घरफिचर्सक्रांतिकारकांचे बलिदान, शहीद दिन

क्रांतिकारकांचे बलिदान, शहीद दिन

Subscribe

भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा आज स्मृतिदिन. भारतमातेसाठी बलिदान करणार्‍या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणार्‍या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले. भगतसिंग याचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला होता. पुरेसे महाविद्यालयीन शिक्षण, घरातील सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही त्यांनी देशसेवेसाठी आजन्म वाहून घेतले. शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ या दिवशी महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळील खेड येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती याची त्यांना जन्मजात देणगी होती.

एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीव्र उन्हाळ्यात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकार्‍यांची नावे सांगितली नाहीत. सुखदेव थापर यांचा जन्म पंजाबमध्ये, १५ मे १९०७ या दिवशी झाला. भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी हीच सुखदेव यांची प्रमुख ओळख.

- Advertisement -

सुखदेव हेही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे कार्यकारी सदस्य होते. त्यांच्यावर क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या विचारांचा पगडा होता. लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांतीविषयक, तसेच रशियाच्या क्रांतीविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये कारागृहात असताना कारागृहातील सहकार्‍यांच्या होत असलेल्या अनन्वित छळाच्या विरोधात चालू केलेल्या भू्क हरतालातही त्यांचा सहभाग होता. १९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून ‘सायमन कमीशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. ‘सायमन परत जा’ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.

जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठी आक्रमणात लाला लजपतराय जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणार्‍या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून आरक्षक अधिकारी यांच्या निवासस्थानापाशी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव यांनी संकेत केला. भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणार्‍याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी २३ मार्च १९३० या दिवशी भारतमातेच्या या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -