घरमनोरंजन‘त्या दोन इडियट्स’ची गोष्ट

‘त्या दोन इडियट्स’ची गोष्ट

Subscribe

मराठी रंगभूमीवर सध्याच्या घडीला वैविध्यपूर्ण विषयांवर नाटकं सादर केली जात आहेत. नाटकांमधून गंभीर, सामाजिक, प्रबोधन करणारे विषय हाताळले जातात. मात्र बहुतांशी विनोदी नाटकांकडेच प्रेक्षकांचा कल असतो. आपसूकच निर्माते, दिग्दर्शकही विनोदी नाटकांच्या निर्मितीवर भर देतात. यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे विनोदी नाटकांमध्येही नवनवीन प्रयोग सध्या केले जात आहेत. विनोदी नाटकांमध्ये होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे नाटकांमध्ये खुबीने केलेला गाण्यांचा वापर. पूर्वी संगीत नाटकांना मोठा प्रेक्षकवर्ग असायचा. कालांतराने संगीत नाटकांचा प्रभाव कमी होत गेला. आता विनोदी नाटकांमध्ये देखील संगीताचा, गाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सांगितीक नाटकं सध्या रंगभूमीवर येत आहेत. आता हाच म्युझिकल टच घेऊन दोन ‘इडियट्स’ तुमच्या भेटीला आले आहेत. लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘इडियट्स’ हे म्युझिकल टच असलेलं विनोदी नाटक रंगभूमीवर नव्याने दाखल झालं आहे.

लग्न करण्यापेक्षा ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्याकडे तरुणांचा कल असतो. आपलं एकमेकांवर खरंचं प्रेम आहे का? आपलं एकमेकांबरोबर पटतं का? या सगळ्याचा निर्णय घेण्यासाठी किंवा अनेकजण लग्न करण्यापेक्षा आपल्या करिअर करण्याकडे जास्त लक्ष देतात. अशावेळी साहजिकच ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्याचा निर्णय घेतला जातो. काही वर्षांपूर्वी भारतात लिव्ह इनची संकल्पना रूजली. या नवीन पिढीने ती लवकर आत्मसातही केली. हळूहळू ही संकल्पना आपल्या सोसायटीने देखील मान्य केली आणि लग्न करणारे या लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणांच्या दृष्टीने ‘इडियट्स’ ठरले. अशाच या दोन भिन्न स्वभावांचे रूची आणि प्रितम तुम्हाला या ‘इडियट्सची’ गोष्ट सांगणार आहेत.

- Advertisement -

अभिनेता सागर कारंडे आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांची मुख्य भूमिका असलेले हे नाटक निव्वळ तुमचं मनोरंजन करेल. नाटकाचा विषय वेगळा असला तरी नाटकाच्या योग्य मांडणीने तो हसतखेळत प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. फायनान्समध्ये जॉब करणारा प्रितम आणि मीडिया कंपनीमध्ये वर्तवणूक अभ्यासकाच्या उच्च पदावर जॉब करणारी, भरभक्कम पॅकेज असणारी रूचा यांची आपल्या कॉमन फ्रेंड्सच्या पार्टीत ओळख होते. पुढे ही ओळख वाढत जाते आणि ते दोघंही लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. प्रितमचा स्वभाव हा अतिशय विनोदी असतो. तो आयुष्याकडे फार गंभीरपणे बघत नाही, तर प्रितमच्या बरोबर विरूध्द स्वभाव हा रूचाचा असतो. आपल्या करिअर फोकस असणारी, काहीशी सीरिअस अशी रूची. आपले स्वभाव विरूध्द असतानाही आपल्याला एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडतो. यासाठी हे दोघं लग्न करण्यापेक्षा लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. पण लिव्ह इनमध्ये राहताना दोघेही स्वत:ला काही अटी घालून घेतात. इतर लग्न झालेले कसे भांडतात, एकमेकांवर संशय घेतात, ते कसे इडियट्स असतात. आपण इडियट्स न बनता एकमेकांना स्पेस द्यायची, भांडायचं नाही अशा अटी ते एकमेकांना घालतात आणि लिव्ह इनमध्ये राहतात. याचवेळी ती ही ठरवतात की जर अगदीच आपलं भांडण झालं तर तीन भांडणांनंतर आपलं ब्रेकअप…आता रूचा आणि प्रितम एकत्र राहतात का? त्यांच्यात तीन भांडणं होतात का? की लिव्ह इन मध्ये राहण्यामुळे त्यांच्या आयुष्याला आणखी काही वेगळं वळण मिळतं हे कळण्यासाठी तुम्हाला इडियटस हे नाटक थिएटरमध्ये जावून बघावंच लागेल.

‘इडियट्स’ हा पूर्ण म्युझिकल ड्रामा आहे. नाटकात गाण्यांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. साध्या डायलॉगला एक चाल लावल्यामुळे त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर जास्त पडतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रितम आणि रूचा यांचं मोबाईलवर होणारं चॅटींग. मोबाईल टोनचा वापर करून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. संगीतकार राहुल रानडे यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. त्याचबरोबर पुरूष हवा ही अनुराधा पोदारांच्या कवितेचाही सुंदर वापर नाटकात करण्यात आला आहे. या गाण्यांमधली सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ही सगळी गाणी कोणत्या गायकाकडून गाऊन न घेता. नाटकातील पात्रांनीच म्हणजे सागर आणि स्मिताने गायल्यामुळे यात कृत्रिमपणा जाणवत नाही. या नाटकाचे फुलवा खामकर हिने नृत्यदिग्दर्शन केले आहे. आजपर्यंत फुलवा खामकरने केलेल्या अनेक सुंदर नृत्यांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. या आधी तिने अनेक नाटकांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. विनय आपटे दिग्दर्शित ‘एक लफडं विसरता न येणारं’ या नाटकाला फुलवाचं नृत्यदिग्दर्शन होतं. मात्र इडियट्स बघताना अनेक गाण्यांमध्ये ओढून ताणून नृत्य बसवल्यासारखं वाटत राहतं. अनेकवेळा स्मिता आणि सागर अमूक एक स्टेप बसवली आहे म्हणून करताना दिसतात. गाण्यांइतकाच साधेपणा नृत्यात आला असता तर नाटक बघताना आणखी मजा आली असती.

- Advertisement -

श्रीरंग गोडबोले यांनी नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. केवळ दोन पात्र नाटकात असताना एखादी विषय प्रभावीपणे मांडण्याची कसब दिग्दर्शकाने पूर्णपणे या नाटकात वापरली आहे. नेपथ्याचापण पुरेपूर वापर संपूर्ण नाटकात केला गेला आहे. दोघांची घरं, कॉफी शॉप, क्लब यांचं उत्तम गणित जमून आलं आहे. मध्यंतर आधी काहीसं नाटक ताणलं गेलं आहे; पण मध्यंतरानंतर नाटक चांगला वेग पकडतं. सागर कारंडे आणि स्मिता तांबे यांच्या भन्नाट अभिनयामुळे नाटकाला चार चांद लागले आहेत. दोघांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. आजपर्यंत आपण सागरला विनोदी भूमिकांमध्ये बघत आलो आहोत. पुन्हा एकदा विनोदी भूमिका सागरच्या वाट्याला आल्यामुळे ही भूमिका साकारणं त्याला फारसं कठीण गेलं नसेल. मध्यंतराआधी काहीसा सागर हा आपण आधीच्या भूमिकांमध्ये बघितल्याप्रमाणेच आपल्याला दिसतो. पण मध्यंतरानंतर एक वेगळ्या एनर्जीने सागरचा वावर स्टेजवर दिसतो आणि सागर प्रेक्षकांसकट पुढचं नाटक सहज आपल्या खिशात घालतो. मात्र आजपर्यंत आपण कधीही न बघितलेली स्मिता तांबे या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते. या दोघांची केमिस्ट्रीही चांगली जमली आहे. त्यामुळे नाटकात केवळ दोन पात्रं असतानाही तुम्हाला कंटाळा येत नाही.एकंदरीतच आजच्या काळाशी सुसंगत असं हे हलकं फुलकं नाटक आहे. या नाटकातून तुम्हाला काही संदेश मिळेलच असं नाही. पण नाटकाचे ते तीन तास तुम्ही टेंशन विसराल हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -