घरमनोरंजनसादरीकरणात गणलेला वास्तववादी चित्रपट - पळशीची पीटी

सादरीकरणात गणलेला वास्तववादी चित्रपट – पळशीची पीटी

Subscribe

खेळांडूंच्या बाबातीत गावागावातील, खेड्यातील असणारे वास्तव 'पळशीची पीटी' या चित्रपटात मांडण्यात आलं आहे.

क्रिकेट या खेळाव्यतिरीक्त भारतात इतर खेळांना फार महत्त्व दिलं जात नाही. देशात गावागावात – खेडोपाड्यात उत्तम टॅलेंट आहे. पण योग्य मार्गदर्शन आणि आजूबाजूच्या लोकांच्या निरूत्साहामुळे त्यांना संधी मिळत नाही. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत किंवा सातारा जिल्ह्यातील माणसारख्या दुष्काळी भागातून आलेली ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबर, यांच्यासारखं भाग्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मुलींना मिळत नाही. अनेकदा आपल्या मुलीत उत्तम गुण असूनही घरातील पालकांच्या नकारामुळे योग्य संधी मिळूनही त्या मुली पुढे येऊ शकत नाही. परिणामी देश इतर खेळांमध्ये मागे पडतो. अनेकांची राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची स्वप्न ही स्वप्नच राहतात. खेळांडूंच्या बाबातीत गावागावातील, खेड्यातील असणारे वास्तव ‘पळशीची पीटी’ या चित्रपटात मांडण्यात आलं आहे.

खरा खेळाडू हा शाळेतूनच घडत असतो. मात्र खेळाप्रती शालेय पातळीवर असणारी निरूत्साहता, खेळाडूंना दिली जाणारी वागणूक आणि त्याचे खेळाडूंवर होणारे परिणाम पळशीची पिटीमध्ये अधोरेखीत करण्यात आले आहेत. मात्र विषयजरी वास्तववादी असला तरी तो मांडण्यात दिग्दर्शक धोंडिबा कारंडे कमी पडले आहेत. धोडिंबा कारंडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मीती केली आहे. या सिनेमाचा विषय नक्कीच कौतुकास्पद आहे. पण धोंडिबा कारंडे यांचे हे पहिलेच दिग्दर्शन आहे. चित्रपट बघताना हे वेळोवेळी जाणवते. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांसमोर उभा रहात नाही.

- Advertisement -

साताऱ्याच्या पळशी गावात राहणारी भागी (किरण ढाणे) ही मुलगी आपल्या कुटूंबासोबत माळरानावर रहात असते. घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे भागी दररोज शाळेत अनवाणी धावत जाते. गावातील शाळा अप्पा पवार (तेजपाल वाघ) या राजकारणीयाच्या ट्रस्टमधून चालत असते. शाळेत देशमुख सर (धोंडिबा कारंडे) शाळेत क्रिडी शिक्षक असतात पण त्यांची खेळाप्रती असणारी निरूत्साहता वेळोवेळी दिसते. एकेदिवशी शाळेत जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेची नोटीस येते. यावेळी भागी आणि आणखी एका मुलीची यासाठी निवड केली जाते. या स्पर्धेला जाण्याचे देशमुख सर टाळतात आणि ही जबाबदारी चित्रकलेच्या बिडकर सरांवर येते. या स्पर्धेत भागी अनवाणी धावते आणि प्रथम क्रमांक पटकावते. या स्पर्धेत केवळ भागी येत नाही तर कमी वेळात धावण्याचा विक्रम मोडते. यानंतर भागीला राज्य स्तरावर स्पर्धेत पाटवण्याचा निर्णय शाळा घेते. मात्र याचवेळी नेमकं भागीच लग्न ठरतं. त्यामुळे भागीच्या घरचे स्पर्धेत जाण्यास नकार देतात. आता भागी राज्य स्तरीय स्पर्धेत भाग घेणार का की लग्न करणार हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच समजेल.चित्रपटातून आणखी एक मुद्दा मांडण्यात आला आहे तो म्हणजे भागीच्या स्पर्धेसाठी सगळा खर्च, तिची तयारी बिडकर सर करून घेतात. मात्र याच श्रेय बिडकर सरांना कधीच मिळत नाही. जेव्हा श्रेय घ्यायची वेळ येते तेव्हा देशमुख सर नेहमी पुढे येतात.

चित्रपटात सगळ्याच कलकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली आहे.भागीच्या भूमिकेतील किरण धाणे, राहुल बेलापूरकर, तेजपाल वाघ , धोडिंबा कारंडे ,राहुल मगदूम या कलाकारांनी आपली भूमिका समरसून केली आहे. पण मुळातच पटकथेत आणि दिग्दर्शनात जोर नसल्यामुळे या भुमिकांना योग्य न्याय मिळत नाही. चित्रपटाच्या सुरूवातीची अनेक दृश्य उगाच ताणली गेली आहेत. चित्रपटातील जत्रेचे दृश्य अवास्तव वाटते. त्याप्रमाणे एडिटींगमध्ये देखील चित्रपट गणला आहे. दृश्यांची सरमिसळ अनेक ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे जरी ‘पळशिची पीटी’ सादरीकरणार बिघडला असला तरी एक उत्तम विषय म्हणून एकदा बघायला काहीच हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -