घरमनोरंजनराजा बेटा’ कुटुंबाचे पालकत्व स्वीकारणार

राजा बेटा’ कुटुंबाचे पालकत्व स्वीकारणार

Subscribe

दक्षिणेकडच्या बर्‍याचशा चित्रपटांच्या शिर्षकात ‘राजा’ हा शब्द आवर्जून आलेला आहे. इतकेच काय तर गाण्यातही या शब्दाचा सर्रास वापर झालेला आहे. बॉलिवूड चित्रपटांचीसुद्धा यातून सुटका काही झालेली नाही. ‘राजा’ शिर्षकातील डझनभर तरी चित्रपटांची नावे घेता येतील. छोट्या पडद्यालासुद्धा हा मोह काही आवरता आलेला नाही. ‘एक था राजा’, ‘एक थी रानी’, ‘जमाई राजा’ आणि आता ‘राजा बेटा’ ही मालिका झी हिंदी वाहिनीवर सुरू होत आहे.

सर्वच चॅनलचा स्वतंत्र असा प्रेक्षकवर्ग आहे. त्यांना सातत्याने मनोरंजन करू शकेल असे कार्यक्रम द्यावे लागतात. प्रत्येक वाहिन्यांचा तसा प्रयत्न असतो. पण नव्या वर्षातील जानेवारी महिना हा प्रत्येक वाहिनीसाठी खास असतो तसाच झी हिंदी वाहिनीवाल्यांसाठीही खास राहिलेला आहे. त्याची दोन कारणे आहेत. एकतर जबरदस्त मनोरंजन करू शकेल अशी कौटुंबीक मालिका त्यांना द्यायची होती. दुसरे म्हणजे या वाहिनीच्या व्यवसाय विभाग प्रमुख अपर्णा भोसले यांच्या नेतृत्वात काही चांगले घडवण्याच्यादृष्टीने त्यात प्रयत्न व्हायला हवेत हा दृष्टीकोन या नव्या मालिकेच्या निर्मितीत होता. ‘राजा बेटा’ ही ती मालिका सांगता येईल. १५ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे.

मालिकांचे युग सुरू झाले त्याला आता तीन दशकांहून अधिक काळ गेलेला आहे. यात कौटुंबीक मालिका सादर करणे हा त्यातला एक भाग तेव्हा सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे. त्याला कारण म्हणजे प्रेक्षकांना अपेक्षित वेगवेगळे प्रयत्न कथानकात केले गेलेले आहेत. अर्थात यात चांगला प्रयत्न झाला तसा वाईटही झालेला आहे. जे कुटुंबात कधी दिसत नाही ते दाखवण्याचा प्रयत्न बर्‍याचशा वाहिनींनी केलेला आहे. अर्थात प्रेक्षक मिळवण्यासाठी वाहिनीवाले कथासूत्रात भडकपणा आणतात हे आता प्रेक्षकांना कळून चुकलेले आहे. राग-रुसवे, विवाहबाह्य संबंध, खून, अत्याचार असा कौटुंबीक मालिकेचा प्रवास अघोरी कृत्य करण्यापर्यंत पोहोचलेला आहे. टीआरपी मिळवण्यासाठी कायपण असेच काहीसे या मालिकांच्या बाबतीत सांगता येईल.

- Advertisement -

राजा बेटाची कथा खर्र्‍याअर्थाने कौटुंबीकच म्हणावी लागेल. त्रिपाठी कुटुंबियांनी वेदांत नावाच्या मुलाला दत्तक घेतलेले आहे. खरंतर या कुटुंबात एक मुलगा असताना दुसर्‍या मुलाला लाडाने वाढवणे, त्याचे संगोपन करणे खर्‍या मुलाला आवडत नाही. दोघे जसजसे मोठे होतात, तसतसे दोघेही आपापला रंग दाखवायला लागतात. खरा मुलगा चंगळ संस्कृतीच्या आहारी जातो. घर उद्ध्वस्त होण्याची पाळी येते. अशा स्थितीत दत्तक मुलगा वेदांत या संपूर्ण कुटुंबाला दत्तक घेतो. अशी या मालिकेची संकल्पना आहे. ‘वेदांत सब संभाल लेगा’ हे त्यांचे घोषवाक्य आहे.

आजवर कुटुंबाचा सांभाळ करायचा तर तो कुटुंबातल्या स्त्रीने असे काहीसे बिंबवले गेलेले आहे. काही अंशी ते खरेही आहे. पण या ‘राजा बेटा’ या मालिकेमध्ये एक युवक कुटुंबाची कशी काळजी घेतो हे दाखवलेले आहे. स्मृती शिंदे ही या मालिकेची निर्माती आहे. वेदांतची मुख्य व्यक्तिरेखा राहुल सुधीर याने साकार केलेली आहे. संभावना मोहंती, फेनील उग्रीगर यांचा कलाकार म्हणून सहभाग आहे. कौटुंबीक मालिका म्हटली की कुटुंबाला जोडणारं गाणं हे आलंच. पत्रकार परिषदेमध्ये प्रथमच एक प्रयत्न झाला, तो म्हणजे आशिष यांनी लिहिलेले गीत केदार यांनी संगीतबद्ध केले व हे गीत मालिकेतल्या कलाकारांनी सुरेलपणे गाऊन दाखवले.

- Advertisement -

स्मृतीची यादगार वाटचाल
सांस्कृतिक मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी सुशीलकुमार शिंदे यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. प्रणोती या त्यांच्या एका मुलीने राजकारणात पदार्पण केले, तर स्मृती शिंदे हिने कलेच्या प्रांतात स्वत:ची अशी घडी बसवलेली आहे. निर्माती म्हणून तिची स्वतंत्र ओळख आहे. भारतातल्या बर्‍याचशा वाहिन्यांसाठी तिने मालिकांची निर्मिती केलेली आहे. मराठीत लोकप्रिय ठरलेल्या ‘बोले तो मालामाल’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकांची निर्मिती तिने केलेली आहे. हिंदी झीवर नव्याने सुरू होणारी ‘राजा बेटा’ ही तिची मालिका आहे. स्मृतीचा यादगार प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने साधलेला सुसंवाद.

राजा बेटाची निर्मिती करण्याचे कारण काय?
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला जी काही लोकप्रियता लाभली ती लक्षात घेऊन मी हिंदी मालिका करावी असे सुचवले गेले. युवराज भट्टाचार्य यांनी मला कथा ऐकवली. आजवर कुटुंबाचा आधार म्हणून स्त्रीचाच विचार होतो, पण पुरुषांमध्ये देखिल ही गुणवत्ता आहे हे सांगणारी ही कथा मला आवडली आणि त्यामुळे मी ‘राजा बेटा’ची निर्मिती करूशकले. भारतीय प्रेक्षक आणि हिंदी झी वाल्यांची मागणी याचा विचार करुन राजस्थानमध्ये सध्या या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. अलाहाबादमधील लोकजीवनाची पार्श्वभूमी या कथेला दिलेली आहे.

बहिणीप्रमाणे तुलाही राजकारणात येता आले असते का?
मी मुळात सोलापूरची; पण माझे शालेय शिक्षण मुंबईत झालेले आहे. आज ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणतो ती एकता कपूर, उदय चोपडा आम्ही सर्व एकाच शाळेमध्ये होतो. आम्हाला नेणारी स्कूलबस एकच होती. यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी कलेच्या क्षेत्रात आले. लहानपणापासून मला या कलेची आवड होती. त्यामुळे राजकारणात जाऊन काही करावे असे मला कधीच वाटले नाही. पण भविष्यात गरज वाटली तर राजकारणात उतरेनसुद्धा. अभिनय-दिग्दर्शन याहीपेक्षा निर्मितीत आपलं स्वत:चं अस्तित्व दाखवणे मला महत्त्वाचे वाटते. या एकाच गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे मी दर्जेदार मालिका देऊ शकलेली आहे. दक्षिणेत माझ्या सध्या पाच मालिका सुरूआहेत. यावरुन या व्यवसायात मी किती गुंतलेली आहे याची कल्पना येईल.

वडिलांकडून कोणता गुण तू घेतला आहेस?
वडील फक्त मुरब्बी राजकीय नेतेच नाहीत तर वक्ते, कवी मनाचा माणूस, कौटुंबिक जाणीव असलेला आदर्श पिता, कलावंत अशी त्यांची ओळख आहे. यातला कोणताही गुण माझ्या अंगी नाही. कामातली तत्परता, शिस्त, नव्या गोष्टीचा शोध घेणे हे मात्र त्यांच्या स्वभावातले काही गुण मी घेतलेले आहेत. ते सांस्कृतिक मंत्री असताना मी लहान होते. तेव्हापासून अनेक नामवंत कलाकार त्यांना भेटायला येत. त्यांच्याशी वडिलांचा असलेला स्नेह पाहून मी बहुतेक कलेच्या प्रांतात निर्माती म्हणून आली असेन. वडिलांचे जनमाणसातील नाव आणि माझा कार्यविकास लक्षात घेता आजसुद्धा मला स्वत:ला मिरवता येत नाही. पडद्यामागे राहून सूत्र सांभाळणे मला आवडते.

वडिलांच्या नावाचा कितपत फायदा घेतेस?
स्वत:च्या पायावर उभे रहा ही आमच्या वडिलांची शिकवण आहे. याचा अर्थ मी त्यांची मुलगी आहे हे कोणाला माहीत नाही असे नाही. पण मी शक्यतो माझ्या या प्रयत्नात त्यांच्या नावाचा फारसा उपयोग करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ते माझ्या वागणुकीतून दाखवतही नाही. आज निर्माती म्हणून जे काही करूशकले त्याच्यामागे त्यांचा आशिर्वाद, प्रेरणा आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळेच आता अनेक मालिका केल्यानंतर मी चित्रपट निर्मितीचीही तयारी केलेली आहे. सध्या एका चित्रपटासाठी तीन संहिता वाचलेल्या आहेत.

‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटाबद्दल काय सांगशील?
हा चित्रपट वडिलांच्या सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीचा मागोवा घेणारा चित्रपट होता. आजच्या भाषेत सुशीलकुमार शिंदे यांचा बायोपिक म्हणावा लागेल. चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. निर्मात्याला त्यांच्या जीवनावर चित्रपट यावा असे वाटत होते. वडिलांनी संमती देण्यापलीकडे सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे त्यांनीच निर्मिती करुन तो चित्रपट प्रदर्शित केला होता. त्यामुळे मी निर्माती या नात्याने काही सुचवावे असे मला वाटले नाही. पण चित्रपट बाकी छान झाला हे मी आवर्जून सांगेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -