एका लग्नाचा फार्स -‘एपिक गडबड’

हाय बर्लेस्क हा फार्सच्या जवळ जाणारा प्रकार हा बुद्धी आणि कार्यकारण भाव, दोन्हीशी नाते राखून रचला जातो. त्यातील घटनांना तर्क संगती असते, पण मांडणी मात्र तर्काच्या पलीकडे, ओव्हर द रूफ अशी केली जाते. आधी हिंदीत अंश थिएटर तर्फे सादर झालेले मकरंद देशपांडे लिखित- दिग्दर्शित एपिक गडबड आज मराठीत सादर होताना, काही महत्वाचे बदल करून सादर होते आणि हाय बर्लेस्क सादर करण्याचा प्रयत्न करते.

‘एपिक गडबड’ नाटक

गडबडची सुरुवात, अंधारात, मामाजी, त्यांची बहीण ज्योती, तिची मुलगी आरती आणि घरातील हरकाम्या नोकर, बाब्या यांच्या आवाजातून होते. दिवे गेले आहेत, बाब्या फ्युज तपासतो आहे. त्याहून वाईट परिस्थिती आहे, लाइटस कापले आहेत, असे तो सांगतो. त्या अंधारात अचानक एक पाश्चात्य ऐतिहासिक पोशाखातील व्यक्ति घरात प्रवेश करते. आणि ‘कापलेले’ लाइट्स परत येतात. इथे आपण कुठल्या मॅडनेसला सामोरे जायचे आहे, याची कल्पना लेखक करून देतो. आपण शेक्सपियर आहोत हे ती व्यक्ती सांगते. ग्लॅमरस लग्नाचे स्वप्न पहाणारी आरती चटकन त्याच्या प्रेमात पडते. त्याच वेळी तिला पाहायला मुलगा येणार आहे.

पेशव्यांच्या विसाव्या पिढीतील वारस खास पेशवाई थाट करून पुण्याहून गोरेगावकडे कूच करत आहे. शेक्सपियर इथे, आलाय तो आपल्या किंग लियरचा फार्स करणार्या नाटककाराला जाब विचारायला. पुढे साक्षात बाजीरावाच्या वेषात आरतीला पहायला कुमार स्वामी तिथे येतो. आपल्या लक्षात येते की स्टेजवर सुरू असलेल्या नाटकातील ही पात्रे आहेत आणि नाटककाराच्या लेखणी बरहुकूम चालणार आहेत. रागात तो शेक्सपियरला द्वंद्वाचे आव्हान देतो. या नंतर तिथे एक मॅड गडबड सुरू होते, ती हाय बर्लेस्कचा हात कधी धरते, कधी सोडते.

एपिक गडबडचा उत्तरार्ध हा अनपेक्षितपणे एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या शेक्सपियर आणि बाजीरावातील द्वंद्व सुरू होण्या ऐवजी एक वेगळाच, अनपेक्षित मार्ग पकडतो. जे-जे घडते, ते सारे अनपेक्षित आहे तर्काचा हात सोडून स्वैर झालेले आहे. ते हास्यस्फोट करत राहते. एकाच वेळी समोर हा मॅड फार्स घडताना नाटकाच्या नावातील एपिक या शब्दाशी इमान राखत ते पोएटिक, लयदारही होते. अखेर फार्सिकल शैलीचे हे नाटक एका वेगळ्याच बाजात संपते.

या नाटकाचा हाय पॉइंट आहेत यातील सर्वच कलाकार. ते आपल्या भूमिकांशी एकरूप झालेत. त्यातील मॅडनेस त्यांनी आपल्या शरीरात भिनवलाय. नाटकातील नाटक असे स्वरूप असल्याने यातील पात्रे, प्रसंगी भूमिकेतून बाहेर पडूनही बोलतात. रचनेत एक कल्चरल फ्युजन आहेच. त्यामुळे पात्रे सफाईदार मराठी, इंग्रजी बोलतात. गाणी, स्लॅपस्टिक, डान्स सर्व करताना धमाल उडवतात.

अजय कांबळी सहजपणे बाब्या उभा करतात. पंचेस, टायमिंग वगैरे कसरत त्यांना करावी लागत नाही.मामी झालेल्या माधुरी गवळी पूर्ण करिकेचर आहेत. अखंड बडबड, प्रतिक्रिया, नृत्य कधी टायमिंग साधत, तर कधी मुद्दाम चुकवत त्यांनी मामी ही विनोदी होऊ न देता, फार्सीकल केली आहे. अंकित म्हात्रे यांचा मामाजी व्यवस्थित. भरत मोरे यांचा बाजीराव, लेखकाने इथे प्रेक्षकांना विश्वासात घेत, कन्नडीगा कुमारस्वामी म्हणून आणला आहे. त्यामुळे त्यांना बाजीरावाच्या ओझ्याखाली दबून राहावे लागत नाही. त्यांचा कुमारस्वामी हा त्यामुळे नाटकात सहज, मोकळा होतो. नाटकातील सर्वात महत्त्वाचा बदल, शेक्सपियर आता मध्यवर्ती भूमिकेत आला आहे. त्यामुळे नाटक त्याच्या अंगाने पाहता येते. निनाद लिमये यांनी ही भूमिका, तिची शरीरभाषा, नृत्य, पोएटिक व्हर्सेस यातून चांगली उभी केली आहे.

आकांक्षा गाडे आरती करताना खूपच वेधक. ती तयारीची अभिनेत्री आहे. गायन, नृत्य, संवादफेक आणि विनोद या सर्वांवर तिची पकड आहे. तिचा बाजीरावासोबत द्वंद्वाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यातच गंमत आहे.अमोघ फडके यांची प्रकाश योजना आणि रचिता अरोरा यांचे संगीत, नाटकाला अपेक्षित उठाव देते.

दामोदरची एपिक गडबड.
रविवारी 9 डिसेंबरला संध्याकाळी, दामोदर हॉलचा एपिक गडबडचा प्रयोग एका वेगळ्या गडबडीने संस्मरणीय ठरला. दामोदर हॉलचा मुख्य पडदा बिघडलेला असल्याने उघडाच होता. पुढे असलेला व्हर्टिकल कर्ट्न वापरून प्रयोग सुरू करतानाच तो पडदा अडकला आणि त्याने नाटक सुरू होण्यास तब्बल पाच मिनिटे घेतली. त्यानंतर लाईटस आणि साउंड कन्सोल्सना मिळणारा विद्युत पुरवठा मध्ये बंद होत होता. शॉर्टसर्किट झाले आहे हे कळल्यावर मकरंद देशपांडे यांनी प्रयोग मध्ये थांबवला. जनरेटर सुरू करून कन्सोल्स नॉर्मल करण्याचा प्रयत्न झाला. पण जनरल आणि काही लाईटस फक्त सुरू होते. लावलेले नऊ स्पॉट्स काम करत नव्हते. साउंड ही वेगळ्या जोडणीतून घ्यावा लागला. याने नाटकाला मिळणारी महत्वाची तांत्रिक साथ कमी झाली. नाट्यगृह सुस्थितीत असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यात बिघाड झाल्याने प्रेक्षकांचा रसभंग झाला आणि कलाकारांना त्रास सहन करावा लागला.

-आभास आनंद