :- आता हा अर्जुन जे अनुष्ठान करील त्याचे त्याला लागलीच फळ मिळेल; म्हणून, त्याला जर हा अभ्यास करावयास सांगितला तर तो वाया जाणार नाही.
ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥
अशा प्रकारे त्या वेळी श्रीहरींनी मनात विचार करून म्हटले :- अर्जुना, आम्ही जो तुला योगमार्ग सांगणार आहोत, तो सर्व मार्गाचा राजा आहे, तो तू ऐक.
तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गींचा कापडी । महेशु आझुनी ॥
तो योग असा आहे की, ज्याच्या प्रवृत्तिरूपी वृक्षाखाली कोट्यवधी मोक्षफले दृष्टीस पडतात;
(ज्यांचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते;) त्या या मार्गाची श्रीशंकर हे अद्यापपर्यंत यात्रा करीत आहेत!
पैल योगवृंदें वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥
दुसरे योगिजनही, प्रथम हृदयाकाशात आडमार्गाने चालू लागले, पण शेवटी अनुभवाच्या पावलांनी चालता चालता त्यांना हमरस्ता सापडला.
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ॥
आणि मग त्यांनी इतर अज्ञानरूप सर्व मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकदम धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -