घरफिचर्सजगातील विश्वसनीय वृत्तसंस्था

जगातील विश्वसनीय वृत्तसंस्था

Subscribe

जगभरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत त्यांची माहिती काही सेकंदात पोहोचवणार्‍या बीबीसी या प्रसारण संस्थेने ५ जुलै १९५४ मध्ये पहिले न्यूज बुलेटिन प्रसारित केले होते.

बीबीसी अर्थात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड. अनेक मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रमांची निर्मिती करून दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन), आकाशवाणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बीबीसी करते. १८ ऑक्टोबर १९२२ मध्ये ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड या नावाने स्थापित झालेली बीबीसी १९२७ मध्ये सार्वजनिक संस्था बनली. जगभरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत त्यांची माहिती काही सेकंदात पोहोचवणार्‍या बीबीसी या प्रसारण संस्थेने ५ जुलै १९५४ मध्ये पहिले न्यूज बुलेटिन प्रसारित केले होते. २० मिनिटांची ती बुलेटिन लाईव्ह न होता पूर्वीच रेकॉर्ड करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बीबीसीमध्ये इंग्लंडमध्येच सुमारे २८ हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तसेच ८०० कोटी डॉलरहून अधिक बीबीसी या प्रसारण संस्थेची आर्थिक उलाढाल आहे. बीबीसी ही अंशतः स्वायत्त सार्वजनिक संस्था असून, ही संस्था बीबीसी ट्रस्टद्वारे चालविण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या राजकीय आणि आर्थिक प्रभावाला बळी न पडता मुक्तपणे दर्शक आणि श्रोत्यांना केवळ जागतिक घडामोडींची माहिती देण्याचे कार्य मागील अनेक वर्षे बीबीसी करत आहे. आज बीबीसीचा वटवृक्ष झाला आहे. जगातील जवळपास सर्वच प्रमुख देशांमध्ये बीबीसीची पाळेमुळे पसरली आहेत. ३ जानेवारी १९३८ मध्ये बीबीसी वर्ल्डने प्रथम अरबी या भाषेतून विदेशी भाषांमधून कार्यक्रमांच्या प्रसारणाला सुरुवात केली. दुसरे महायुद्ध, शीतयुद्धाच्या काळात लोकांपर्यंत इत्थंभूत माहिती पोहोचविण्याचे कार्य बीबीसीने केले. १९४५ नंतर बीबीसी प्रोग्रामिंगसाठी जगप्रसिद्ध झाली. बातम्यांव्यतिरिक्त बीबीसी वर्ल्डवर त्याकाळी जॉन पील आणि एडवर्ड ग्रीनफील्डद्वारे प्रस्तुत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे प्रसारण होई. याप्रमाणेच साप्ताहिक नाटकं, इंग्रजी भाषा शिकण्यासाठीच्या कार्यक्रमांचेही बीबीसीद्वारे प्रसारण होत असे. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन पुरवणे हे ब्रीदवाक्य असलेली बीबीसी आजही आपल्या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करत आहे. या इंग्रजी बीबीसी वर्ल्डमध्ये सुरुवातीला बातम्या, मनोरंजन, संस्कृती आणि आध्यात्मिक विषयांच्या कार्यक्रमांचा भरणा होता. श्रोत्यांच्या ज्ञानात भर घालणारा एलिस्टेयर कुकचा लेटर फ्रॉम अमेरिका हा कार्यक्रम बीबीसीवर तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ सुरू होता. बातम्या ऐकण्यासाठी श्रोते प्रामुख्याने रेडिओ सुरू करतात. संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांना इतर माध्यमातूनही उपलब्ध होऊ शकतात. मात्र इ.स.१९९० नंतर बीबीसी वर्ल्डमधून मनोरंजनाचा रकाना वगळण्यात आला. यावेळी बीबीसीने बातम्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. आशिया खंडातही बीबीसीने आपले जाळे विणले आहे. इंग्रजीप्रमाणे हिंदी, उर्दू, बंगाली, दक्षिणेतील प्रमुख भाषा याशिवाय काही वर्षांपासून मराठीतही बीबीसीने सेवा देण्यास सुरुवात केली. बीबीसीच्या या सेवा विस्ताराला प्रेक्षक आणि श्रोत्यांचे मोठ्या संख्येने पाठबळ मिळत आहे. बीबीसी वर्ल्डतर्फे आज संगीत, मनोरंजन, शिक्षण सारखे विविध विषय हाताळण्यात येत असले तरी बातम्यांचे प्रसारण करणे हीच बीबीसी वर्ल्डचे वैशिष्ठ्य आहे. २४ तास सुरू राहणार्‍या बीबीसीतर्फे प्रत्येक एका तासानंतर ५ मिनिटांच्या बुलेटिनचे प्रसारण केले जाते. रेडिओ, वेबसाईट, वृत्तवाहिनी या सर्वच प्रकारांद्वारे बीबीसी विविध कार्यक्रम आणि बातम्यांचे अखंड प्रसारण करत आहे. अगदी इराक-अमेरिका आणि अफगणिस्तान – अमेरिका यांच्यातील युध्दातील बीबीसी रेडिओने केलेले समालोचन ही ध्वनिमुद्रणातील समालोचनाची उच्चतम पातळी म्हटली जाते. त्यामुळेच आज बीबीसीचा वेगळा प्रेक्षकवर्ग आपल्याला पहायला मिळतो. मग तो रेडिओवर असेल वा दूरचित्रवाणीवर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -