घरमनोरंजनहतबल परिस्थितीतल्या गुन्हेगारीचा ‘मुळशी पॅटर्न’

हतबल परिस्थितीतल्या गुन्हेगारीचा ‘मुळशी पॅटर्न’

Subscribe

विकासाच्या नावाखाली अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या, हातात आलेला पैसाही संपला. सोबतच अनेक पिढ्यांचं नुकसान करून गेलेली रक्तरंजित कथा म्हणजेच ‘मुळशी पॅटर्न’.

प्रत्येक शहराचा, गल्लीचा एक राजा असतो. कोणीही अशी पदवी त्याला न देता त्याने ती स्वत:च ती स्विकारलेली असते आणि सगळं शहर त्यांच्या दहशतीखाली वावरत असतं. जंगलाचा जसा एकच राजा असतो अगदी तसाच. त्याचा पॅटर्नच वेगळा असतो. आपल्या पॅटर्नप्रमाणे तो जग जिंकायला निघतो. कोणालातरी मारून तो जंगलचा राजा झालेला असतो. पुढे कोणीतरी त्याला मारायला टपलेलं असतंच. मात्र ही जंगली जात तयार होण्यामागे अनेक कारणं आ वासून उभी असतात. ही कारणं संपली पाहिजेत. विकासाच्या नावाखाली अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या, हातात आलेला पैसाही संपला. एक पिढी तर बरबाद झालीच. पण पुढे तयार झालेल्या अनेक पिढ्यांचं नुकसान करून गेली. अशाच या जीवघेण्यामागील‘कारणां’ची रक्तरंजित कथा म्हणजे ‘मुळशी पॅटर्न’.

मुळशी तालुक्याच्या पाटलाची ही कथा. गावचा पाटील असणारा सखाराम (मोहन जोशी) आपली वडिलोपार्जित जमीन विकून पैसे संपल्यानंतर शेवटी त्याच बिल्डरच्या हाताखाली वॉचमनची नोकरी स्वीकारण्याची वेळ त्याच्यावर येते. त्याचा मुलगा राहुल (ओम भूतकर) जमीन विकल्याच्या कारणावरून आपल्या वडिलांना सतत टोमणे मारत असतो. हातातून जमीन आणि राहतं घर गेल्यानंतर पाटील, राहुल, आई आणि नवर्‍याने टाकलेली बहीण गाव सोडून पुणे शहर गाठतात. रोजीरोटीसाठी वडील पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हमालीची नोकरी करतात. पुण्यात आल्यावर झोपडपट्टीत राहिल्यावर त्यांना कळतं की गावातून आलेले ते एकटेच नाहीयेत. तर जमिनी गेल्यामुळे अनेक कुटुंबच्या कुटुंबं शहराकडे आली आहेत.

- Advertisement -

गरम डोक्याचा राहुल एकदा किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत जेलमध्ये जातो. तिथे त्याची भेट नन्या भाई (प्रविण तरडे)शी होते. त्यावेळी नन्याभाई जंगलाचा राजा असतो. राहुल जेलमधून बाहेर आल्यानंतर नन्याभाईच्या गोटात सामील होतो. आपल्या भाईला खूष करण्यासाठी राहुल वाट्टेल ते काम करायला तयार होतो. तो चुकीचा नसतो; पण बरोबरही नसतो. पण दुसरीकडे आपल्या वडिलांची जमीन जाण्यामागे नन्याभाईचा हात असल्याचं समजल्यावर आणि आता आपण या जंगलाचा राजा व्हायला हवं या हव्यासापोटी एकदिवस भाईचाच जीव घेतो. आता तो पोलीस, कायदे या सगळ्याच्या पलिकडे गेला असतो. इथे कायद्याने पोलिसांचे हात बांधलेले असतात. समोर गुन्हेगार दिसत असतानाही ते काही करू शकत नाही. पण इन्स्पेक्टर कडू यांचा ‘पॅटर्न’च वेगळा असतो, ‘गुन्हेगारी संपवायची असेल तर आधी गुन्हेगार संपला पाहिजे’ अशी यावर नामी युक्ती ते वापरतात.

ही कथा मुळशी तालुक्याची जरी असली तरी शहराच्या बाजूला संपत चाललेल्या प्रत्येक गावाला ती लागू होते. केवळ जमीन विकल्यावर एक पिढी नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांचं यामध्ये नुकसान होतं. सगळेच गुन्हेगार होतात असं नाही. पण गुन्हेगारीसारखा सोपा मार्ग अनेकजण जवळ करतात. विषय साधा, सरळ असला तरी त्याची मांडणी दमदार झाली आहे. चित्रपटातील अनेक वाक्य विचार करायला भाग पाडतात. ‘मेल्यानंतरही मारत रहायचं.., आपला पॅटर्नच वेगळा’ अशी अनेक चित्रपटातील वाक्य टाळ्या, शिट्या मिळवून जातात. याचं सगळं श्रेय चित्रपटाचे दिग्दर्शक, संवाद लेखक प्रविण तरडे यांना जातं. चित्रपटाचा शेवट जरी आपला चित्रपट बघताना कळला तरी हे कधीही न थांबणारं आहे याचं उत्तम उदाहरण देऊन जातो. मध्यंतरापर्यंत चित्रपट प्रेक्षकांची पूर्ण पकड घेतो खरा; पण मध्यंतरानंतर थोडा चित्रपट रेंगाळतो. पण त्याचा कंटाळा येत नाही. कारण पडद्यावर सतत काहीतरी घडत असतं आणि त्यात आपण गुंतून जातो. चित्रपटातील ‘आररररर…खतरनाक’ हे गाणं उत्तम जमून आलं आहे. पण बाकीची गाणी मध्येच उगवल्यासारखी वाटतात.

- Advertisement -

चित्रपटात सगळ्यांचा अभिनय उत्तम झाला आहे. ओम भूतकरने राहुल ही भूमिका अक्षरश: जगला आहे. त्याने साकारलेला राहुल कधी आपल्याला चीडही आणतो तर कधी कधी डोळ्यात पाणी. मोहन जोशी यांनी साकारलेली पाटलाची भूमिका नेहमीप्रमाणे उत्तम रेखाटली आहे. जमीन विकल्याचं ओझ आयुष्यभर पाठीवर आणि डोळ्यात साठवून ते जगत असतात. राहुलचा जीवलग मित्र गण्या क्षितीज दातेने चांगल्याप्रकारे वठवला आहे. तर सुनील अभ्यंकर यांनी साकारलेला वकिलही लक्षात राहतो. एकंदरच दमदार अभिनय, संवाद आणि मुख्यत: खर्‍या अर्थाने वेगळा विषय यामुळे चित्रपटाचा पॅटर्नच वेगळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -