घरफिचर्सअणूकार्यक्रमाचे शिल्पकार होमी भाभा

अणूकार्यक्रमाचे शिल्पकार होमी भाभा

Subscribe

होमी जहांगीर भाभा हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते. भारतातील अणुसंशोधन व अवकाश-संशोधन कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार. भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई येथे सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले. १९२७ मध्ये त्यांनी केंब्रिज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९३० मध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३२-३४ या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली होती. १९३४ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली.

भाभा यांना सैद्धांतिक विज्ञानाची, विशेषतः गणिताची, फार आवड होती. पी. ए. एम. डिरॅक या सुप्रसिद्ध गणितीय भौतिकीविज्ञांकडे त्यांनी गणिताचे अध्ययन केले. भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन यांच्या परस्पर प्रकीर्णनाच्या काटच्छेदाच्या गणनेसंबंधी असून हे प्रकीर्णन त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. डब्ल्यू हायलाइटर यांच्या बरोबर भाभा यांनी संशोधन करून विश्वकिरणांमध्ये जे द्वितीयक इलेक्ट्रॉन वर्षाव मिळतात त्यांचे ‘प्रपात प्रक्रिया’ या नावाने ओळखण्यात येणारे स्पष्टीकरण दिले. या मीमांसेप्रमाणे विश्वकिरणांतील उच्च ऊर्जायुक्त प्राथमिक कण (प्रोटॉन) पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याची वातावरणातील अणूंबरोबर विक्रिया होऊन शेवटी गॅमा किरण मिळतात. गॅमा किरणांचे योग्य परिसरात इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मात परत रूपांतर होते.

- Advertisement -

गॅमा किरणनिर्मिती व इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन युग्मनिर्मिती या घटना पुनःपुन्हा एकामागून एक होत गेल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन त्याचे वर्षावात रूपांतर होते. हा सिद्घांत ‘भाभा-हाइलाइटर सिद्धांत’ या नावाने प्रसिद्ध आहे. भाभा यांनी ‘मेसॉन’ या मूलकणाचे अस्तित्व ओळखण्याच्या दृष्टीने विशेष कार्य केले आहे. भाभा यांनी केलेल्या कार्याला सर्वत्र मान्यता मिळाली. १९४० मध्ये त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्रपाठकपद स्वीकारले. १९४५ मध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते. १९४८ मध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाभा यांची नेमणूक झाली. भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात भाभा यांचा मोठा वाटा आहे.

इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अँप्लाइड फिजिक्स या संस्थेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रे व इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सभासद म्हणून भाभा यांनी काम केले. भाभा यांना १९४२ मध्ये केंब्रिज विद्यापीठाचे अ‍ॅडम्स पारितोषिक आणि १९४८ मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक मिळाले. १९५४ साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला. अशा या महान शास्त्रज्ञाचे २४ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -