घरमनोरंजनचित्रपट बनवणे हा माझ्यासाठी ‘सोहळा’

चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी ‘सोहळा’

Subscribe

आजवर अनेक दर्जेदार चित्रपट देऊन गजेंद्र अहिरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, आशयघन चित्रपट देत असतानाही चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य कमी होणार नाही, याकडेही त्यांनी आवर्जुन लक्ष दिले. एका बाजुला नायक हा चित्रपटाचा सर्वेसर्वा असताना गजेंद्र अहिरे यांनी नायिकेला कथेच्या पर्यायाने सिनेमाच्या मध्यवर्ती भूमिकेत आणले. अनेक राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेले लेखक, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी आपल्या सोहळा या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आपलं महानगर आणि मी या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात आपले आजवरचे अनुभव शेअर केले.. चित्रपट दिग्दर्शित करणे हे माझे स्वप्न होते आणि चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी सोहळा असतो, अशी भावना अहिरे यांनी व्यक्त केली.


 

- Advertisement -

असा वळलो चित्रपटाकडे

मला लहानपणापासून चित्रपटचा दिग्दर्शकच व्हायचे होते. चित्रपट कसा बनवायचा, त्याचे तंत्र काय असते ? याचा लहानपणापासूनच विचार करत होतो. वयाच्या ३२ व्या वर्षी म्हणजेच २००३ साली मी पहिली फिल्म बनवली. त्याआधी स्रिनप्ले लिहिले होते, नाटकात काम केले होते, मालिकाही लिहिल्या होत्या, तरि चित्रपटाचे दिग्दर्शकच व्हावे, असे कुठेतरी मनात कायम होते.

लहानपणापासून टीव्हीवर सिनेमा पाहत होतो. नववीत असताना प्यासा पाहिला होता. प्यासा मनला इतका भिडला की सिनेमा नक्की कसा बनतो याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. त्याचबरोबर मला संगीताचीही आवड होती. बरीचशी गाणी मला येतातही. संगीताची आवड असली तरी चित्रपटच करायचा, अशी कुठेतरी माझ्या मनानेच मला साद घातली होती. पण थेट सिनेमा करावा याचा अभ्यास नव्हता. कॉलेजला असताना एकांकिकेत काम करत होतो. मालिका लिहिल्या. कारण मुंबईत तग धरायचा तर काहीतरी करायला पाहीजे. त्यानंतर हळु हळु सिनेमाकडे वळलो. त्यातही सिनेमा कसा करावा? हे शिकायला फार वेळ गेला. अजूनही सिनेमा कसा करु नये, हे कळण्याइतपत येऊन पोहोचलोय. सिनेमा कसा करावा, याचा शोध कदाचित यापुढे सुरु होईल.

- Advertisement -

चित्रपट बनवण्यासाठी मी अभ्यास केला. हजारो चित्रपट बघितले. आज सिनेमे पाहण्यासाठी अनेक साधने आहे. माझ्यावेळी मी व्हीसीआर असेल, चित्रपट महोत्सव, टीव्ही, थिएटर अशा ठिकाणी जाऊन सिनेमे पाहीले. हे करताना नुसता चित्रपट पाहिला नाही, तर तो अभ्यासला देखील. चित्रपटाचा दिग्दर्शक कोण? त्याची शैली कशी आहे? चित्रपटाला संगीत कुणी दिले. त्याचे एडिटिंग कसे केले. याचा बारकाईने अभ्यास केला. त्याचबरोबर आनंद यादव, अरुण साधू यांची पुस्तके वाचत गेलो. विजय तेडुंलकरांच्या नाटाकांचा अभ्यास करत गेलो. हे सगळं करत असताना या सर्वांची सांगड घालत चित्रपट कसा होतो? याचा स्वतःचा परिपाठ करुन घेतला आणि मग मी सिनेमाकडे वळलो.

#Live : दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्याशी थेट गप्पा. विचारा तुमच्या मनातले प्रश्न.

#Live : दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्याशी थेट गप्पा. विचारा तुमच्या मनातले प्रश्न | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, December 28, 2018

आजचा सिनेमा पुस्तकासारखा झालाय

पुर्वी सिनेमा हा थिएटरमध्ये पाहिला जायचा. हजार-बाराशे प्रेक्षकांचा लसावि-मसावि काढून त्याप्रमाणे सिनेमा बनवला जात होता. पण जसे एखादे पुस्तक माणूस हातात घेऊन एकदा वाचतो, त्याप्रकारे आज माणूस मोबाइल हातात घेऊन एकटा सिनेमा पाहत आहे. आज आपल्याकडे ‘परहेड स्क्रिन’ आहे. म्हणजे आज प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या चित्रपट जोडला गेला आहे. म्हणजे आजच्या सिनेमातली संवेदनशीलता ही ‘पर्सनल कनेक्ट’ असणारी असली पाहीजे, या विचाराला आज मी येऊन पोहोचलोय. हा विचार मी पुर्वी करत नव्हतो. त्यामुळे पुस्तक वाचताना तुमच्या ज्या जाणीवा जागृत होतात, त्या जाणिवा सिनेमा बघताना जागृत व्हायल्या हव्यात, इतका धारधार एखाद्याचा सिनेमा असायला हवा. दुसरे असे की आज चित्रपट एका शहरापुरता किंवा राज्यापुरता मर्यादित नाही, तर तो युनिव्हर्सल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाचा कॉटेंट हा युनिव्हर्सल असायला हवा. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाच्या मनाला सिनेमा भिडला पाहीजे. यासाठी सिनेमाचे क्राफ्टिंग हे जागतिक दर्जाचे असायला हवे. ही शिकवण मला काळाच्या ओघात मिळाली.

आज थिएटर हा एकमात्र पर्याय नाही. आता अनेक प्लॅटफॉर्म आहे. जर सिनेमा चांगला असेल तर लोकं शोधून तो पाहतात. पिंपळपान हा सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे. जगभरातून हा सिनेमा पाहून मला रिप्लाय येत आहेत. डिअर मॉली हा माझा स्विडीश चित्रपट आता ऑस्करच्या रेसमध्ये आहे.

चित्रपट ही चॅरीटी नाही तर कमर्शियल आर्ट

चित्रपट ही फाइन आर्ट नाही तर कमर्शियल आर्ट आहे, याचे भान आपल्याला ठेवायला हवे. चित्रपट बनवायला करोडो रुपये लागतात. जो माणूस पैसे इनव्हेस्ट करतोय, अर्थातच त्याला त्याचे रिटर्न मिळायला हवे. चित्रपट ही चॅरीटी होऊ नाही शकत. त्यामुळे हा व्यवसाय आहे, हे पक्के लक्षात ठेवले पाहीजे. दुसरी गोष्ट हा व्यवसाय करत असताना त्याच्यात एक सचोटी असायला हवी. व्यवसाय आणि कलेचा ताळमेळ बसवावा लागतो. माझ्या पन्नास चित्रपटांपैकी अनेक सिनेमे एकाच निर्मात्याने पुन्हा पुन्हा केलेले आहेत. निर्मात्यांना माझ्यावर विश्वास असल्यामुळेच त्यांना माझ्यासोबत वारंवार काम करावंस वाटतं.

मी पटपट चित्रपट करतो, अशी टीका माझ्यावर अनेकांनी केली. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या क्षेत्रात तुमचं कामच तुम्हाला पुढचं काम देतं असतं. एखाद्या निर्मात्याला गाठून, पटवून तुम्ही निर्मात्याला नाही पटवू शकत. यासाठी तुम्हाला तुमचे नाणे खणखणीत वाजवावेच लागते. यश-अपयश आहेच. पण त्यात कुठेतरी बॅलेन्स असावा लागतो.

सिनेमा चांगला किंवा वाईट नसतोच. एकतर सिनेमा मनाला भिडतो किंवा भिडत नाही. या दोनच गोष्टी होतात. त्यामुळे कथा प्रेक्षकाला भिडणे महत्त्वाचे असते. चित्रपट ही एकजिनसी कला आहे. कारण चित्रपटाशी अनेक लोक जोडलेले असतात, पण त्या सर्वांना मिळून एक उत्तम कलाकृती बनवावी लागते. चित्रपट बनवताना माझ्यासमोर ज्या ज्या कथा येतात, त्या जर अणकुचीदार असेल तरच त्याला मी हात घालेन, या मतापर्यंत मी आता येऊन पोहोचलो आहे.

स्त्रीमुक्ती, समता चळवळीत काम केल्यामुळे माझ्या चित्रपटात स्त्री नायिका असते

स्त्रीवादी भूमिकेतून मी खुप काम केलेले आहे. १५ ते २० महिला निर्मात्यांनी माझ्याबरोबर काम केलेले आहे. आदिती देशपांड, निना कुलकर्णी आणि इतर महिला निर्मात्यांना माझी गोष्ट आवडली त्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिला. तृप्ती भोईर सुद्धा धडाडीची निर्माती आहे. तिच्यासोबत मी टुरिंग टॉकिज हा सिनेमा केला होता.

माझ्यावर माझ्या आईचा खुप प्रभाव आहे. तरुणपणी धडपडीच्या काळात मी स्त्रीमुक्ती चळवळीत काम केले होते, समता आंदोलनातही मी सहभागी होतो. मी जे वाचले, मी जे पाहिले, त्यातून मला व्यक्तिरेखा भेटत गेल्या. मी लिहिलेल्या पुरुष व्यक्तिरेखांपेक्षा माझ्या स्त्री व्यक्तिरेखा कधीही उजव्या आहेत. मी स्वतःला एक बाई मानतो. माझ्या लिखाणात एक बाई आहे आणि ती बंडखोर आहे. अनेक कणखर बायका मी आसपास पाहीलेल्या आहेत. जेव्हा केव्हा अशी कणखर बाई डोळ्यासमोर येते, तेव्हा वाटतं की काहीतरी बदल होईल आणि मग ती बाई माझ्या स्क्रिप्टमध्ये उतरते.

वृंदा आणि पुस्तकांनी मला प्रेरणा दिली

माझ्या आयुष्यातील सर्व बऱ्या वाईट प्रसंगात माझी बायको वृंदा माझ्यापाठी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या आयुष्यात असाही एक काळ होता जेव्हा एक बिस्किटचा पुडा आम्ही अर्धा अर्धा करुन खात होतो. बसच्या तिकिटाचे पैसे नाहीत, म्हणून चालत जात होतो. पण हे काही नशीबाने आलेली परिस्थिती नाही.. ही एक फेज आहे आणि ती नक्कीच जाणार, हे आम्हाला पक्के माहीत होते. माझ्या पहिल्या सिनेमापासून वृंदाने मला साथ दिली. आजही काही वेगळे करण्यासाठी ती मला पाठिंबा देते.

आपले सर्व काही विकू आणि पुन्हा शुन्यातून सुरु करु, असे ती तेव्हा आणि आजही म्हणते. शुन्य बघितलेल्या माणसाने पुन्हा शुन्यात जाण्याची तयारी दाखवणे किंवा तसे म्हणण्याचे धाडस दाखवणे. याचे मला खुप कौतुक वाटते. पहिले नाटक, सिनेमापासून वृंदा माझ्यासोबत आहे. प्रत्येक सिनेमावेळी आमच्यात चर्चा होते. माझ्या प्रत्येक सिनेमात डिरेक्टोरियल पार्टमध्ये वृंदाचे योगदान असते.

दुसरे म्हणजे पुस्तकांनी मला खुप आधार दिला. अरुण साधू यांचे शोधयात्रा माझ्या हातात असायचे. माझ्यासाठी ते बायबल झाले होते. अनेक पुस्तकांनी माझ्या आयुष्यात मला सोबत दिली आहे.

प्रत्येकात एक अभिनेता असतो

सायलेंसमध्ये नागराज सोबत काम केलं. अभिनेता कुणाच्यातही असू शकतो. अभिनेता म्हणजे काय तर त्यात संवेदना असला पाहीजे. कथेच्या गरजेप्रमाणे जर तुमचे शरीर जर चपखल बसत असेल तर अभिनेता कुणीही होऊ शकतो. नागराज मंजुळे मला सायलेंससाठी एकदम फिट्ट वाटला. नागराजला जेव्हा स्क्रिप्ट वाचून दाखवलं, तेव्हा त्यालाही स्क्रिप्ट प्रचंड आवडलं. आज सायलेंस बघितल्यानंतर ऐक वेगळाच नागराज त्यातून दिसतो.

सोशल कॉमेडी चित्रपट येणार आहे

मी आतापर्यंत गंभीर किंवा सामाजिक प्रश्न मांडणारे सिनेमे केलेले आहेत. कॉमेडी चित्रपट करायचे राहून गेले होते. आता मात्र मी सलग दोन कॉमेडी चित्रपट करत आहे. मात्र त्या चित्रपटाचा बाज थोडा वेगळा असेल. खुप दिवसांपासून सोशल कॉमेडी चित्रपट आलेला नाही. सगळं कुटुंब एकत्र बसून चित्रपट बघून हसतायत, अशाप्रकारचे ते चित्रपट असतील. मात्र त्यात फक्त कॉमेडी नसेल तर त्यात काही अंडरकरंटही असतील.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली तर मुंबई सुटसुटीत होईल

घरातून बाहेर पडून मी जी मुंबई पाहिलीये, ती मुंबई खुप वेगळी होती. त्या मुंबईने खुप काही शिकवलं. रात्री चालत चालत मी अख्खी मुंबई पाहिलेली आहे. लोकलमध्ये झोपलोय, प्लॅटफॉर्मवर रात्री बसून लेखन केलंय. त्यामुळे मुंबईवर खुप काही लिहिलेले आहे. ‘शेवरी’ नावाचा सिनेमा यावर मी बनवलेला होता, एक बाई रात्री बाहेर पडते आणि सकाळी घरी पोहोचते. एका रात्रीत तिने पाहिलेली मुंबई या सिनेमात दाखवली. त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

आजची मुंबई मला गोंधळल्यासारखी वाटते. खुप गडबड चालूये, ट्राफिक वाढलंय. हाही एक फेज असू शकतो, यातून मुंबई सुटेल असं वाटतं. मुंबईतच राहणाऱ्या माणसाला आज गोंधळल्यासारखी परिस्थिती वाटते, बाहेरच्या व्यक्तिचे सोडूनच द्या. मला असं वाटतं मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यायला हवं. आपण पाहतो एका-एका गाडीत किंवा रिक्षात एकच माणूस बसलेला असतो. जर लोकांनी ठरवलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायचा तर अनेक समस्या सुटू शकतात.


 

‘सोहळा’वाचून सचिन पिळगावकर रडले

‘सोहळा’ हा गजेंद्र अहिरे यांचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. याबद्दल सांगताना अहिरे म्हणाले की, जेव्हा याचे स्क्रिप्ट सचिन पिळगावकर यांना वाचून दाखवले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. प्रेम मरते म्हणजे नक्की काय होते?त्यानंतर त्याचे पिशाच्च आपल्या मानगुटीवर बसते. म्हणजे काय तर काही वर्षांपूर्वी आपल्या हातून एखादी चूक घडली असेल आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे काही नुकसान झाले असेल, ही जाणीव जेव्हा आपल्याला होते, त्यानंतर आपल्या आयुष्यात सोहळ्याला सुरुवात होते.

सोहळा सिनेमात सचिन पिळगावकर यांच्यासोबत विक्रम गोखले यांनीसुद्धा काम केलेले आहे. मात्र  सोहळा या चित्रपटात विक्रम गोखले यांचा तोंडी एकही वाक्य नाही. एखादा नट डोळ्यांनी काय करु शकतो, हे पाहायचे असेल तर सोहळा बघा, असे आवाहन अहिरे यांनी यावेळी केले. विक्रम गोखले हे वाचिक अभिनयातले ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत, पण सोहळा चित्रपटात त्यांनी  डोळ्यांनी देखील उत्कृष्ट अभिनय केला असल्याचे अहिरे म्हणाले.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -