घरमनोरंजनदेव देवच!

देव देवच!

Subscribe

यशवंत देव मोठ्या मनाचे तर होतेच; पण मोकळ्या मनाचेही होते. त्यांचे समकालीन संगीतकार श्रीनिवास खळेंना महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला तेव्हाची गोष्ट. त्या पुरस्कार सोहळ्याला यशवंत देवांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. खरंतर भावगीत, चित्रपटसंगीत याचा तो सुवर्णकाळ होता आणि त्या काळात सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर वगैरे मंडळी म्हणजे त्या काळातल्या संगितातली चलनी नाणी होती.

एकमेकांच्या अगदी तोडीस तोड गाणी ही मंडळी रसिकांसमोर आणत होती. अशा वेळी ती एकमेकांच्या कलाकृतीबद्दल काय बोलतात? हे जाणून घेण्यात खरोखरच एक कुतूहल होतं. म्हणूनच यशवंत देव श्रीनिवास खळेंबद्दल आता काय बोलणार? याबद्दल त्या पुरस्कार सोहळ्यात सर्वांनाच उत्सुकता होती…आणि यशवंत देव त्या संपूर्ण समारंभात खळेंसारख्या प्रतिभावंत संगीतकारांबद्दल अगदी भरभरून बोलले. मोकळेपणाने बोलले, त्यांच्यातल्या तत्वज्ञासारखे बोलले, ते म्हणाले, ‘मी खळेंची गाणी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की खळे गाण्यांच्या ज्या चाली करतात त्यातून ते आत्मशोध घेत असावेत, त्यांची गाणी ऐकताना ती ऐकणार्‍याला घाईघाईत ऐकता येत नाहीत. त्यांचं गाणं म्हणजे फुलांची हळूहळू उलगडत जाणारी एकेक पाकळी आहे. त्यामुळे त्यांचं गाणं त्या गाण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन ऐकावं लागतं. तेव्हाच त्या गाण्याचं टपोरं रूप आपल्याला कळून येतं. ‘देव आपल्या समकालीन संगीतकारांबद्दल हातचं राखून बोलले नव्हते. यशवंत देवांचं स्वतःच्या गाण्यासह इतरांच्या गाण्यांकडे बघण्याचं असं अनोखं निरीक्षण होतं.

- Advertisement -

‘चारचौघी’ नाटकातल्या गाण्याचे शब्द होते- ‘मोकळ्या जीवनाची रागिणी छेडूया!’…नाटकात सुनील बर्वे ते गाणार होता. देवांनी त्याची चाल करताना ‘मोकळ्या’ हा शब्द खरंच मोकळेपणाने कसा उच्चारला गेला पाहिजे ते सुनील बर्वेला शिकवलं. गाण्याला चाल लावताना एखादा विशिष्ट शब्द कसा उच्चारला जावा, त्यात नेमका कोणता भाव यावा, याबद्दल त्यांचे काही ठोकताळे असत. येशील, येशील, येशील, राणी पहाटे पहाटे येशील? या गाण्यातलं ते प्रश्नचिन्ह लिखित वाक्यात दिसावं तसं गाण्यातही नीट दिसलं पाहिजे. असं त्यांचं म्हणणं असे. मुळात देवांचा भाषेबद्दलचा, शब्दांबद्दलचा, भाषेतल्या सौंदर्याबद्दलचा अभ्यास होता. त्यांचा गाण्याबद्दलचा विचार पक्का होता. म्हणूनच ते गाणं या विषयावर बोलतानाही अस्खलित बोलायचे. अनेक समारंभांना ते आवर्जून जायचे, आवर्जून बोलायचे, त्यांचं बोलणं अतिशय रसाळ असे. त्यात नर्मविनोदाची कायम पेरणी असे, म्हणूनच गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात देवांबद्दल म्हणाल्या होत्या, ‘यशवंत देवांचं गाणं ऐकण्यासारखं असतं आणि त्यांचं बोलणं गाण्यासारखं असतं!‘
असा देव म्हणूनच या इहलोकी पुन्हा होणे नाही!

तुझे मौनही अफाट…

आकाशवाणीत ३५ वर्षे सुगमसंगीत कार्यक्रमाचे निर्माते म्हणून देव यांना महाराष्ट्र ओळखत होता. आकाशवाणीत संगीतबद्ध केलेलं एक गाणं आशा भोसले यांनी गावं असं देव यांना वाटत होतं. त्यातच आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या जबाबदारीतून देव यांच्या निवृत्तीची वेळ जवळ येत होती. आता उरलेल्या कमी कालावधीत आशा भोसले यांचा कार्यक्रम होणं गरजेचं होतं. त्यानुसार यशवंत देव यांनी आशाजींशी एका गाण्याविषयी बोलणं केलं. आकाशवाणीत गाणं संगितबद्ध करण्याचं ठरलं. ठरलेल्या दिवशी आशा भोसले मुंबई आकाशवाणीत येणार होत्या. त्यानुसार गाण्याच्या तयारीचं काम सुरू झालं.

- Advertisement -

कंपोझिंगचा सराव करण्यात आला. ठरलेल्या वेळेप्रमाणे आशाजी आल्या. देव त्यांच्यासोबत आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत गेले. आशाजींनी हेडफोन कानाला लावला. हेडफोनवर स्वर ऐकून त्या गाणार होत्या. मात्र, हेडफोनची वायर तुटली असल्याचं देवांना दिसलं. आता गाणं रेकॉर्ड करण्याच्या ऐन वेळेत हेडफोनची दुसरी वायर किंवा पर्यायी हेडफोन ताबडतोब आणणं गरजेचं होतं. या विचारात असतानाच आशाजींनी देव यांना विचारलं काय झालं? तुम्ही इतका कसला विचार करताय? त्यावर देव म्हणाले, आशाजी हेडफोनची वायर तुटली आहे. आता गाणं रेकॉर्ड कसं करावं, मी या विचारात आहे. त्यावर आशाजी म्हणाल्या चिंता करू नका, मी आधी स्वर ऐकेन मग त्यानुसार नंतर गाणं करूयात. हे ऐकून देव यांना हायसं वाटलं. पुढे हे गाणं हेडफोनशिवाय उत्तम रेकॉर्ड झालं.

हे गाणं होतं…
तुझ्या एका हाकेसाठी
किती बघावी रे वाट
माझी अधीरता मोठी
तुझे मौनही अफाट

प्रतिक्रिया

देव साहेब उत्तम संगीतकार होतेच. मला त्यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. साज मध्ये मी त्यांच्याबरोबर बादल हे गाणं शेवटचं गायलं. त्यांच्या पुढाकाराने रेडिओवर अनेक चांगले कार्यक्रम सुरू केले. त्यांच्या गोड गाण्यांची जादू कायम राहील.
-सुरेश वाडकर, गायक

पाऊस कधीचा पडतो, सर्वस्वी तुजला वाहू… यासारख्या कविता गायची संधी मला यशवंत देव यांच्यामुळे मिळाली. शब्दांना चाल कशी ध्यावी, सूर कसा लावावा, अर्थ समजून कसं गावे, हे सगळं यशवंत काकांमुळे शिकले. त्यांच्याबरोबर एखादं गाणं रेकॉर्ड करणं म्हणजे संगिताची शाळा असायची. त्यांच्याकडून अनेकवेळा कौतुकाची थाप मला मिळाली आहे. परमेश्वराने आमच्यातून आमचा देव नेला आहे.
-पद्मजा फेणाणी, जोगळेकर, गायिका

गाजलेली गाणी

या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे
भातुकलीच्या खेळामधली
तुझे गीत गाण्यासाठी
कुठे शोधीसी रामेश्वर
अखेरचे येतील माझ्या
सांगा कसं जगायचं
अशी पाखरे येती
असेन मी नसेन मी
कुणी जाल का सांगाल का
जीवनात ही घडी अशी राहू दे
कामापुरता मामा, ताकापुरती आजी
खेळामधली राजा आणिक राणी
नीज नीज रे बाळा, थांबिव हा तव चाळा
स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
रात्रीच्या धुद समयाला, शिणगार साज मी केला
बेभान या रात्री बेबंद झाले रे, अधीर मी अन अधीर तूही
तुझ्या एका हाकेसाठी, किती बघावी रे वाट
अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात?
मन हे खुळे कसे – गगन पाखरु जसे
गगनामधुनी देखियले तुज-सांगाया गुज आले रे
तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे
शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
प्रेमगीते आळविता भंगतो आलाप का?
तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदनणार कधी?
जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -