‘वाय’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही 'वाय' या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा सिनेमा येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही ‘वाय’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘वाय’ या चित्रपटाचे एक टिझर झळकले होते. त्यात चित्रपटातील सर्व अभिनेत्रींचे दर्शन घडले होते. एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडींची एक धावती झलक यात दिसली होती. यात मुक्ता बर्वे व्यतिरिक्त प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले होते. या टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे.

‘वाय ‘ चित्रपटाच्या या दुसऱ्या टिझर मधून चित्रपटातील अभिनेतेही आता प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. यात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘वाय’ मधील सर्व चेहरे आता गुलदस्त्याबाहेर आल्यामुळे 13 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलर बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.